डोंबिवलीतील हाय प्रोफाइल सोसायटीतून चिमुकल्याचं अपहरण, फक्त 3 तासात पोलिसांनी कसं शोधलं आरोपींना?
डोंबिवलीतील हाय प्रोफाइल सोसायटीतून एका 7 वर्षीय मुलाचं अपहरण करण्यात आलं. पण डोंबिवली पोलिसांनी अवघ्या 3 तासांच्या आता आरोपींना अटक करून मुलाची सुटका केली.
ADVERTISEMENT

डोंबिवली: डोंबिवली परिसरात एका बांधकाम व्यावसायिकाच्या 7 वर्षीय मुलाचे सकाळी रिक्षातून शाळेत नेत असताना 2 कोटींच्या खंडणीसाठी अपहरण झाल्याची घटना समोर आली. घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी अल्पवयीन मुलाची सुखरूप सुटका करून अवघ्या साडेतीन तासात दोन अल्पवयीन मुलांसह चार आरोपींना अटक करण्यात यश मिळविले. या झटपट कारवाईबाबत अपहरण केलेल्या मुलाच्या वडिलांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.
मानपाडा पोलिसांनी रिक्षाचालक वीरेन पाटील (25) आणि त्याच्या साथीदारासह अन्य दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, महेश भोईर हे कुटुंबासह डोंबिवलीतील रिजन्सी अनंतम येथे राहतात, त्यांना 7 वर्षांचा मुलगा आहे. दररोजप्रमाणे आज सकाळीही महेश भोईर यांच्या मुलाला शाळेत घेऊन जाण्यासाठी रिक्षाचालक घरी आला आणि मुलाला रिक्षात बसवून घेऊन गेला. मात्र, शाळेत पोहोचण्यापूर्वीच अपहरणकर्त्यांनी सुनियोजित पद्धतीने मुलाचे अपहरण केले. रिक्षाचालक वीरेन पाटील याने अगोदरच रेकी करून ही घटना घडवून आणल्याचा संशय आहे.
हे ही वाचा>> संतोष देशमुखांना असं मारलं.. 15 Video ची मिनिट टू मिनिट माहिती, तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल!
मानपाडा पोलीस ठाण्यात सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास 7 वर्षाच्या मुलाचे शाळेत जात असताना 2 कोटींच्या खंडणीसाठी मुलाचे अपहरण झाल्याची बातमी मिळाली. खंडणीसाठी मुलाचे अपहरण करणाऱ्या आरोपीने पैसे न दिल्यास मुलाला जीवे मारण्याची धमकी तसेच पोलिसांनाही माहिती देऊ नका असे सांगितले होते.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी मानपाडा पोलीस ठाण्यात अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याची माहिती मिळताच मानपाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 5 वेगवेगळी तपास पथके तयार करून अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात रवाना केले.
हे ही वाचा>> "ती भांडायची, सर्कीटसारखी वागायची...", पत्नीला मारून सुटकेसमध्ये टाकणाऱ्या आरोपीचे वडील काय म्हणाले?
तपासात फिर्यादी महिला कोमल महेश भोईर हिच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी कसून तपास करून अपहृत मुलाला शाळेत घेऊन जाणारा संशयित रिक्षाचालक विरेन पाटील याला ताब्यात घेतले. त्यानुसार पोलिसांनी वीरेनची तांत्रिक माहिती मिळवली. मिळालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून वीरेन पाटील आणि रिक्षाचा माग काढला आणि अवघ्या साडेतीन तासात सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथून अपहरण झालेल्या मुलाची सुखरूप सुटका केली.
अपहृत मुलाला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले असून, या गुन्ह्यात सहभागी असलेल्या दोन अल्पवयीन मुलांसह चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून अन्य आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. सध्या आरोपींची चौकशी सुरू असून, मानपाडा पोलिसांची तत्पर कारवाई व सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कल्याण विभाग 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, पोलीस निरीक्षक गुन्हे रामचंद्र चोपडे, हेमंत ढोले, स्वाती जगताप व त्यांच्या पथकाने बालकाला वाचविण्यात उत्कृष्ट कामगिरी बजावली.