मुंबई: यंदाच्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघाला हात हालवत मायदेशी परतावं लागलं ज्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघात महत्त्वाच्या बदलांना सुरुवात झाली आहे. या विश्वचषकाच्या आधीच विराटने टी-20 चं कर्णधार पद सोडणार असल्याची घोषणा केल्यानंतर या जागी मुंबईकर रोहित शर्माची वर्णी लागणार हे जवळपास निश्चित झालं होतं. अखेर यावर आज (9 नोव्हेंबर) शिक्कामोर्तब देखील झालं आहे. न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-20 सामन्यांसाठी आज निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली आहे. त्याचवेळी कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या नावाची देखील घोषणा करण्यात आली आहे. तसंच या टी-20 सीरीजसाठी विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
पाहा न्यूझीलंडच्या टी-20 सीरीजसाठी भारतीय संघात कोणाकोणाला देण्यात आलंय स्थान.
भारतीय संघ (T20I) : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेट-कीपर), इशान किशन (विकेट-कीपर), व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर. अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.
यावेळी न्यूझीलंडचा संघ हा भारताच्या दौऱ्यावर येणार असून 17 नोव्हेंबरपासून टी-20 मालिकेला सुरवात होणार आहे. अशावेळी कर्णधार रोहित शर्मासमोर प्रचंड मोठं आव्हान असणार आहे. आधीच भारतीय संघाला टी-20 वर्ल्डकपमधून ज्या पद्धतीने बाहेर पडावं लागलं त्याने भारतीय क्रिकेट चाहते हे प्रचंड हिरमुसले आहेत. अशावेळी भारतीय संघाला पुन्हा एकदा ट्रॅकवर आणण्याचं आव्हान रोहित समोर असणार आहे.
रोहित शर्मावर मोठी जबाबदारी
टी-20 क्रिकेटमध्ये रोहित शर्मा हा भारताचा सर्वात धडाकेबाज बॅट्समन म्हणून ओळखला जातो. त्यामुळे कर्णधार पदासोबतच त्याच्यावर टीम इंडियाच्या फलंदाजीची देखील मोठी जबाबदारी असणार आहे.
प्रचंड गुणवत्ता असलेला रोहित शर्माकडे भारतीय संघाची धुरा
खरं तर रोहित शर्मा हा प्रचंड गुणवत्ता असलेला खेळाडू आहे. पण सुरुवातीच्या काळात सातत्याचा अभाव असल्याने तो काहीसा मागे पडला होता. त्याच दरम्यान विराट कोहलीचा संघात बोलबाला होता. त्यामुळे सीनियर खेळाडू असूनही रोहितला विराटच्या नेतृत्वाखालीच खेळावं लागलं. मात्र, मागील काही वर्षात रोहित शर्माचा खेळ प्रचंड उंचावल्याने आणि त्यात सातत्यही आल्याने एक खेळाडू म्हणून त्याच्यातील नेतृत्व गुण देखील बहरत गेले. त्यामुळेच आता निवड समितीने रोहित शर्माकडे टी-20 संघाचं नेतृत्व हे रोहित शर्माकडे सोपावलं आहे.
दुसरीकडे विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम बॅट्समन असला तरीही तो कधीही यशस्वी कर्णधार बनू शकला नाही. त्याच्या नेतृत्वात आतापर्यंत भारतीय संघाला एकही ICC Trophy जिंकता आलेली नाही. त्यामुळेच आता भारतीय संघाच्या नेतृत्वात बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे.
रोहितच्या पाठिशी आयपीएलचा भरभक्कम अनुभव
आतापर्यंत विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्माने काही आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं आहे. पण मागील अनेक वर्षापासून रोहित शर्मा हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करत आला आहे. रोहित शर्माने कर्णधार म्हणून तब्बल 5 वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. त्यामुळे विजयी संघाचा समतोल कसा असला पाहिजे हे चांगलंचं ठावूक आहे. मात्र असं असलं तरीही आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करताना आतापर्यंत प्रत्येक कर्णधाराचा कस लागलेला आहे. अशावेळी संपूर्ण भारतीय संघाला आणि देशवासियांना देखील रोहितकडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत.
BCCI चा दिवाळी धमाका, टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची नियुक्ती
धावांच्या राशी रचणाऱ्या रोहितकडून भारतीय संघाला प्रचंड अपेक्षा
रोहित शर्मा हा आतापर्यंत 116 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. ज्यामध्ये त्याने 3038 रन्स केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने 4 वेळा शतक झळकावलं आहे. त्यामुळे एवढा दीर्घ अनुभव असलेला हा मुंबईकर कर्णधार भारतीय संघाला टी-20 फॉर्मेटमध्ये नक्कीच एका वेगळ्या उंचीवर नेईल अशी आशा करण्यास अजिबात हरकत नाही.
ADVERTISEMENT