वंदना कटारियाने केलेल्या गोलच्या हॅटट्रीकच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमधलं आपलं आव्हान कायम राखलं आहे. आयर्लंडचा पराभव केल्यानंतर भारतीय महिलांनी ४-३ च्या फरकाने दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला. दक्षिण आफ्रिकेच्या महिलांचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलेलं आहे. तरीही या सामन्यात त्यांनी तीनवेळा भारतासोबत बरोबरी केली. परंतू त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले.
ADVERTISEMENT
वंदनाने या सामन्यात चौथ्या, १७ व्या आणि ४९ व्या मिनीटाला गोल केले. नेहा गोयलनेही ३२ व्या मिनीटाला गोल केला. संपूर्ण सामन्यात भारतीय महिलांनी बॉलवर चांगल्या पद्धतीने ताबा ठेवला होता, परंतू दक्षिण आफ्रिकेच्या आक्रमणाला थोपवणंही त्यांना जमलं नाही. साखळी फेरीत सर्व सामने गमावणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात चांगली झुंज दिली. टॅरीन ग्लासबाय, कॅप्टन एरिन हंटर आणि मारिझेन मारीस यांनी आफ्रिकेकडून गोल केले.
पॉईंट टेबलमध्ये भारतीय महिला संघ सध्या ६ गुणांनिशी चौथ्या स्थानावर आहे. आयर्लंड आणि ग्रेट ब्रिटन यांच्यातला सामना बाकी आहे. त्यामुळे आयर्लंडच्या महिला संघाने ब्रिटनवर मात केली तर भारतीय महिलांचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात येऊ शकतं. पहिल्या ३ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारतीय महिलांना बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी वाट पहावी लागणार आहे. परंतू आयर्लंडचा संघ जर आजचा सामना हरला तर ऑलिम्पिकच्या इतिहासात बाद फेरीत प्रवेश करण्याची भारतीय महिला हॉकी संघाची पहिलीच वेळ असणार आहे.
Tokyo Olympic 2020 : भारतीय हॉकी संघाची जपानवर ५-३ ने मात
ADVERTISEMENT