Who is Mukesh Kumar : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दोन विकेट्स राखून रोमहर्षक विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. उभय संघांमधील दुसरा T20 सामना 26 नोव्हेंबर (रविवार) रोजी तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पण, विशाखापट्टनममध्ये भारताने साकारलेल्या विजयाचा खरा हिरो कोण आहे, हे तुम्हाला माहितीये का?
ADVERTISEMENT
विशाखापट्टणममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताच्या विजयानंतर इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग यांच्याबद्दल खूप चर्चा होत आहे. त्यांची चर्चा तर होणारच… कारण या तिन्ही खेळाडूंनी फलंदाजीतून छाप सोडली. पण, सामन्यातील आकड्यांचा खेळ बघितला तर टीम इंडियाच्या विजयाचा खरा हिरो होता वेगवान गोलंदाज मुकेश कुमार! एकीकडे भारतीय गोलंदाजांची ऑस्ट्रेलियन फलंदाज धुलाई करत असताना दुसरीकडे मुकेश कुमारने कांगारूंना बांधून ठेवले.
मुकेश कुमारने डेव्हिड-स्टॉयनिस रोखलं
मुकेश कुमारने चार षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 29 धावा दिल्या. त्याला एकही विकेट मिळाली नाही. पण, ऑस्ट्रेलियाच्या डावातील शेवटच्या षटकात मुकेशने केवळ 5 धावाच दिल्या. त्या षटकात टीम डेव्हिड आणि मार्कस स्टॉयनिस यांनी मोठे फटके मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण मुकेशच्या माऱ्यासमोर त्यांचे मनसुबे फौल ठरले. मुकेशचे ते शेवटचे षटक सामन्याच्या निकालाच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरले. तसेच भारताच्या विजयातील ते मोठे कारणही आहे.
कोण आहे मुकेश कुमार?
बिहारच्या गोपालगंजचा रहिवाशी असलेला मुकेश कुमार हा बंगालकडून डोमेस्टिक क्रिकेट खेळतो. 2014 मध्ये तो एका चाचणीसाठी हजर राहिला आणि त्याचे आयुष्यच बदलले. खरंतर, क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) एक ‘व्हिजन 2020 कार्यक्रम’ आयोजित करत होते, तिथे त्याला बंगालचे माजी वेगवान गोलंदाज आणि गोलंदाजी प्रशिक्षक रणदेव बोस यांनी बघितले. व्हीव्हीएस लक्ष्मण, वकार युनूस आणि मुथय्या मुरलीधरन यांच्या मार्गदर्शनाखाली या खेळाडूंच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या.
या चाचणीनंतर वर्षभरातच मुकेश कुमारची बंगाल संघात निवड झाली. त्याच्या सततच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे यावर्षी भारत-अ संघात निवड झाली. अ संघात त्याने उत्तम कामगिरी केली. त्याने न्यूझीलंड-ए विरुद्ध पाच विकेट घेतल्या. एका महिन्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी मुकेशची टीम इंडियात निवड झाली. 30 वर्षीय मुकेशने आतापर्यंत भारतासाठी एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि सहा टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
ADVERTISEMENT