Vishnu Deo Sai Chhattisgarh chief minister : भाजपची सत्ता आलेल्या तीनपैकी एका राज्यातील सस्पेन्स संपला. छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदासाठी भाजपने नावावर शिक्कामोर्तंब केले. माजी केंद्रीय मंत्री विष्णू देव साय यांच्याकडे राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपने मोठा डाव चालत एका आदिवासी नेत्याला राज्याचा चेहरा बनवले आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्रिपदासाठी विष्णू देव साय यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता, असे सूत्रांनी सांगितले. (Vishnu deo Sai will be the new Chief Minister of Chhattisgarh)
ADVERTISEMENT
भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, अर्जुन मुंडा आणि दुष्यंत कुमार गौतम यांच्यासह छत्तीसगड भाजपचे प्रभारी ओम माथूरही उपस्थित होते. केंद्रीय निरीक्षक सकाळी नऊच्या सुमारास रायपूरला पोहोचले. दुपारी 12 वाजल्यापासून मुख्यमंत्र्यांच्या नावासंदर्भात आमदारांसोबत विचारमंथन सुरू झाले होते.
भाजपने आदिवासी नेत्याकडे दिली मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी
विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नावावर निर्णय झाल्यानंतर, याला दिल्लीतून मंजुरी मिळाल्याचे बोलले जात आहे. भाजप आदिवासी नेत्याला राज्याचा मुख्यमंत्री करेल अशी अटकळ होती. महिला नेत्यालाही संधी मिळू शकते, असेही बोलले जात होते. कारण यावेळी भाजपने निवडणूक पार पडलेल्या कोणत्याही राज्यात मुख्यमंत्र्यांचा चेहरा जाहीर केला नव्हता.
विष्णू देव साय यांच्यासह ही नावे होती चर्चेत
छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदासाठी अनेक दावेदार होते. त्यात स्वतः रमणसिंग होते. तसेच अरुण साव, ओपी चौधरी आणि रेणुका सिंह यांच्या नावाचा समावेश होता. माजी केंद्रीय मंत्री विष्णू देव साई यांच्यासह रेणुका सिंह यांचे नाव आदिवासी मुख्यमंत्री म्हणून पुढे होते.
हेही वाचा >> “फडणवीसांच्या ताटात जेवणारी माणसंच…”, जरांगेंचा गंभीर इशारा
छत्तीसगडमध्ये भाजपने नेत्रदीपक विजय मिळवला आहे आणि निकालाचे सर्व अंदाज उधळून लावत 54 जागा मिळवल्या आहेत. तर पाच वर्षे सत्तेत राहिलेल्या काँग्रेसला 34 जागा जिंकता आल्या.
विष्णू देव साय कुणकुरी मतदारसंघाचे आमदार
विष्णू देव साय यांनी छत्तीसगडमधील कुणकुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांनी काँग्रेसच्या उद मिंज यांचा पराभव केला. विष्णू देव साय यांना 87,604 तर उद मिंज यांना 62,063 मते मिळाली. विष्णू देव साय हे छत्तीसगड भाजपचे प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. ही जबाबदारी त्यांनी 2 वर्षे 68 दिवस पार पाडली. रायगड मतदारसंघातून ते खासदारही होते.
विष्णू देव यांच्या राजकीय प्रवासावर एक नजर
जून 2020 मध्ये भाजपने साय यांची छत्तीसगडच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. ऑगस्ट 2022 पर्यंत ते या पदावर होते. रायगडमधून चार वेळा खासदार म्हणून निवडून आले (1999-2014) होते. नरेंद्र मोदींच्या पहिल्या सरकारमध्ये त्यांना केंद्रीय मंत्री करण्यात आले होते.
हेही वाचा >> बसपा अध्यक्षा मायावतींचा वारसदार ठरला! कोण आहे आकाश आनंद?
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारी दिली नाही. याचे कारण असे की छत्तीसगडमध्ये 2018 मधील विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर भाजपने आपल्या कोणत्याही विद्यमान खासदाराला निवडणुकीत न उतरवण्याचा निर्णय घेतला होता.
‘असा चेहरा ज्याला कुणीही करू शकत नाही विरोध’
भाजप नेते नारायण चंदेल म्हणाले की, “विष्णू देव साय खूप चांगले व्यक्ती आहेत. आमचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. ते अतिशय सरळमार्गी, साधे आणि विनम्र असा चेहरा आहे, ज्याला कोणीही विरोध करू शकत नाही.”
ADVERTISEMENT