Ashok Chavan Joined BJP : काँग्रेसमध्ये असताना भाजपने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला. आदर्श प्रकरणावरून चव्हाण यांना सातत्याने लक्ष्य केलं गेलं. त्याच मुद्द्यावर अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सविस्तर भूमिका मांडली.
भाजपच्या मुंबईतील प्रादेशिक कार्यालयात अशोक चव्हाण यांचा पक्ष प्रवेश कार्यक्रम झाला. भाजपचे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर चव्हाण यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
ADVERTISEMENT
"पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. मी नवीन सुरूवात करत आहे. ३८ वर्षांच्या प्रवासानंतर बदल करत आहे", असे अशोक चव्हाण भूमिका मांडतांना म्हणाले.
माझ्यावर टिका-टिप्पणी झाली...
"राजकारण हे एक सेवेचं माध्यम आहे. मला कुणावरही व्यक्तिगत टीका-टिप्पणी करायची नाही. मी पक्ष सोडल्यानंतर अनेक सहकारी विरोधी बोलले, काही टिका-टिप्पणी केली. काही लोकांनी समर्थन केलं आहे. ज्याला आपण म्हणू की मतभिन्नता असू शकते, पण व्यक्तिगत स्वरुपाचे आरोप मी कुणावर केले नाही. करणार नाही. आजपासून मी सकारात्मक कामाला लागलो आहे", असे अशोक चव्हाण म्हणाले.
चव्हाण पुढे म्हणाले की, "माझ्या आधीच्या पक्षातील सहकाऱ्यांचेही मी आभार मानतो. इतके वर्ष आम्ही एकत्र राहिलोय. ठिक आहे, हा माझा व्यक्तिगत निर्णय होता. मला कुणीही जा म्हणून सांगितलं नाही. मी शेवटपर्यंत... लोक म्हणतात की कालपर्यंत तुम्ही पक्षात बसला होता आणि अचानक तुम्ही भूमिका बदलली."
"मी शेवटच्या क्षणापर्यंत दिलेलं काम मी केलेलं आहे आणि आज मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. मी सगळ्याच गोष्टींवर आज बोलणार नाही. योग्यवेळी बोलेन", अशी भूमिका चव्हाण यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर मांडली.
आदर्श घोटाळ्यावर चव्हाण काय म्हणाले?
विरोधक म्हणताहेत की, आदर्श घोटाळ्याचं आता काय झालं?, असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारताच अशोक चव्हाण म्हणाले, "हा उशिरा आला प्रश्न. पहिल्यांदाच घ्यायला पाहिजे होता. या प्रकरणात उच्च न्यायालयात आमच्या बाजूने निकाल लागलेला आहे. काही यंत्रणांनी अपिल केलेलं आहे. ठिक आहे. कायदेशीर प्रक्रिया आहे आणि ती पाळली जाईल. पण, हा एक राजकीय अपघाताच म्हणावा लागेल. मला एवढं सांगायचं आहे. मला हा फार काही चिंतेचा विषय वाटत नाही."
ADVERTISEMENT