साताऱ्याच्या 'त्या' पोरांनी थायलंडमध्ये जाऊन केला बलात्कार, त्या रात्री काय घडलं?

मुंबई तक

Satara News: साताऱ्यातल्या कोरेगाव तालुक्यातून सहा मित्र थायलंड देशात फिरण्यासाठी गेले होते. 14 मार्चला तिथल्या रिन बीचवर फुल मून पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्या पार्टीनंतर काय घडलं, वाचा...

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

साताऱ्यातील दोघांनी थायलंडमध्ये जाऊन केले तरूणीवर अत्याचार

point

बिचवरील पार्टीनंतर मद्यधुंद तरूणीवर बलात्कार

point

अत्याचार करुन पळून गेलेल्या तरूणांना थायलंड पोलिसांनी कसं पकडलं?

Satara Thailand News : थायलंडला भारतभरातून हजारो पर्यटक दरवर्षी फिरायला जात असतात. मात्र, साताऱ्यातल्या दोन जणांनी थायलंडमध्ये असं काही कृत्य केलंय ज्याने संपूर्ण देशाचीचं मान शरमेने खाली गेलीय. साताऱ्यातल्या विजय घोरपडे (47) आणि राहुल भोईटे (40) या दोन जणांनी थायलंडमध्ये एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडलीय. तिथल्या बीचवरच्या फुल मून पार्टीत या नराधमांनी त्या 24 वर्षीय तरुणीवर अत्याचार केला. तसंच तिला बेशुद्धावस्थेत तिथेच सोडून पळ काढला. पण, थायलंड पोलिसांनी या नराधमांना शोधलं आणि कारवाई केली. नेमकं थायलंडच्या रिन बीचवर त्या रात्री काय घडलं? या दोन तरूणांना काय शिक्षा होईल असे अनेक प्रश्न सध्या पडले आहेत.

साताऱ्यातल्या कोरेगाव तालुक्यातून सहा मित्र थायलंड देशात फिरण्यासाठी गेले होते. 14 मार्चला तिथल्या रिन बीचवर फुल मून पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या पार्टीत ही जर्मन तरुणी तिच्या मित्रांसोबत आली होती. ही पार्टी पहाटेपर्यंत सुरु होती. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास विजय घोरपडे आणि राहुल भोईटे यांनी या तरुणीला बीचवरच्या एका खडकावर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तरुणी बेशुध्द झाली. हे पाहून त्या दोघांनी तिथून पळ काढला.  

पोलीसांनी या नराधमांना कसं शोधलं? तर, कोह फांगन पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला रीन बीचवरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. जर्मन तरुणीने आरोप केल्याप्रमाणे गुन्ह्याच्या ठिकाणावरुन पळून जाणाऱ्या दोन संशयित भारतीय पुरुषांची ओळख पटवली. हे दोन्ही भारतीय पुरुष रिन बीचवरुन कोह फांगनकडे मोटारसायकलने गेले. कोह फांगन जिल्ह्यातल्या गाव क्रमांक 1 मधल्या बंगल्यात ते राहिले. त्यानंतर 15 मार्चला कोह फांगन पोलीस ठाण्यात या दोघांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं. तेव्हा या दोघांनी पोलीसांना उडवाउडवीची उत्तरं दिली. जर्मन तरुणी शुद्धीवर नसल्यामुळे ओळख पटत नव्हती. त्यामुळे या दोघांना आपल्या निवासस्थानी परतण्याची परवानगी पोलीसांनी दिली.  

हे ही वाचा >> Personal Finance: 1 एप्रिलपासून आनंदाची बातमी, नोकरदारांना होणार तब्बल 80,000 रुपयांचा फायदा

त्यानंतर 16 मार्चला पीडित जर्मन तरुणी शुद्धीवर आली. तेव्हा तीने सांगितलं की, "ती कोह सामुई इथल्या बो फूटमधल्या एका हॉटेलमध्ये राहत होती. ती फुल मून पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी बेटावर गेली. रात्रभर पार्टी सुरु होती, त्यानंतर समुद्र किनाऱ्यापासून जवळच असलेल्या एका बंगल्याजवळच्या खडकाळ भागात आपल्यावर दोन पुरुषांनी अत्याचार केले. अत्याचार  करणारे दोघंही भारतीय होते, ही घटना घडल्यानंतर दोघं तिथून पळून गेले जाण्याआधी आपल्यावर हल्ला करुन आपल्याला जखमी केलं, हे सगळं घडलं तेव्हा आपण दारूच्या नशेत होतो," असं जर्मन तरुणीने पोलीसांना सांगितलं. 

त्यामुळे पोलिसांनी विजय घोरपडे आणि राहुल भोईटे या दोघांना परत चौकशीसाठी बोलावून घेतलं. त्यावेळी तरुणीने या दोघांची ओळख पटवली. यानंतर पोलिसांनी घोरपडे आणि भोईटे यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. त्यावेळी विजय घोरपडेने केलेला गुन्हा मान्य केला. तर राहुल भोईटेने फक्त मिठी मारली आणि चुंबन घेतलं, बलात्कार केला नाही, असं सांगितलं. मात्र, तरुणीने दोघांवरही बलात्काराचा आरोप केला. यानंतर पोलिसांनी हिंसा करुन बलात्कार केल्याप्रकरणी या दोघांवर गुन्हा दाखल केला. 

हे ही वाचा >> PBKS vs GT: श्रेयस अय्यरला शतकापासून रोखलं पण पठ्ठ्याने पंजाबला जिंकवलं, कोण आहे शशांक सिंग?

संबंधित पीडित तरुणी येत्या काही दिवसांत जर्मनीला परतणार आहे. त्यापूर्वी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थायलंड पोलिसांनी सध्या विजय घोरपडे आणि राहुल भोईटे यांना तुरुंगात डांबलंय. 

थायलंडमधल्या कायद्यानुसार, अत्याचार हा गंभीर गुन्हा मानला जातो. त्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. थायलंडच्या दंड संहितेच्या कलम 276 ते 281 नुसार अत्याचाराच्या गुन्ह्यासाठी 4 ते 20 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 40 लाख बाथ म्हणजे 1 कोटींपेक्षा जास्त रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. जर पीडितेला गंभीर इजा झाली असेल, तर जन्मठेप किवा मृत्युदंडाची शिक्षाही होऊ  शकते. 

साताऱ्यातला कोरेगाव तालुका हा तसा अनेक वैशिष्ट्यांसाठी ओळखला जातो. मात्र, आता या घटनेमुळे कोरेगाव तालुक्याच्या लौकीकाला डाग लागलाय. तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा.

हे वाचलं का?

    follow whatsapp