T20 WC: दुबई: T20 विश्वचषकात न्यूझीलंड विरुद्ध भारताला अत्यंत लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. अशावेळी भारतीय संघाने ओपनिंगमध्ये केलेल्या बदलांवरुन टीम इंडिया आणि कर्णधार विराट कोहली यांच्यावर बरीच टीका सुरु आहे. अनेकांनी याबाबत प्रश्नही उपस्थित केले आहेत. रोहित शर्माऐवजी ईशान किशनला ओपनिंगसाठी का पाठविण्यात आलं? हा एकच सवाल भारतीय क्रिकेट चाहत्यांना सतावत आहे. कारण या एका निर्णयामुळेच संपूर्ण सामन्यावर परिणाम झाला असं अनेक क्रिकेट तज्ज्ञांचं देखील मत आहे.
ADVERTISEMENT
रोहितला तिसऱ्या क्रमांकावर पाठविण्याचा निर्णय का आणि कोणी घेतला? हा सवाल सातत्याने विचारला जात होता. ज्याचे उत्तर आता सापडले आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी पत्रकार परिषद घेतली.
ईशान किशनला सलामीला पाठवण्याच्या निर्णयावर विक्रम राठोड म्हणाले की, ‘सूर्यकुमार यादवच्या पाठीचे स्नायू दुखावल्याने तो सामना खेळण्यासाठी तंदुरुस्त नव्हता. त्यामुळे ईशान किशनला संघात स्थान देण्यात आलं आणि त्याला सलामीला पाठवण्याचा निर्णय हा टीम मॅनेजमेंटने घेतला होता. या निर्णयात रोहित शर्माचाही सहभाग होता.’
विक्रम राठोड पुढे म्हणाले की, ‘ईशान किशनने आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी केली आहे. तसेच सराव सामन्यात तो अधिक चांगला खेळत होता, त्यामुळे त्याला सलामीला पाठवण्यात आले होते. टी-20 वर्ल्ड कपसाठी भारताने ईशान किशनची राखीव सलामीवीर म्हणूनच निवड केली होती.’
न्यूझीलंडविरुद्ध केएल राहुलसोबत ईशान किशनला ओपनिंगसाठी पाठवण्यात आल्यानंतर सर्वांनीच या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं होतं. रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आणि विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. पण असं असलं तरीही टीम इंडियाची टॉप ऑर्डर न्यूझीलंडविरुद्ध अपयशी ठरली होती. अवघ्या 50 धावांमध्ये आघाडीचे 4 फलंदाज बाद झाले होते.
त्यामुळेच रोहित शर्माला ओपनिंगसाठी का पाठवण्यात आले नाही, असा सवाल सातत्याने विचारला जात होता.
वन-डे संघाच्या कर्णधारपदावरुनही विराटची गच्छंती? BCCI मध्ये हालचालींना सुरुवात
दरम्यान, भारतीय संघ पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पराभूत झाला आहे. दोन्ही सामने गमावल्यानंतर टीम इंडियाला उपांत्य फेरी गाठणे कठीण झाले आहे. भारताला आपले उर्वरित तीनही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील, तसेच अफगाणिस्तानलाही न्यूझीलंडविरुद्धचा एक सामना जिंकावा लागणार आहे.
ADVERTISEMENT