Narendra dabholkar murder case verdict : दाभोलकर हत्या प्रकरणात दोघांना जन्मठेप! तिघे निर्दोष

मुंबई तक

ADVERTISEMENT

नरेंद्र दाभोळकर प्रकरणात तिघांची निर्दोष सुटका.
नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा ११ वर्षानंतर निकाल

point

तीन आरोपींची निर्दोष सुटका

point

दोघांना सश्रम जन्मठेप आणि प्रत्येकी पाच लाखांचा दंड

Narendra Dabholkar murder Verdict News : (ओंकार वाबळे, पुणे) डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने आज निकाल दिला. न्यायालयाने तीन आरोपींची निर्दोष सुटका केली. दोन जणांना दोषी ठरवत जन्मठेप आणि प्रत्येकी पाच लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. (Sharad kalaskar and Sachin andure who shot Narendra Dabholkar sent to life time imprisonment)

ADVERTISEMENT

दाभोलकर हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड वीरेंद्र तावडे हा असल्याचे आरोपपत्रात म्हटलेले आहे. पण, त्याच्याविरोधात शंका उपस्थित झाल्या. गुन्ह्यात मुख्य सहभाग असल्याचा हेतू व्यक्त होतो आहे, असे सांगत न्यायालयाने पुराव्याअभावी तावडेला निर्दोष मुक्त केले.

विरेंद्रसिंह तावडेवर कट रचल्याचा आरोप आहे. परंतु सरकारी पक्ष पुरावे सादर करण्यात अपयशी ठरले. त्याचबरोबर विक्रम भावे आणि ॲड. संजीव पुनाळेकर यांच्याविरोधात आरोप सिद्ध करू न शकल्याने न्यायालयाने त्यांनाही निर्दोष सोडले. म्हणजेच या प्रकरणातील पाच पैकी तीन आरोपींची निर्दोष सुटका झाली. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सचिन अंदुरे (छत्रपती संभाजीनगर), शरद कळसकर (जालना) यांनी दाभोलकर यांची हत्या केल्याचे सिद्ध होत असल्याचे सांगत न्यायालयाने दोषी ठरवले. या प्रकरणात फाशीची शिक्षा होऊ शकत नाही, असे न्यायालयाने निकालात सांगताना दोघांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्याचबरोबर दोघांना प्रत्येकी पाच लाख रुपये दंड ठोठावले आहे.

उच्च न्यायालय, सुर्वोच्च न्यायालयात जाणार

दरम्यान, हा निकाल आल्यानंतर अंनिसचे कार्याध्यक्ष मिलिंद देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली. हा निकाल अंतिम नाही. आम्ही उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

हत्या कधी आणि कशी?

पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबवले आणि पिस्तूल काढून गोळ्या त्यांच्यावर झाडल्या.

ADVERTISEMENT

आरोपपत्रात काय नमूद आहे?

दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास पुणे शहर पोलिसांसह सुरुवातीला दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केला. 

त्यानंतर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे म्हणजेच सीबीआयकडे तपास सोपविण्यात आला. दाभोलकर हत्या प्रकरणात सनातन संस्थेशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे (सातारा), सचिन अंदुरे (छत्रपती संभाजीनगर), शरद कळसकर (जालना), विक्रम भावे आणि ॲड. संजीव पुनाळेकर (दोघे मुंबई) यांना अटक करण्यात आली होती.

हेही वाचा >> "तुतारीचा एवढाच पुळका असेल, तर मंत्रि‍पदाचा राजीनामा द्या", शिंदेंच्या आमदाराने भुजबळांना सुनावलं

त्यांच्याविरुद्ध पुण्यातील विशेष सीबीआय न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. डॉ. तावडेला पनवेलमधील सनातन संस्थेच्या आश्रमातून अटक करण्यात आली होती. 

विक्रम भावे याने दाभोलकरांच्या हत्येपूर्वी घटनास्थळाची पाहणी केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. ॲड. पुनाळेकर यांनी दाभोलकर यांच्यावह गोळ्या झाडणारे आरोपी सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना पिस्तूल खाडीत फेकून नष्ट करण्याचा सल्ला दिला होता, असे आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आले होते.

हत्या प्रकरणाचा कट कसा उलगडला?

या प्रकरणाचा तपास हा पोलिसांसमोर मोठे आव्हानच होते. पुणे पोलिसांनी सर्व शक्यता गृहीत धरून तपास केला. मात्र, हाती ठोस काही लागले नव्हते. वर्षभरानंतरही मारेकरी न सापडल्याने पत्रकार केतन तिरोडकर यांनी संबंधित तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्याची मागणी न्यायालयात जनहित याचिकेद्वारे केली होती.

हेही वाचा >> बारामतीतील मतदानानंतर शरद पवारांबद्दल अजित पवारांची भाषा का बदलली?

दरम्यान, बंगळुरूमध्ये पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणात कर्नाटकातील दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पुण्यातील चिंचवड परिसरातून अमोल काळे याला ताब्यात घेतले. काळे सनातन संस्थेशी संबंधित आहे. त्याच्याकडून नालासोपारा येथील वैभव राऊतची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याच्या घरातून शस्त्रे आणि स्फोटकांचा साठा जप्त केला.

त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शरद कळसकरला ताब्यात घेतले. कळसकरने सचिन अंदुरेच्या मदतीने डॉ. दाभोलकर यांचा खून केल्याची कबुली दिली.

‘सीबीआय’ने काय केला होता युक्तिवाद?

दाभोलकर यांची हत्या करून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा हेतू होता. या खटल्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी आरोपींना न्यायालयात ओळखले आहे. दाभोलकर यांचे पुत्र डॉ. हमीद दाभोलकर, ‘अंनिस’चे कार्यकर्ते प्रशांत पोतदार आणि कोल्हापूर येथील व्यावसायिक संजय साडविलकर यांच्या साक्षीतून सनातन संस्था आणि आरोपी तावडे यांच्या मनात दाभोलकरांविषयी शत्रुत्वाची आणि द्वेषाची भावना होती, हे सिद्ध झाले आहे.

त्यांच्यावर गोळ्या झाडणारे आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी छायाचित्रासह न्यायालयात ओळखले आहे. आरोपी अंदुरेने गुन्हा केल्याचा कबुलीजबाब दिला आहे. 

दाभोलकरांवर गोळ्या झाडण्यासाठी आरोपींनी वापरलेले पिस्तूल जप्त झाले नाही. मात्र, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी पिस्तुलातून गोळीबार झाल्याचे सांगितले आहे. दाभोलकरांच्या मृतदेहातून दोन गोळ्या बाहेर काढण्यात आल्याचे ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांनी न्यायालयात सांगितले आहे. त्यामुळे गोळीबार झाल्याचे सिद्ध होते,’ असे ‘सीबीआय’चे वकील ॲड. प्रकाश सूर्यवंशी यांनी युक्तिवादात नमूद केले होते.

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT