उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनमधील मतभेदामुळे आणि काही गंभीर आरोप करण्यात आल्याने भारताचा माजी ओपनर आणि उत्तराखंडच्या टीमचा कोच वसीम जाफरने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उत्तराखंड संघाचे सचिव महिम वर्मा यांनी जाफरवर असा आरोप केला होता की, त्यांनी टीम निवडताना धर्माच्या आधारावर निवड केली. दरम्यान, हे सगळे आरोप अत्यंत चुकीचे असल्याचे जाफरने म्हटलं आहे. यासंबंधी त्याने ट्वीट देखील केलं आहे. यावेळी जाफरने असं म्हटलं आहे की, ‘सचिव महिम वर्मा यांनी असे आरोप केले मी की मुस्लिम खेळाडूंना संघात स्थान दिलं. पण त्यांच्या या आरोपामुळे मला खूप त्रास झाला आहे.’ मात्र क्रिकेटच्या मैदानातील हा प्रकार अत्यंत धक्कादायक असल्याचं अनेक क्रिकेट चाहत्यांचं म्हणणं आहे.
ADVERTISEMENT
जाफरने याबाबत बोलताना असं म्हटलं आहे की, ‘माझ्या विरुद्ध जे धर्मावरुन आरोप करण्यात आले त्यामुळे मी फार दु:खी आहे. मी इकबाल अब्दुल्लाचं समर्थन करतो आणि मला त्यालाच कर्णधार बनवायचं होतं ही गोष्टच मुळी चुकीची आहे. खरं तर मला जय बिस्टा याला कर्णधार बनवायचं होतं. पण निवड समितीच्या सदस्यांनी इकबाल हाच कर्णधार असायला हवं असं सांगितलं.
याशिवाय नमाज पठाणावरुन करण्यात आलेल्या आरोपाबाबत देखील जाफर म्हणाला की, ‘मी मौलवींना बोलावलं नव्हतं. त्यामुळे मी त्यांना बोलावून नमाज पठण केलं ही गोष्ट चुकीचं आहे.’
याशिवाय त्याने जय श्रीराम आणि जय हनुमान या घोषणांवरुन केलेल्या टीकेला देखील उत्तर दिलं. ‘आमच्या संघात कधीही जय श्रीराम किंवा जय हनुमान अशा घोषणा देण्यात आलेल्या नव्हत्या. आम्ही प्रॅक्टिक्स करताना दोन खेळाडू हे शीख धर्मातील एक नारा द्यायचे. त्यामुळे मी तेव्हा एवढंच सांगितलं की, आपण आता एखाद्या धर्मासाठी नाही तर उत्तराखंडसाठी खेळत आहोत. त्यामुळे आपल्याला उत्तराखंडसंबंधी घोषणा देणं आवश्यक आहे. आपण ‘गो उत्तराखंड’, कम ‘ऑन उत्तराखंड’ अशा घोषणा द्यायला हव्या.
जून २०२० मध्ये उत्तराखंड क्रिकेट संघाचा कोच म्हणून वसीम जाफर याची निवड करण्यात आली होती. यावेळी त्याच्यासोबत एक वर्षाचा करार करण्यात आला होता. पण हा करार पूर्ण होण्याआधीच जाफरने आपल्या कोच पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली टुर्नामेंटमध्ये उत्तराखंडचा संघ हा खेळला होता. त्यावेळी संघाचा कोच हा वसीम जाफरच होता.
ADVERTISEMENT