ऑस्ट्रेलियाचा दिग्गज स्पिनर शेन वॉर्न याचा मृत्यू शुक्रवारी म्हणजेच 4 मार्चला झाला. त्याच्या मृत्यूची चौकशी आता करण्यात येते आहे. शेन वॉर्नच्या पार्थिवाचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्यानंतर त्याच्या मृत्यूसंबंधीची माहिती समोर आली आहे. शेन वॉर्नचं निधन ही जगभरातल्या क्रिकेटप्रेमींसाठी दुःखद बातमी ठरली. अशात आता थायलँड पोलिसांनी एक पत्रक जारी केलं आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेन वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक आहे. आत्तापर्यंतच्या तपासात कोणतीही संशयास्पद बाब त्याच्या मृत्यू प्रकरणात आढळलेली नाही. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार थायलँडच्या पोलिसांना पोस्टमॉर्टेम रिपोर्टही मिळाला आहे. त्यामध्येही कारण हेच देण्यात आलं की त्याचा मृत्यू नैसर्गिक आहे.
52 वर्षांचा शेन वॉर्न थायलँडमध्ये सुट्टी एंजॉय करण्यासाठी गेला होता. मात्र 4 मार्चला त्याच्या निधनाचं वृत्त समोर आलं. शेन वॉर्न एका व्हिलामध्ये थांबला होता. त्याच व्हिलामधल्या खोलीत त्याला हृदयविकाराचा झटका आला. शेन वॉर्नला अँब्युलन्समधून रूग्णालयात घेऊन जात असतानाच त्याचा मृत्यू झाला. थायलँड पोलिसांनी या ठिकाणी काही चुकीचं घडलेलं असू शकतं असा संशय व्यक्त केला होता. मात्र आता पोस्टमॉर्टेमचा अहवाल आल्यानंतर त्यांनी शेन वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं म्हटलं आहे. थायलँड पोलिसांनी शेनचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या तीन मित्रांचीही चौकशी केली होती.
शेन वॉर्नने शेवटची कसोटी जानेवारी 2007 मध्ये खेळली होती. 1999 मध्ये तो ऑस्ट्रेलिया संघाचा उपकर्णधारही बनला होता पण त्याला कर्णधार होण्याची संधी कधीच मिळाली नाही. तसं, आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर, वॉर्नने प्रथमच आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व केलं होतं आणि आयपीएलच्या पहिल्या सीजनचं विजतेपदही पटकावून दिलं होतं.
जगातील महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने पाचच दिवसांपूर्वी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. शेन वॉर्नने युक्रेनच्या बाजूने संदेश लिहून रशियाची कारवाई पूर्णपणे चुकीची असल्याचे म्हटले होते. वॉर्नने ट्विट करून युक्रेनचे समर्थन देखील केले होते आणि रशियाची कारवाई पूर्णपणे चुकीची, अवास्तव आणि अन्यायकारक असल्याचेही म्हटले होते. शेन वॉर्नच्या अकाली निधनाने संपूर्ण क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला आहे. आपल्या कारकीर्दीत वॉर्नने आपल्या फिरकीच्या जोरावर क्रिकेट विश्वात आपला दबदबा निर्माण केला होता.
ADVERTISEMENT