PM Modi : "मी हिंदू-मुस्लीम करायला लागलो, तर...", स्वतःच्या भाषणावर मोदी काय बोलले?
PM Modi on Hindu-Muslim : काँग्रेसच्या जाहिरनाम्यात गरिबांची संपत्ती घेऊन ज्यांना जास्त मुलं आहेत, जे घुसखोर आहेत, त्यांना वाटण्याचा मुद्दा आहे, असे मोदी म्हणालेले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुस्लिमांबद्दल पंतप्रधान मोदी काय बोलले?

काँग्रेसच्या जाहिरनाम्यावर मोदींनी काय केलेली टीका
PM Modi on Muslims : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राजस्थानमधील बन्सवाडा येथील एका भाषणाने एनडीएच्या प्रचाराच्या दिशाच बदलली. राजस्थानमधील बन्सवारा या मतदारसंघात २१ एप्रिल रोजी घेतलेल्या प्रचार सभेत मोदींनी एक वक्तव्य केलं. आपल्या भाषणामध्ये मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली. काँग्रेसचा जाहीरनाम्यात माओवाद दिसत असल्याचं मोदी म्हणाले. प्रत्येकाच्या संपत्तीचा हिशोब केला जाईल आणि ती सगळ्यांना समान पद्धतीने वाटली जाईल. तुमची संपत्ती ज्यांना जास्त मुलं आहेत, जे घुसखोर आहेत त्यांना काँग्रेस वाटणार असं मोदी म्हणाले होते. त्यानंतर प्रचारात मोदी हा मुद्दा सातत्याने मांडत आहे. दरम्यान, मोदी हिंदू-मुस्लीम असं ध्रुवीकरण करत आहेत, असा आरोप काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी केला. त्यावर आता मोदींनी भाष्य केलं आहे. (The speech for which the Prime Minister modi is giving clarification was given by him in an election rally in Banswara, Rajasthan.)
मोदी त्यांच्या भाषणाबद्दल काय म्हणाले, हे पाहण्याआधी मोदी राजस्थानातील सभेत काय बोलले होते, हे जाणून घेऊयात.
"यावेळचा काँग्रेसचा जाहीरनामा बघा. काँग्रेसने जाहीरनाम्यात जे सांगितलं आहे, ते चिंताजनक आहे. गंभीर आहे. आणि हा माओवाद आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी म्हटलं आहे की, जर काँग्रेसचे सरकार आले, तर प्रत्येकांच्या संपत्तीचे सर्वेक्षण केले जाईल. आपल्या बहिणींकडे किती सोने आहे, ते तपासलं जाईल. त्याचा हिशोब केला जाईल."
"आदिवासी कुटुंबाकडे चांदी असते, त्याचा हिशोब केला जाईल. सरकारी नोकरदारांकडे किती संपत्ती आहे, त्याची चौकशी केली जाईल. इतकंच नाही, पुढे काय म्हटलं आहे की, बहिणींकडचे जे सोने आहे आणि इतर जी संपत्ती, ती सगळ्यांना समान पद्धतीने वाटली जाईल."
"माता भगिनींच्या आयुष्यात सोने दाखवण्यासाठी नसते. ते स्वाभिमानाशी जोडलेले आहे. तिचे मंगळसूत्र फक्त सोन्याच्या किंमतीचा मुद्दा नाहीये. तिच्या जीवनाच्या स्वप्नाशी जोडलेला मुद्दा आहे. तुम्ही ते हिसकावून घेणार असल्याचे सांगत आहात, जाहीरनाम्यात."
"सोने घेऊन टाकू आणि सगळ्यांना वाटून टाकू. आणि पूर्वी जेव्हा त्यांचे सरकार होते, तेव्हा त्यांनी म्हटले होते की, देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. याचा अर्थ ही संपत्ती एकत्रित करून कुणाला वाटणार? ज्यांना जास्त मुलं आहेत, त्यांना वाटणार. घुसखोरांना वाटणार. तुमच्या मेहनतीचा पैसा घुसखोरांना दिला जाणार, हे तुम्हाला हे मान्य आहे का?", असे मोदी म्हणालेले.
मोदींच्या विधानावर काँग्रेसने केली होती टीका
मोदींच्या या वक्तव्यानंतर मोठी टीका त्यांच्यावर झाली. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी एका प्रचारसभेत मोदींच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला होता. ते काय म्हणाल्या तेही पाहूयात...
"मागच्या दोन दिवसांपासून हे सुरु झालं आहे की, काँग्रेसला तुमचं मंगळसूत्र आणि सोनं हिसकावून घ्यायचं आहे. ७० वर्षांपासून हा देश स्वतंत्र आहे. ५५ वर्षे काँग्रेसचं सरकार राहिलं, कुणी तुमचं सोनं हिसकावून घेतलं का? कुणी तुमचं मंगळसूत्र हिसकावून घेतलं का? जेव्हा युद्ध झालं होतं. तेव्हा इंदिरा गांधींनी स्वतःचं सोनं देशाला दिलं होतं. माझ्या आईचं मंगळसूत्र या देशासाठी शहीद झालं आहे. आणि जर मोदीजींना मंगळसूत्राचं महत्त्व समजलं असतं, तर ते असे अनैतिक बोलले नसते."
मोदी या वादावर काय म्हणाले?
मोदींच्या वक्त्यावानंतर नवा वाद निर्माण झाला. मोदींकडून हिंदू – मुस्लिम वाद निर्माण केला जातोय अशी टीका देखील करण्यात आली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूज १८ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये मोदींनी त्यांच्या भाषणाबद्दल खुलासा केला आहे.
मोदी म्हणाले, "मी हैराण आहे की, तुम्हाला कोणी सांगितलं की जास्त मुलांबाबत बोललं जातं तेव्हा मुसलमानांचं नाव जोडलं जातं. मुसलमानांसोबत का अन्याय करता तुम्ही? आमच्या इथे गरीब कुटुंबांमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. त्यांच्या मुलांना ते शिक्षण देऊ शकत नाहीत. कुठल्या समाजाचे असोत, गरिबी जिथे आहे तिथे मुलं देखील अधिक आहेत. मी ना हिंदू बोललो आहे, ना मुसलमान. मी म्हटलं तुम्हाला तुम्ही जेवढ्या मुलांचं पोषण करु शकता तितकेच मुलं तुम्हाला असायला हवेत. सरकारला पोषण करावं लागेल अशी स्थिती तयार करु नका. माझ्या देशाचे नागरिक मला मतदान करतील. मी ज्या दिवशी हिंदू – मुसलमान करेन त्या दिवशी मी सार्वजनिक जीवनात राहण्याच्या योग्य नसेन. मी हिंदू – मुसलमान करणार नाही. हा माझा संकल्प आहे."
हा खुलासा आल्यानंतर महाराष्ट्र युथ काँग्रेसने त्यांच्या टविटर हँडलवर मोदींचा व्हिडीओ शेअर करत टीका केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी मोदींच्या जुन्या भाषणाचा तसेच नव्या मुलाखीतीचा व्हिडीओ शेअर करत टीका केली आहे.