शिवसेनेतून ४० आमदार गेले, सरकार स्थापन झालं आणि गद्दारांना काय मिळालं? बाबाजी का ठुल्लू अशी टीका आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. दहीहंडीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आम्ही ५० थर लावले आणि आता मलई खाणार. गद्दारांना मिळाली का मलई? त्यांना बाबाजी का ठुल्लू मिळाला असं म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT
नेमकं काय म्हटलं आहे आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांविषयी?
आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले दोन महिन्यात राज्यात काय झालं तुम्हाला मान्य आहे का? ५० खोके बरोबर जाणं सोपं आहे. पक्षासोबत राहणं महत्त्वाचं आहे. सध्याचा काळ महत्त्वाचा आहे. राज्यभर शिवसंवाद यात्रेला प्रेम मिळतो आहे. पुढचा काळ शिवसेनेचा असेल असा इशाराही आदित्य ठाकरेंनी दिला.
शुक्रवारी दहीहंडीच्या दिवशी मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही ५० थरांची दहीहंडी लावली होती. ५० थर होते की आणखी काही होतं? ज्यांनी गद्दारी केली त्यांना काय मिळालं बाबाजी का ठुल्लू? असा प्रश्नही आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. आदित्य ठाकरे हे जळगावात आहेत. शिवसंवाद यात्रेचा दुसरा टप्पा सध्या सुरू आहे. अशात आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर कडाडून टीका केली आहे.
राक्षसी महत्त्वाकांक्षेपोटी आमदार गेले
आदित्य ठाकरेंनी यावेळी बंडखोर आमदारांवर कडाडून टीका केली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेलं सरकार बेकायदेशीर आहे. हे सरकार कोसळणार अशी ग्वाहीही त्यांनी दिली. जे आमदार गेले ते सगळे राक्षसी महत्त्वाकांक्षेच्या पोटी गेले आहेत, ते हिंदुत्वासाठी गेले नाही. उद्धव ठाकरे यांनी जेव्हा राजीनामा दिला तेव्हा बारमध्ये नाचत असल्यासारखे नाचत होते. ही गद्दारी शिवसेनेसोबत नाही तर माणुसकीसोबत आहे. मी पुन्हा पुन्हा बोलत नाही पण लोकांना कळलं पाहिजे. त्यामुळे गद्दारांच्या मतदारसंघात जाऊन बोलणार म्हणजे बोलणारच असंही आदित्य ठाकरेंनी सुनावलं.
दिवाळीच्या काळात वर्षा बंगल्यावर शिवसेनेचे आमदार आले होते. त्यावेळी या सगळ्यांनी जेवण केलं. उद्धव साहेबांचं ऑपरेशन करायचं होतं आणि मला जागतिक परिषदेसाठी जायचं होतं. उद्धवसाहेबांनी जायला सांगितलं होतं. एक ऑपरेशन झालं दुसरं करावं लागलं. त्यावेळी हे गद्दार सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे जे उद्धव ठाकरेंचे झाले नाही ते महाराष्ट्राचे आणि तुमचे काय होणार असाही सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला.
ADVERTISEMENT