राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंच्या टीम इंडियाने श्रीलंकेत आपली चमक दाखवली. ३ वन-डे सामन्यांची मालिका २-१ च्या फरकाने जिंकल्यानंतर टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड पहिली परीक्षा पास झाला. तिसऱ्या वन-डे सामन्यासाठी राहुल द्रविडने संघात भरघोस बदल करत संघात नवोदीत खेळाडूंना स्थान दिलं. ज्यावरुन सुनील गावसकर यांनी द्रविडच्या रणनितीवर टीकाही केली होती. आता या टीकेला द्रविडने प्रत्युत्तर दिलंय.
ADVERTISEMENT
राहुल द्रविडने तिसऱ्या वन-डे साठी भारतीय संघात ६ बदल केल्यानंतर सुनील गावसकर यांनी, सध्या भारतीय खेळाडूंना संघात सहज संधी मिळत असून ते यासाठी पात्र आहेत की नाही हे देखील पाहिलं जात नाहीये असं म्हटलं होतं. टी-२० मालिकेतही कृणाल पांड्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून त्याच्या संपर्कात आलेल्या ८ खेळाडूंना संधी नाकारण्यात आली. गावसकरांनी केलेल्या टीकेला उत्तर देत राहुल द्रविडने खेळाडू श्रीलंकेत सहलीसाठी आलेले नाहीत असं म्हटलं आहे.
“वन-डे सिरीज संपल्यानंतर आम्ही काही खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न केला. नक्कीच सध्याची परिस्थिती पाहता आम्हाला मालिका जिंकायच्या आधीच संघात बदल करावे लागले आहेत. पण माझं असं मानणं आहे की जर तुमची भारतीय संघात निवड झाली आहे, भले तुम्ही १५ जणांच्या संघात असाल किंवा २० जणांच्या संघात तर तुम्ही अंतिम ११ मध्ये खेळण्यासाठी पात्र आहात. निवड समितीने खेळाडूंना इथे येऊन खुर्ची गरम करायला किंवा सहलीसाठी नक्कीच निवडलेलं नाही.” दुसऱ्या टी-२० सामन्यात राहुल द्रविडने आपली प्रतिक्रीया दिली.
दरम्यान, दुसऱ्या टी-२० सामन्याआधी ऑल राऊंडर कृणाल पांड्याला झालेली कोरोनाची लागण, महत्वाच्या ८ खेळाडूंना संघाबाहेर जावं लागलं. अशा परिस्थितीत युवा खेळाडूंनिशी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसऱ्या टी-२० सामन्यात श्रीलंकेने भारतावर ४ विकेट राखून मात केली. या विजयासह श्रीलंकेने टी-२० मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
Good News : Krunal Pandya च्या संपर्कात आलेल्या आठही खेळाडूंना Corona ची लागण झालेली नाही
ADVERTISEMENT