‘ही सगळी बंडलबाजी’; अशोक चव्हाणांचा एकनाथ शिंदे-अजित पवारांना ‘डोस’
या दोन्ही बंडावर बोलताना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना डोस दिले. नांदेडमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी दोन्ही नेत्यांनी केलेल्या बंड करण्यावेळी दिलेली कारणे म्हणजे बंडलबाजी आहेत, अशा शब्दात समाचार घेतला.
ADVERTISEMENT

Maharashtra politics : आधी एकनाथ शिंदे यांचं बंड आणि नंतर अजित पवारांचं… या दोन बंडांनी महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. शिंदेंनी बंडानंतर अजित पवारांविरोधात सूर आळवला, तर अजित पवारांनी विकासाचा मुद्दा पुढे केला. या दोन्ही बंडावर बोलताना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना डोस दिले. नांदेडमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी दोन्ही नेत्यांनी केलेल्या बंड करण्यावेळी दिलेली कारणे म्हणजे बंडलबाजी आहेत, अशा शब्दात समाचार घेतला.
नांदेड येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, “देशात आणि राज्यात राजकीय प्रदूषण प्रचंड वाढलंय. महाराष्ट्रासारख्या राज्यावरही तेच अनुभवण्याची वेळ यावी, हे मोठे दुर्दैव आहे. राज्याची राजकीय परिस्थिती मी फार जवळून बघितली. वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, ए.आर. अंतुले, बाबासाहेब भोसले, शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे अशा मान्यवरांची कारकिर्द, त्यांची भूमिका, काम करण्याची पद्धत, महाराष्ट्राचा झालेला विकास हे सारं मी जवळून पाहिलं. त्यामुळे तो कालावधी आणि आजची परिस्थिती पाहिल्यानंतर नेमकं काय चाललं ते लक्षात येत नाही. स्तर सोडून जे सुरू आहे ते खरंच लोकांना आवडतंय का? जे काही चाललंय ते महाराष्ट्राच्या जनतेला आवडलेलं नाही आणि आवडणार नाही, अशी माझी ठाम भूमिका आहे”, असे भाष्य अशोक चव्हाण यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर केले.
‘आत्मपरिक्षण करा’, चव्हाणांचा शिंदे-पवारांना सल्ला
अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, “क्षेत्र कोणतेही असो काम करताना प्रत्येकाची कमिटमेंट असायला हवी. जे सांगतात की आम्ही समाजसेवेसाठी इकडून तिकडे गेलो, तिकडून इकडे आलो ही सगळी बंडलबाजी आहे. देशात आणि राज्यात केवळ सोयीचं राजकारण चाललं आहे. सार्वजनिक जीवनात काम करताना आपला हेतू काय? आपली कमिटमेंट काय? समाजाप्रती आपण काय देणं लागतो? आपण जे करतो आहोत ते योग्य आहे की अयोग्य आहे? याचं आत्मपरीक्षण करावं. आज जे काही चाललंय ते सगळं कमिटमेंट सोडूनच चाललं आहे.”
वाचा >> Wife Swapping : ‘तू माझ्या मित्रासोबत झोप, मी त्याच्या पत्नीसोबत…’, उच्चभ्रू सोसायटीतील घटना
“राजकारणाचा स्तर घसरत चालला आहे. ‘आयपीएल’प्रमाणे ऑक्शन सुरू आहे. या ऑक्शनमध्ये सगळ्या गोष्टी बाजूला सारून इकडून तिकडे, तिकडून तिकडे सुरू आहे. दुर्दैवाने पक्षांतरबंदी कायद्याची पायमल्ली होऊन गेली. कोणी बघायला तयार नाही. कोर्टात फक्त तारिख पे तारिख सुरू आहे. राजकारणाची दिशा भरकटली आहे. माणूस भेटल्यावर विचार करावा लागतो हा नेमका कोणत्या पक्षात आहे? आणि पक्षात सुद्धा कोणत्या गटात आहे?”, असं खोचक भाष्य अशोक चव्हाण यांनी केले.
वाचा >> खातेवाटप होताच आदित्य ठाकरे शिवसेनेच्या ‘त्या’ आमदारांना काय बोलले?
आता एकनाथ शिंदेंनी परत यावं, चव्हाण काय बोलले?
शिवसेनेच्या आमदारांनी बंडानंतर अजित पवारांवर ठपका ठेवला. अजित पवार स्वतःचा पक्ष मोठा करत आहेत, शिवसेना संपवत आहे, असा सूर शिंदे आणि समर्थक खासदारांचा होता. त्यावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, “वित्त विभाग दादांकडे असल्याने आमच्यावर अन्याय झाला, अशी सबब सांगून काही आमदार उद्धवजींना सोडून गेले. पण ज्या दादांमुळे ते सोडून गेले, तेच दादा आज पुन्हा राज्याचे अर्थ मंत्री झाले आहेत. त्यामुळे या मंडळींनी आता परत यायला हरकत नाही. त्यासाठी त्यांना हे कारण पुरेसं आहे. पण त्यांना घ्यायचं की नाही, हा शिवसेनेचा प्रश्न आहे. त्यावर मी काही सांगणार नाही.”