आयपीएलच्या आगामी हंगामासाठी सर्व संघमालकांना आपल्या संघातील खेळाडूंना कायम राखण्याची संधी मिळाली होती. संघात कायम राखण्यासाठी आजचा दिवस शेवटचा होता, त्यानुसार आठही संघमालकांनी आपल्या संघात काही महत्वाच्या खेळाडूंना पुढील हंगामासाठी संधी दिली आहे.
ADVERTISEMENT
यात अपेक्षेप्रमाणे रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांना मुंबईने कायम राखलं असून चेन्नई सुपरकिंग्जने धोनीला पुन्हा संघात घेतलं आहे. कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतलेल्या विराटलाही RCB ने संघात पुन्हा कायम राखलं आहे. आयपीएल २०२१ मध्ये खराब कामगिरी केलेल्या हैदराबादने मात्र यंदा धक्कातंत्र आजमावलं आहे.
डेव्हिड वॉर्नर, राशिद खान या बिनीच्या शिलेदारांना रिलीज करत हैदराबादने केन विल्यमसनला कायम राखलं आहे. जाणून घेऊयात कोणत्या संघाने किती रुपयांच्या बोलीवर खेळाडूंना संघात कायम राखलं आहे.
मुंबई इंडियन्सने कर्णधार रोहित शर्मासह सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि कायरन पोलार्ड यांना संघात कायम राखलं आहे.
चेन्नई सुपरकिंग्जनेही अपेक्षेप्रमाणे महेंद्रसिंह धोनीला संघात कायम राखलं असून महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाड याच्यासह मोईन अली आणि रविंद्र जाडेजाला कायम राखलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे चेन्नईने यामध्ये जाडेजाला पहिलं प्राधान्य दिलं असून त्याच्यासाठी १६ कोटी रुपये खर्च केले आहेत.
RCB ने विराट कोहलीसह ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराजला संघात कायम राखलं आहे.
गेले काही हंगाम आपल्या कर्णधारपदाच्या शैलीने सर्वांना प्रभावित केलेल्या लोकेश राहुलला पंजाब किंग्ज संघाने कायम राखलं नाहीये. आगामी हंगामासाठी राहुल नवीन संघाकडून खेळताना दिसणार आहे. मयांक अग्रवाल आणि अर्शदीप सिंहला पंजाबने संघात कायम राखलं आहे.
गेल्या हंगामात खराब कामगिरीमुळे चर्चेत राहिलेल्या सनराईजर्स हैदराबाद संघाने वॉर्नर आणि राशिद खानला संघात कायम राखलेलं नाही. त्याच्या जागेवर संघाने केन विल्यमसनला संघात कायम राखून अब्दुल समद आणि उमरान मलिक या दोन तरुण काश्मिरी खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे.
जाणून घेऊयात कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांनी कोणत्या खेळाडूंना संघात कायम राखलं आहे.
याव्यतिरीक्त राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसन, जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल या तीन खेळाडूंना कायम राखलं आहे.
आठही संघमालकांनी आपल्या संघात खेळाडूंना कायम राहिल्यानंतर आता सर्वांचं लक्ष हे मेगा ऑक्शनकडे लागलेलं आहे. आगामी हंगामात लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन नवीन संघ आयपीएलमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, इशान किशन, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, लोकेश राहुल, युजवेंद्र चहल अशा खेळाडूंना कितीची बोली लागते आणि कोणता संघ कोणत्या खेळाडूला कायम राखतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT