मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने राजस्थानचा ४ विकेट्सने पराभव केला आहे. राजस्थानने विजयासाठी दिलेलं १७० धावांचं आव्हाव बंगळुरुने शाहबाज अहमद आणि दिनेश कार्तिकच्या फटकेबाजीच्या जोरावर पूर्ण केलं.
ADVERTISEMENT
पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या राजस्थानची सुरुवात अतिशय खराब झाली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल डेव्हीड विलीच्या बॉलिंगवर आऊट झाला. यानंतर जोस बटलर आणि देवदत पडीक्कलने भागीदारी करुन संघाचा डाव सावरला. दोघांनीही मैदानात काही चांगले फटके खेळत RCB च्या बॉलर्सला नाकीनऊ आणले. पटेलने पडीक्कलला आऊट करत राजस्थानला दुसरा धक्का दिला.
दुसऱ्या बाजूला फॉर्मात असलेल्या जोस बटलरने या सामन्यात एक बाजू लावून धरत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. कर्णधार संजू सॅमसन झटपट माघारी परतल्यानंतर शेमरॉन हेटमायरने उर्वरित ओव्हर्समध्ये राहिलेली कसर भरुन काढत बटलरला उत्तम साथ दिली. या दोघांनीही चौफेर फटकेबाजी करत राजस्थानला १६९ धावांचा टप्पा गाठून दिला. बटलरने ४७ बॉलमध्ये ६ षटकार लगावत नाबाद ७० तर शेमरॉन हेटमायरने ३१ बॉलमध्ये ४ फोर आणि २ सिक्स लगावत नाबाद ४२ धावा केल्या.
प्रत्युत्तरादाखल RCB च्या संघाची सुरुवात आश्वासक झाली. कर्णधार फाफ डु-प्लेसिस आणि अनुज रावत यांनी पहिल्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी केली. ही जोडी मैदानात स्थिरावतेय असं वाटत असतानाच चहलने डु-प्लेसिसला आऊट केलं. ठराविक अंतराने अनुज रावतही माघारी परतला. यानंतर विराट कोहली, विली आणि रुदरफोर्ड हे स्वस्तात माघारी परतल्यामुळे चांगल्या सुरुवातीनंतरही RCB चा संघ ५ बाद ८७ अशा अवस्थेत येऊन सापडला.
यानंतर शाहबाज अहमद आणि दिनेश कार्तिक या फलंदाजांनी सूत्र हातात घेत राजस्थानच्या बॉलर्सना पुन्हा बॅकफूटला ढकलायला सुरुवात केली. दोघांनीही अखेरच्या ओव्हर्समध्ये राजस्थानच्या गोलंदाजीचा यथेच्छ समाचार घेत सामन्यात पुन्हा एकदा आपली पकड निर्माण केली. शाहबाज अहमद बोल्टच्या बॉलिंगवर माघारी परतल्यामुळे सामन्यात रंगत निर्माण झाली खरी. परंतू दिनेश कार्तिकने हर्षल पटेलच्या साथीने विजयासाठी आवश्यक धावा पूर्ण करत संघाला विजय मिळवून दिला.
विराट म्हणाला संघातले तरुण खेळाडू अनिल कुंबळेला घाबरुन असायचे – माजी CoA प्रमुख विनोद राय
ADVERTISEMENT