Uddhav Thackeray Devendra Fadnavis Nawab Malik : नवाब मलिकांच्या एन्ट्रीने भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात विसंवाद असल्याचे समोर आले. विधासभेत मलिक सत्ताधारी बाकावर बसले. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहून विरोध केला. हा मुद्दा तापला असून, विरोधकांनी भाजपला घेरलं आहे. त्यातच आता ठाकरेंच्या शिवसेनेने फडणवीसांच्या वर्मावर बोट ठेवत त्या पत्रावर भाष्य केलं आहे. (Saamana Editorial on Devendra Fadnavis letter to Ajit Pawar)
ADVERTISEMENT
सामना अग्रलेखातून ठाकरेंनी फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला आहे. ‘भाजपच्या नैतिकतेचे ऑडिट’ या अग्रलेखात म्हटले आहे की, “पैशांचे सोंग आणता येत नाही, पण नैतिकतेचे ढोंग मात्र हमखास आणता येते. अशा ढोंगाचे प्रात्यक्षिक नवाब मलिक यांच्या निमित्ताने भाजपने संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले आहे.”
“नैतिकता कशी पचपचीत झाली?”
“मलिकांनी आता अजित पवार गटाचा आश्रय घेतला. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मलिक सत्ताधारी बाकांवर म्हणजेच अजित पवार गोटात जाऊन बसताच विरोधकांनी भाजपचे वस्त्रहरण सुरू केले. मलिक यांच्या बाबतीत आधी काय बोलत होतात व आता ते तुमच्या गोटात शिरल्यावर तुमची नैतिकता कशी पचपचीत झाली आहे? असे सवाल उठताच भाजपने त्यांच्या वॉशिंग मशीनचे बटण बंद करून स्वतःला विचारमंथनात बुडवले”, असा चिमटा शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भाजपला काढला आहे.
हेही वाचा >> MLA Disqualification: शिंदे गटाच्या आमदारांना ठाकरेंच्या वकिलांनी घेरलं… वाचा सुनावणी जशीच्या तशी
“फडणवीस यांनी अजित पवारांना विधान भवनाच्या आवारातच पत्र लिहून नैतिकतेची उबळ बाहेर काढली. फडणवीस आपल्या पत्रात लिहितात, ‘काय हे दादा? तुम्ही तर आमच्या इज्जतीचा सारा चोथाच केला राव! नवाब मलिक यांच्यावर ज्या पद्धतीचे आरोप आहेत ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही. सत्ता येते सत्ता जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. मलिक यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली. मलिक यांना कोर्टाने निर्दोष सोडले नसून त्यांना फक्त वैद्यकीय कारणामुळे जामीन मिळाला आहे. मलिकांसारखे लोक सत्ताधारी बाकांवर आले तर महायुतीस बाधा पोहोचेल,’ अशा प्रकारच्या मंबाजी छाप कीर्तनाचा सूर त्यांनी लावला”, अशा शब्दात फडणवीसांनी लिहिलेल्या पत्रावर ठाकरेंच्या शिवसेनेने उपरोधिक भाष्य केले आहे.
ठाकरेंचे अग्रलेखातून टीकेचे 7 बाण… काय म्हटलंय?
1) “मलिक यांच्या निमित्ताने विरोधकांनी भाजपची ‘हुर्यो’ उडवल्यावर फडणवीसांनी लेखणी उपसली व अजित पवार यांना पत्र लिहिले. मोदींनी ‘डिजिटल इंडिया’ केले, मोदींनी ‘5-जी’ वगैरे आणले. त्यामुळे फडणवीसांना त्या साधनांचा वापर करून अजित पवारांना जागीच दटावता आले असते, किंबहुना नैतिकतेच्या मुद्द्यावर सभागृहातच मलिक यांना रोखता आले असते, पण फडणवीसांनी त्यांच्या बाजूलाच बसलेल्या दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले.”
हेही वाचा >> सत्ताधाऱ्यांसोबत बसलेल्या नवाब मलिकांवर फडणवीसांनी केलेले ‘हे’ आरोप, अन् आज…
2) “नैतिकतेच्या प्रश्नी आमचे ढोंग किती पक्के व छक्केबाज आहे हे त्यांनी पत्रातून दाखवले, पण विनोद असा की, याच अजित पवार गटाचे दिल्लीतील सूत्रधार प्रफुल पटेल यांचे कारनामे तर मलिकांच्या वरचे आहेत. मलिक यांनी दाऊदसंबंधित लोकांशी जमिनीचा व्यवहार केला. त्यामुळे ‘ईडी’ने त्यांना अटक केली, तर पटेल यांनीही बॉम्बस्फोटांतील म्होरक्या व दाऊदचा जिगरी मिर्चीभाई याच्याशी जमीनजुमला, आर्थिक व्यवहार केल्याचे उघड झाल्याने स्वतः पंतप्रधान मोदी यांनीच पटेलांवर लाखोली वाहिली होती.”
3) “पटेल यांची दाऊद-मिर्ची व्यवहारातील सर्व संपत्ती ‘ईडी’ने जप्त केली, पण मलिक यांना अटक केलेल्या ‘ईडी’ने त्यापेक्षा भयंकर प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप असूनही पटेल यांना मात्र अटक केली नाही. आरोप तेच, व्यवहार तोच, पण दोन वेगळे ‘न्याय’ लावले. मलिक यांना जो ‘न्याय’ तो पटेलांना का नाही? असा प्रश्न भाजप विरोधकांनी आता विचारला आहे.”
‘मिर्ची’ची खीर झाली की मधुर हलवा?; पटेलांवरून सवाल
4) “पटेल हे दोन दिवसांपूर्वीच गृहमंत्री अमित शहा यांना हसत हसत भेटले व देशाच्या गृहमंत्र्यांनीही ‘मिर्ची’फेम पटेलांचे हसत हसत स्वागत केले. राष्ट्रवादी काँगेस फोडून भाजप गोटात शिरण्याच्या प्लॅनबाबत मिर्चीभाई पटेलच अमित शहांशी चर्चा करीत होते. पटेल हे ‘यूपीए’ सरकारमध्ये मंत्री असताना त्यांच्या मिर्ची व्यवहाराबद्दल भाजपने सोनिया गांधी यांना प्रश्न विचारले होते. तेच पटेल आज भाजपबरोबर फिरत आहेत. 15 दिवसांपूर्वी मोदी हे गोंदियाच्या विमानतळावर उतरले तेव्हा पटेल ‘मिर्ची’ हार घेऊन सगळय़ात पुढे होते. आता त्या ‘मिर्ची’ची खीर झाली की मधुर हलवा झाला? याचा खुलासा फडणवीस यांनीच करायला हवा, की त्यांची नैतिकता मिर्चीच्या ठेच्यात विरघळून गेली?”
5) “महाराष्ट्रातील संतांचे राज्य जाऊन असे ढोंगी मंबाजी व तुंबाजीचे अवतार सध्या येथे निपजले आहेत. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचे ऑडिट होत असते, तसे एक ऑडिट भाजपच्या नैतिकतेचे व्हायला हवे. पटेल यांना भाजपने देशासाठी नव्हे, तर सत्तेसाठीच स्वतःच्या पाळण्यात घातले आहे. महाराष्ट्रातील हसन मुश्रीफ, भावना गवळी, प्रताप सरनाईक, छगन भुजबळ, दस्तुरखुद्द सिंचन घोटाळाफेम अजित पवार यांच्या भ्रष्टाचाराबाबत भाजपने तेव्हा जे नैतिकता व संस्कृतीचे फटाके फोडले होते, त्याचे आता काय झाले?”
6) “संजय राठोड या मंत्र्याचा एका महिला आत्महत्येप्रकरणी भाजपने राजीनामा मागितला होता. नैतिकतेच्या मुद्दय़ावर तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्या मंत्र्यास घरी पाठवले. त्याच मंत्र्यास फडणवीस यांनी पुन्हा मंत्री करून नैतिकतेचे मुंडकेच उडवले. मलिक, पटेलांच्या देशद्रोहाइतकेच राठोडांचे कर्तृत्व आहे, पण भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकताच त्या अबलेच्या किंकाळय़ा भाजपच्या नीतीबाज कोल्ह्यांना ऐकू येणे बंद झाले.”
7) “मंत्रिमंडळातील बहुसंख्य मंत्री डुकरांप्रमाणे भ्रष्टाचाराच्या चिखलात लोळत आहेत. आरोग्यमंत्र्यांनी तर संपूर्ण यंत्रणाच लिलावात काढली, पण फडणवीस यांनी पत्र लिहिले ते फक्त नवाब मलिक यांच्याविषयी. मिर्चीफेम प्रफुल पटेल पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहांना भेटतात. देवेंद्र फडणवीस यांनी मोदी-शहांना एक पत्र लिहून ‘पटेलांना भेटणे देशहिताचे नाही. भाजपच्या नैतिकतेत ते बसत नाही. साहेब, पटेलांना लांब ठेवा’ असे सांगण्याचे धाडस दाखवावे. तरच मलिकांच्या बाबतीतील त्यांच्या नैतिकतेच्या उचक्या खऱ्या, नाहीतर पैशाचे सोंग व भाजपचे नैतिकतेचे ढोंग सारखेच. त्यांच्या नैतिकतेचे ऑडिट करावेच लागेल.”
ADVERTISEMENT