नॉटिंगहॅम कसोटीत विजय मिळवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीप स्पर्धेची दणक्यात सुरुवात करण्याच्या भारतीय संघाच्या स्वप्नांवर पावसाने पाणी फिरवलं आहे. नॉटिंगहॅम कसोटीचा शेवटचा दिवस पावसाने व्यत्यय आणल्यामुळे वाया गेला आहे. ज्यामुळे हा सामना अनिर्णीत घोषित करण्यात आला आहे. अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी १५७ रन्सची गरज होती.
ADVERTISEMENT
जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्याच्या जोरावर इंग्लंडचा दुसरा डाव ३०३ धावांवर संपुष्टात आला. ज्यामुळे भारताला विजयासाठी २०९ धावांचं आव्हान मिळालं. बुमराहने दुसऱ्या डावात ५ बळी घेत इंग्लंडला फार मोठी आघाडी मिळणार नाही याची काळजी घेतली. चौथ्या दिवसाअखेरीस भारताने १ विकेट गमावत ५२ धावांपर्यंत मजल मारली होती. परंतू अखेरच्या दिवशी सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे भारताला आलेली विजयाची संधी वाया गेली आहे.
इंग्लंडचा दुसरा डाव ३०३ धावांत संपवल्यानंतर चौथ्या दिवसाच्या अखेरच्या सेशनमध्ये काही ओव्हर्सचा खेळ बाकी असताना भारताला बॅटींगची संधी मिळाली. अखेरच्या सत्रात विकेट न जाऊ देण्याचं मोठं आव्हान भारतासमोर होतं. पहिल्या इनिंगमध्ये आश्वासक अर्धशतकी खेळी करणाऱ्या लोकेश राहुलने काही सुरेख फटके लगावत चांगली सुरुवात केली. रोहित शर्मा देखील एक बाजू लावून उभा होता. परंतू स्टुअर्ट ब्रॉडने लोकेश राहुलला आऊट करत भारताला पहिला धक्का दिला. यानंतर रोहित आणि पुजारा यांनी संघाची अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेतली. परंतू अखेरच्या दिवशी पावसाने हजेरी लावून संपूर्ण दिवसाचा खेळखंडोबा केला.
ADVERTISEMENT