Prakash Ambedkar Maha Vikas Aghadi : महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याची घोषणा केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांच्या सह्यांचे पत्र प्रकाश आंबेडकरांना दिले. पण, वंचित बहुजन आघाडी अजूनही महाविकास आघाडीत सामील झालेली नाही, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली. असं काय घडलंय की, वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील झालेली नाही, असे आंबेडकर म्हणताहे, तेच समजून घ्या.
ADVERTISEMENT
महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेत असल्याची घोषणा केली. पण, आंबेडकर अजूनही तसं मानायला तयार नाहीत. त्याचं कारणही आंबेडकरांकडून सांगण्यात आले आहे.
Maha Vikas Aghadi : प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं काय?
वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झाला आहे, असे मानायचे की नाही? या प्रश्नाला प्रकाश आंबेडकरांनी जे उत्तर दिले ते खूप महत्त्वाचे आहे. आंबेडकर म्हणाले, “अजून मानायचं नाही. वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचं असेल, तर काँग्रेस नेतृत्वाच्या वरच्या नेतृत्वाने म्हणजे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने त्याला मान्यता दिली पाहिजे. राष्ट्रीय काँग्रेस कमिटीची मान्यता आहे की, नाही हेच आम्हाला माहिती नाही.”
“नाना पटोले पत्रव्यवहार करत आहेत. पण, आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे महत्त्वाचे आहेत, ते निर्णय घेतील. त्या पत्रावर बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांची सही नाही.”
हेही वाचा >> महायुतीत वाद! शिंदेंच्या आमदारांनी मागितला भुजबळांचा राजीनामा
संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश करत असल्याची घोषणा केली, त्यावेळी बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण तिथे उपस्थित होते. हा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला असता आंबेडकरांनी सविस्तर भूमिका मांडली.
ते म्हणाले की, “प्रश्न असा आहे की, पत्रकार परिषदेत काय झालं, हा वेगळा भाग. त्या पत्रावर त्या दोघांच्या सह्या असत्या तर मी म्हणालो असतो की, काँग्रेस पक्षाची सही आहे. नाना पटोलेंची सही आहे, त्या अर्थी मी असं मानतो की, ती काँग्रेस पक्षाची सही नाहीये, ती नाना पटोलेंची व्यक्तिगत सही आहे. कारण काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चेन्निथला यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी सांगितलं की हे दोघे (थोरात आणि चव्हाण) निर्णय घेतील.”
प्रकाश आंबेडकरांची नेमकी भूमिका काय आहे, हे तुम्हाला समजलंच असेल. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा समावेश महाविकास आघाडीत झाला आहे, अशी घोषणा झाली असली, तरी आंबेडकर ते स्वीकारत नाहीयेत. पण, आंबेडकरांची दुसरी भूमिकाही समजून घ्यायला हवी.
दोन फेब्रुवारी रोजीच्या बैठकीला जाणार आहात का?
आबंडेकर म्हणाले, “आम्ही पहिलेच म्हणालो आहोत की आम्ही इगो करणार नाही. वागणूक कशी मिळाली हा वादाचा विषय करणार नाही. आम्ही अगोदरपासून म्हणतोय की, भाजपचं सरकार देशाला धोकादायक आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा विरोध करतोय. आरएसएस-भाजपचं सरकार न येणं हेच आमचं प्राधान्य आहे.”
हेही वाचा >> ठाकरेंना मुंबईतील’या’ दोन जागा सोडाव्या लागणार?
त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील झालेली नसली, असे सांगत असले, तरी ते २ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीला जाणार आहेत. पण, वंचितचा अधिकृत समावेश करण्यासाठी काँग्रेसला आंबेडकरांची मागणी पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे काँग्रेसकडून कार्यवाही कधी केली जाते हेही महत्त्वाचे असेल.
ADVERTISEMENT