नैरोबीमध्ये सुरु असलेल्या अंडर-२० जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या शैली सिंहने रौप्य पदकाची कमाई केली. लांब उडी स्पर्धेत शैली सिंहने भारताला पदक मिळवून दिलं. शैली सुवर्ण पदकाच्या जवळ होती, मात्र फक्त एका सेंटीमीटरने तिचे सुवर्ण पदकं हुकलं.
ADVERTISEMENT
लांब उडी क्रीडा प्रकारात शैली सिंहने चमकदार कामगिरी करत रौप्य पदकावर नाव कोरलं. नैरोबीमध्ये सुरू असलेल्या अंडर-२० विश्व अॅथलेटिक्स स्पर्धेत शैलीने ही कामगिरी केली असून, या स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकणारी ती तिसरी खेळाडू ठरली आहे.
शैली सिंह महिलांच्या लांब उडी खेळात तब्बल ६.५९ मीटर लांब उडी घेत दुसऱ्या स्थानी राहिली. एक सेंटीमीटर अंतर पाठीमागे राहिल्याने तिला सुवर्ण पदक मिळवता आलं नाही. शैलीने पहिली व दुसरी लांब उडी ६.३४ मीटर अंतर पार केलं होतं. स्वीडनच्या माजा आस्कग हिने ६.६० सेंटीमीटर अंतर पार करत सुवर्ण पदकाची कमाई केली.
शैली सिंहने चॅम्पियनशिप स्पर्धेत ६.४० मीटर लांब उडी घेत पात्रता फेरीत पहिलं स्थान पटकावलं होतं. शैली सिंह बंगळुरूतील अंजू बॉबी जॉर्ज अॅकडमीमध्ये प्रशिक्षण घेतेय. अंजूचे पती बॉबी जॉर्ज तिचे प्रशिक्षक आहेत.
या चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताची कामगिरी चांगली राहिली आहे. भारताने तीन पदकं जिंकली आहेत. दोन वर्षाच्या अंतराने होणाऱ्या या स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकूण सात पदकं जिंकली आहेत. ज्यात दोन सुवर्ण, २ रौप्य आणि ३ कांस्य पदकांचा समावेश आहे. यापैकी एक रौप्य आणि दोन कांस्य चालू स्पर्धेतील आहेत.
संघर्षपूर्ण वाटचाल
मूळची झांसीच्या असलेल्या शैलीचं आयुष्य सुरुवातीपासूनच संघर्षपूर्ण राहिलेलं आहे. शैलीची आई शिलाई काम करते. त्यामुळे शैलीला सुरुवातीपासून आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. या अडचणींवर मात करत शैलीने आपला ठसा उमटवला आहे. २०१७ मध्ये शैली अंजू बॉबी जॉर्ज फाऊंडेशनसोबत जोडली गेली. त्यांनतर तिची घोडदौड सुरू झाली. शैलीने लांब उडी खेळ प्रकारात अनेक वेळा ज्युनिअर स्पर्धांतील राष्ट्रीय विक्रम मोडीत काढले आहेत.
ADVERTISEMENT