आयसीसीने बुधवारी (२६ ऑक्टोबर) नवीन टी-२० क्रमवारी जाहीर केली. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला या क्रमवारीत बंपर फायदा झाला आहे. फलंदाजीच्या क्रमवारीत कोहलीने थेट ९व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात नाबाद ८२ धावांची खेळी केली, त्याचा परिणाम त्याच्या क्रमवारीतही दिसून आला आहे.
ADVERTISEMENT
नुकत्याच झालेल्या आशिया कप २०२२ च्या आधी विराट कोहली धावांसाठी झगडत होता. परिणामी, ३३ वर्षीय कोहली गेल्या ऑगस्टमध्ये क्रमवारीत ३५ व्या स्थानावर घसरला होता. पण एका महिन्याच्या ब्रेकने सर्व काही बदलून टाकले आहे. ब्रेकमधून पुनरागमन केल्यानंतर कोहली पुन्हा जुन्या फॉर्ममध्ये आला आहे. आशिया चषक २०२२ मध्ये, तो मोहम्मद रिझवाननंतर सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू होता. आता कोहली अवघ्या दोन महिन्यांनंतर टॉप-१० मध्ये परतला आहे.
डेव्हॉन कॉनवेने सूर्याला मागे टाकलं
फलंदाजी क्रमवारीत पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान अव्वल स्थानावर कायम आहे. मात्र, भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादवला एक स्थान गमवावे लागले असून तो आता तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवेने सूर्यकुमार यादवच्या जागी स्थान मिळवले आहे. कॉनवेने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद ९२ धावांची खेळी केली. पाकिस्तानचा कर्णधार बाबर अझमानं चौथ्या, तर दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम पाचव्या क्रमांकावर आहे.
गोलंदाजीच्या क्रमवारीत मोठा फेरबदल
गोलंदाजीच्या क्रमवारीत मोठा बदल झाला आहे. अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खानने जोश हेझलवूडला मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे. सध्याच्या विश्वचषकात हेझलवूडने ऑस्ट्रेलियाकडून आतापर्यंत दोन सामन्यांत तीन बळी घेतले होते, पण या काळात तो महागडाही ठरला. दुसरीकडे, श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगा तीन स्थानांनी घसरून सहाव्या स्थानावर आला आहे, तर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज सॅम कुरन अफगाणिस्तानविरुद्ध विक्रमी पाच बळी घेत आठ स्थानांनी घसरून आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. भुवनेश्वर कुमारला गोलंदाजी क्रमवारीत फायदा झाला आहे. भुवीने आता दोन स्थानांची झेप घेत दहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
हार्दिक पांड्यालाही झाला फायदा
दुसरीकडे, भारतीय खेळाडू हार्दिक पंड्याला अष्टपैलू क्रमवारीत फायदा झाला आहे. 29 वर्षीय खेळाडूने अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत आता तीन स्थानांनी झेप घेत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. पंड्याने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात गोलंदाजीत तीन बळी घेतले आणि फलंदाजीत ताकद दाखवत ४० धावांचे योगदान दिले. बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसन अव्वल अष्टपैलू खेळाडू आहे. त्याचवेळी अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबी दुसऱ्या स्थानावर आहे. नबी आणि शाकिबच्या रेटिंग गुणांमध्ये केवळ १४ चा फरक आहे.
ADVERTISEMENT