भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाच्या खराब कामगिरीमुळे पाकिस्तानने १० विकेट राखून सामना जिंकला. आतापर्यंत वर्ल्डकपच्या इतिहासातला पाकिस्तानचा हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. भारतीय संघाच्या या खराब कामगिरीनंतर चाहते साहजिकच नाराज झाले आहेत. परंतू यापैकी काही चाहत्यांनी सोशल मीडियावर मोहम्मद शमीच्या निष्ठेविषयी शंका घेत त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
ADVERTISEMENT
पाकिस्तानकडूनच खेळायचं होतं तर निळी जर्सी घालून का उतरलास अशा प्रकारच्या कमेंट शमीच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर केल्या जात आहेत. परंतू भारतीय संघाकडून खेळणाऱ्या मोहम्मद शमीच्या खासगी आयुष्यात आतापर्यंत अनेक वादळं आली. परंतू या सगळ्या अडचणींवर मात करत शमी प्रत्येक वेळा मैदानात उतरला आणि त्याने आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. सोशल मीडियावर शमीला ट्रोल करणाऱ्या ट्रोलभैरवांना कदाचीत ही बाब माहिती नसेल की आपली मुलगी तापाने फणफणलेली असतानाही शमी टीम इंडियाकडून आपलं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरला होता.
जाणून घ्या काय घडलं होतं त्यावेळी नेमकं?
हा प्रसंग साधारण पाच वर्षांपूर्वीचा आहे. २०१६ मध्ये कोलकात्यामध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामना खेळवला जात होता. त्यावेळी शमीची १४ महिन्यांची मुलगी तापाने आजारी पडली होती. यावेळी शमीच्या मुलीला श्वास घ्यायलाही प्रॉब्लेम होत होता. त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. अशी परिस्थिती आलेली असतानाही शमी त्यावेळी मैदानात टिकून राहिला आणि त्याने आपलं कर्तव्य पूर्ण करत ६ विकेट घेत संघाच्या विजयात मोलाचं योगदान बजावलं.
BLOG : याला कारण एकच…आम्हाला पराभव सहन होत नाही !
मोहम्मद शमीच्या याच कामगिरीमुळे टीम इंडियाने तो सामना जिंकला होता आणि कसोटी क्रमवारीत संघ अव्वल स्थानावर पोहचला होता. महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रकारानंतर भारताच्या सर्व आजी-माजी खेळाडूंनी शमीला आपला पूर्ण पाठींबा दर्शवला आहे.
पाकिस्तानविरुद्ध सामन्यात भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक झाली. १५२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानी फलंदाजांनी लिलया बॅटींग केली. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती हे सर्व बिनीचे शिलेदार अपयशी ठरले. या स्पर्धेत भारताचा पुढचा सामना ३१ तारखेला न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.
ADVERTISEMENT