ओव्हल कसोटी सामना चौथ्या दिवसाअखेरीस रंगतदार अवस्थेत पोहचला आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी ३६८ धावांचं आव्हान दिल्यानंतर इंग्लंडने चौथ्या दिवसाअखेसीस एकही विकेट न गमावता ७७ धावांपर्यंत मजल मारली आहे. अखेरच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी २९१ धावांची गरज आहे.
ADVERTISEMENT
चौथ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात भारतीय गोलंदाजांना ३२ षटकं टाकली, परंतू इंग्लंडची सलामीची जोडी फोडण्यात त्यांना अपयश आलं. रोरी बर्न्स ३१ तर हासिब हमीद ४३ धावांवर खेळत होते.
भारताचा दुसरा डाव ४६६ धावांवर संपल्यानंतर इंग्लंडला अखेरच्या सत्रात भारतीय गोलंदाज किमान १-२ धक्के देतील अशी सर्वांना अपेक्षा होती. परंतू ही अपेक्षा फोल ठरली. बर्न्स आणि हमीद यांनी सर्व षटकं खेळून काढत भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना केला. महत्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही फलंदाजांनी आश्वासक फटके खेळत धावगतीही नियंत्रणात ठेवली. त्यामुळे अखेरच्या दिवशी भारतीय गोलंदाजांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे.
दरम्यान, ओव्हल कसोटी सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाने यजमान इंग्लंडसमोर ३६८ धावांचं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडियाच्या शेपटाने पुन्हा एकदा इंग्लंडला तडाखा देत दुसऱ्या डावात ४६६ धावांपर्यंत मजल मारली. शार्दुल ठाकूर, ऋषभ पंत यांनी फटकेबाजी करुन इंग्लंडच्या बॉलर्सची धुलाई केली.
ADVERTISEMENT