कायरन पोलार्ड IPL मधून निवृत्त; भावूक पोस्ट लिहित केलं जाहीर : MI सोबत आता नव्या रुपात

मुंबई तक

• 09:32 AM • 15 Nov 2022

मुंबई : आयपीएलमध्ये खेळाडूंच्या ट्रेडची चर्चा असतानाच एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई इंडियन्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड याने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ट्विटरवरती एक भावूक पोस्ट लिहून त्याने हा निर्णय जाहीर केला. परंतु निवृत्तीनंतरही पोलार्ड मुंबई इंडियन्ससोबत कायम राहणार असून तो आता मुंबई इंडियन्सच्या बॅटिंग कोचच्या भूमिकेत दिसणार आहे. ? #OneFamily […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : आयपीएलमध्ये खेळाडूंच्या ट्रेडची चर्चा असतानाच एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई इंडियन्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड याने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ट्विटरवरती एक भावूक पोस्ट लिहून त्याने हा निर्णय जाहीर केला. परंतु निवृत्तीनंतरही पोलार्ड मुंबई इंडियन्ससोबत कायम राहणार असून तो आता मुंबई इंडियन्सच्या बॅटिंग कोचच्या भूमिकेत दिसणार आहे.

हे वाचलं का?

पोलार्डला मुंबई इंडियन्सने 2010 मध्ये करारबद्ध केले होते. तेव्हापासून तो मुंबईचा मॅच विनिंग प्लेअर होता. मुंबई इंडियन्ससोबत पोलार्डने 5 आयपीएल ट्रॉफी आणि 2 चॅम्पियन्स लीग ट्रॉफी जिंकल्या आहेत. मुंबई सदैव आपल्या हृदयात राहील, असे पोलार्डनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मात्र हा इमोशनल गुडबाय नाही, कारण मी मुंबई इंडियन्सच्या बॅटिंग कोचची जबाबदारी स्वीकारली असल्याचही त्यानं म्हटलं आहे.

मुंबई नेहमीच माझे कुटुंब राहील :

पोलार्डने पोस्टमध्ये म्हटलं आहे की,

गेल्या 13 हंगामापासून आयपीएलमधील सर्वात मोठ्या आणि सर्वात यशस्वी संघाचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल मला खूप अभिमान, सन्मान आणि धन्य वाटत आहे. या जबरदस्त संघाकडून खेळण्याची आकांक्षा नेहमीच होती. या दरम्यान, जगातील काही सर्वोत्कृष्ट खेळाडूंसोबत खेळण्याचं भाग्य मला मिळालं, याचं मला समाधान वाटतं.

मी माझ्या चाहत्यांचा नेहमीच आदर केला आहे आणि या प्रवासात मला साथ दिल्याबद्दल मी त्यांचेही आभार मानू इच्छितो. आम्ही एकत्रितपणे 2011 आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स लीग आणि 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकलो.

जे मुंबई इंडियन्ससोबत होते आणि ज्यांच्याशी माझा संबंध आहे, अशा प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि बॅकरूम सपोर्ट स्टाफचेही मला आभार मानले पाहिजेत. त्यांच्याशिवाय आपण काहीच नाही. विशेषत: मी माझा चांगला मित्र रॉबिन सिंग यांच्या गेल्या अनेक वर्षांतील चांगला सल्ल्यांबद्दल आणि मार्गदर्शनासाठी आभार मानू इच्छितो.

सर्वांनी मला पाठिंबा दिला :

मुकेश, नीता आणि आकाश अंबानी यांचं प्रचंड प्रेम, समर्थन आणि आदराबद्दल त्यांचे देखील मनापासून कौतुक करतो. मला आमची पहिली भेट आठवते जेव्हा त्यांनी “आम्ही कुटुंब आहोत” असं म्हणत खुल्या हातांनी माझं स्वागत केलं. ते फक्त शब्द नव्हते, तर मुंबई इंडियन्ससोबतच्या माझ्या काळात त्यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीत ते प्रतिबिंबित होते.

शेवटी, मी माझे मित्र आणि कुटुंबीय विशेषत: माझी पत्नी, जेना आणि माझ्या तीन सुंदर मुलांचे विशेष आभार मानू इच्छितो. त्यांनी अनेक वर्षांमध्ये केलेल्या सर्व प्रेम, समर्थन आणि अनेक त्यागांसाठी. आज मी भविष्यासाठी आशेने आणि उत्साहाने हे पाऊल उचलत आहे, की मी अशा संस्थेत भूमिका बजावणार आहे ज्याची मूल्ये माझ्याशी खूप जवळून जोडलेली आहेत, जिथे “आम्ही कुटुंब आहोत”.

इंडियन प्रीमियर लीगमधील एक दिग्गज खेळाडू म्हणून कायरन पोलार्डकडे पाहिलं जातं. मुंबई इंडियन्सने त्याला २०१० साली करारबद्ध केलं होतं. तर २०२२ मध्ये कोलकाता संघाविरुद्ध त्याने शेवटचा आयपीएल सामना खेळला आहे.

आयपीएल रेकॉर्डचे गणित पाहता पोलार्डने एकूण 189 आयपीएल सामने खेळले आहेत, ज्यात 16 अर्धशतकांसह 3 हजार 412 धावा केल्या आहेत. पोलार्डच्या नावावर आयपीएलमध्ये एकूण 223 षटकार आहेत, तर गोलंदाजीतही त्याने कमाल केली आहे. एकूण 69 विकेट त्याने घेतल्या आहेत.

    follow whatsapp