Sharad Pawar: 'मला शरद पवार म्हणतात', असं पवारांना का म्हणावं लागलं?

मुंबई तक

08 Mar 2024 (अपडेटेड: 08 Mar 2024, 12:19 PM)

Sharad Pawar: 'मला शरद पवार म्हणतात..' असं विधान शरद पवार यांना का करावं लागलं? त्यामागचा नेमका इशारा काय आणि कोणासाठी होता? जाणून घ्या याचविषयी सविस्तर.

शरद पवारांनी 'ते' विधान का केलं?

शरद पवारांनी 'ते' विधान का केलं?

follow google news

बातम्या हायलाइट

point

शरद पवारांनी कोणाला दिला इशारा?

point

अजित पवारांना अप्रत्यक्ष आव्हान?

point

शरद पवारांची नेमकी खेळी काय?

Sharad Pawar vs Ajit Pawar: निलेश झालटे, मुंबई: जेव्हा संकटं येतात तेव्हा शरद पवार अधिक ताकदीने उभं राहतात, असं काही दिवसांपूर्वी जयंत पाटलांनी म्हटलं होतं. आणि एखाद्याला टप्प्यात घेतलं की शरद पवार टप्प्यात कार्यक्रम करतात याचीही काही उदाहरणं आपण पाहिली आहे. साताऱ्यात पावसातल्या सभेतलं एक भाषण झालं आणि निवडणुकीचा नूर पालटला होता. शांतपणे प्लॅन आखून विरोधकांना नामोहरम करणारे पवार अजित पवारांनी पक्ष फोडल्यानंतर कमालीचे आक्रमक झाले आहेत. (why did pawar have to say i am called sharad pawar what is the actual politics in ncp)

हे वाचलं का?

'या वयात' या शब्दावर नेहमीच आक्षेप घेणार पवार खरोखरच या वयात पायाला भिंगरी बांधून फिरताना दिसतात, तेव्हा समोरचा माणूस चिंतेत पडल्याशिवाय राहत नाही. आता तुम्ही म्हणाल हे सगळं का सांगितलं जातंय. कारण आता शरद पवारांनी अजितदादांच्या खास असलेल्या एका आमदाराला थेट निशाण्यावर घेतलं आहे. 

इतकंच नाही तर 'मला शरद पवार म्हणतात.., मी या रस्त्याने कधी जात नाही. परंतु, या रस्त्याने जाण्याची स्थिती कोणी निर्माण केली तर मी त्याला सोडतही नाही.' असं म्हणत त्यांनी दादांचे खास असलेल्या सुनील शेळकेंना इशाराच दिला. 

'मला शरद पवार म्हणतात' असं पवारांना का म्हणावं लागलं, हा इशारा शेळकेंना आहे की, त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून दुसऱ्या कुणाला? यामागं नेमकं काय राजकारण आहे हे आपण जाणून घेऊयात.  

शरद पवार हे काल (7 मार्च) लोणावळा दौऱ्यावर होते. इथं बोलताना त्यांनी शेळकेंना थेट फैलावरच घेतलं. सहसा पवार कुणाबद्दल काही केलेलं काढत नाहीत. पण त्यांना कुणीतरी सांगितलं की, शेळकेंनी काही लोकांना शरद पवारांच्या बैठकीला जाऊ नये म्हणून दमदाटी केली. पवारांना अर्थातच ही गोष्ट कळल्यानंतर त्यांनी भर स्टेजवरुन शेळकेंचा समाचार घेतला.

हे ही वाचा>> 'शरद पवार म्हणतात मला...' यावर अजितदादा काय म्हणाले?

'इथले जे आमदार दमदाटी करत आहेत त्यांना मला सांगायचं आहे की, बाबा रे तू आमदार कोणामुळे झालास आठवतंय का? तुझ्या प्रचारसभेला इथे कोण आलेलं आठवतंय का? तेव्हा पक्षाचा अध्यक्ष कोण होता? निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी पक्षाचं चिन्ह लागतं, पक्षाचा फॉर्म लागतो, तो फॉर्म आणि चिन्ह तुला कोणी दिलं? तुझ्या अर्जावर कोणाची सही होती? तू माझ्या सहीने तुझा अर्ज भरला होतास. तुम्ही लोक आज त्याच पक्षाच्या आणि विचारांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करता? तुला निवडून आणण्यासाठी जे कार्यकर्ते राबले, ज्यांनी तुझ्यासाठी घाम गाळला, त्यांनाच तू दमदाटी करतोस. माझी त्या आमदाराला विनंती आहे. एकदा दमदाटी केलीस, पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला.. मी या रस्त्याने कधी जात नाही. परंतु, या रस्त्याने जाण्याची स्थिती कोणी निर्माण केली तर मी त्याला सोडतही नाही.'

अर्थात या इशाऱ्यानंतर लगेच शेळकेंना पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण द्यावं लागलं. 'मी साहेबांना जाऊन भेटणार, चर्चा करणार. मी कुणालाही दमदाटी केलेली नाही. पवारांच्या वक्तव्याचं वाईट वाटतंय. पवारांना खोटी माहिती दिली गेली आहे. पवारांच्या वक्तव्याचं आश्चर्य वाटलं. दमदाटीचा आरोप खरा ठरला तर माफी मागेन.' असं शेळकेंनी यावेळी म्हटलं.

2019 साली मावळ विधानसभा मतदारसंघात 25 वर्षांपासूनच्या भाजपाच्या सत्तेला सुरंग लावत शेळके विधानसभेत पोहोचले होते. भाजपचे राज्यमंत्री असलेल्या बाळा भेडगेंचा पराभव केला आहे. विशेष भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरत सुनील शेळके यांनी विजय खेचून आणला होता. शेळके हे अजितदादांचे खास आणि विश्वासू मानले जातात.

शेळकेंवर शरद पवारांचा हा प्रत्यक्ष निशाणा म्हणजे अजितदादांना देखील अप्रत्यक्ष निशाणा असल्याचं बोललं जात आहे. अजित पवारांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानं या बंडामागे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती, त्यावेळी शेळकेंचं एक विधान चर्चेत आलं होतं. सुप्रिया सुळे यांच्याच उपस्थित भाजपसोबत सत्तेत जाण्याचं ठरलं असल्याचा गौप्यस्फोट आमदार सुनील शेळके यांनी केला होता.

हे ही वाचा>> युगेंद्र पवारांचा थेट बारामतीकरांच्या काळजालाच हात!

अजितदादांच्या महायुतीत जाण्याच्या निर्णयानंतर खरंतर शेळकेंची वाट अवघड झालेली आहे. कारण, त्यांच्यासमोर माजी मंत्री बाळा भेगडे यांचं आव्हान असणार आहे. भेगडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळं शेळकेंची वाट अवघड झाली असताना आता खुद्द शरद पवारांनी चॅलेंज दिल्यानं ही वाट अजून खडतर झाल्याची चर्चा आहे. 

शरद पवार असं थेटपणे क्वचितच बोलताना दिसतात. शेळकेंना थेट निशाण्यावर घेणं हे केवळ निमित्तमात्र असल्याचं बोललं जात आहे. शरद पवारांच्या या निशाण्याचा रोख हा अजित पवारांकडे असल्याची चर्चा आहे. कारण सध्या बारामती लोकसभेवरुन दोन्ही गटाकडून ताकद लावली जात आहे. काही प्रचार सभांमध्ये बोलताना अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना दमदाटीच्या सुरात शरद पवारांकडे न जाण्याचा इशारा दिला गेल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळं शरद पवारांनी शेळकेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून दादांवर निशाणा साधलाय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

    follow whatsapp