आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील उर्वरित सामने खेळवण्यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने, भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत बदल करण्यास नकार दिला आहे. दोन्ही बोर्डाच्या अधिकाऱ्यांमध्ये याबद्दल अनौपचारिक चर्चा झाली असून यात फलित निघालेलं नाही. इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे Managing Director एशले जाईल्स यांनी वेळापत्रकात कोणताही बदल होणार नसल्याचं स्पष्ट केलंय.
ADVERTISEMENT
जाणून घ्या काय म्हणाले आहेत जाईल्स?
वेळापत्रकात बदल करावेत यासाठीची कोणतीही विनंती अद्याप माझ्याकडे आलेली नाही. आमच्यापुरता विचार करायला गेलं आम्ही ज्या स्पर्धांसाठी तयारी केली आहे, त्या स्पर्धा ठरवलेल्या वेळापत्रकानुसारच होतील. सध्या बाहेर ज्या काही शक्यता वर्तवल्या जात आहेत, त्याचं मला जराही आश्चर्य वाटलेलं नाही. प्रत्येकाला वाटतं की आपल्या स्पर्धा पूर्ण व्हाव्यात, परंतू यासाठी अद्याप आमच्याकडे कोणीही विनंती केलेली नाही.
परंतू इंग्लंडचा माजी खेळाडू मार्क बुचरच्या मते इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयची स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल करण्याची विनंती मान्य करायला हवी होती. Wisden Cricket Weekly Podcast कार्यक्रमात बोलत असताना बुचर यांनी आपलं मत मांडलं.
“माझ्यामते इंग्लंड क्रिकेट बोर्डाने एक मोठी संधी गमावली आहे. BCCI ची विनंती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मान्य केल्यास त्यांच्याकडे टॉपच्या भारतीय खेळाडूंना Hundred स्पर्धेसाठी करारबद्ध करण्याची चांगली संधी होती. Hundred ही स्पर्धा योग्य पद्धतीने पार पडावी यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्ड प्रयत्न करत आहे आणि ते झालेच पाहिजेत. परंतू कुठे ना कुठे असं वाटतंय की ही स्पर्धा होणार नाही. त्यामुळे अशावेळी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने एक पाऊल मागे येऊन बीसीसीआयची विनंती मान्य करायला हवी होती. याबदल्यात भारतीय क्रिकेटपटू धोनी, कोहली यांना Hundred साठी करारबद्ध करायला हवं होतं.”
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये ९ दिवसांचं अंतर आहे. हे अंतर कमी करुन ४ दिवसांवर आणावं अशी विनंती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी इंग्लंड क्रिकेट बोर्डाला केल्याचं समोर येत होतं. ही विनंती मान्य झाल्यास बीसीसीआयला आयपीएलच्या आयोजनासाठी काही दिवस अधिक मिळाले असते. परंतू इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ही विनंती नाकारल्यामुळे बीसीसीआला नवीन पर्यायाचा विचार करावा लागतो आहे.
ADVERTISEMENT