कुर्रर्रर्रर्र – १०० नाही तर १००० टक्के मनोरंजन करणारं नाटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मराठी रंगभूमी समृध्द का आहे? याच रंगभूमीवर अचाट असे वेगवेगळे प्रयोग कसे होऊ शकतात? मराठीतले रंगभूमीवरचे कलाकार इतके अफलातून कसे? असे एक ना अनेक प्रश्न मराठी सोडून जगातल्या इतर रंगभूमीच्या रंगकर्मींना,सामान्य प्रेक्षकांना नक्कीच पडतात. मात्र त्यावरचं उत्तर आहे की मराठी रंगभूमीवरचे कलाकार हे अस्सल हिरा आहेत हिरा.. आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे.. कुर्रर्रर्रर्र हे मराठी रंगभूमीवर आलेलं नवीन नाटक. बालनाट्य,एकांकिका,स्कीट यातून तावून सुलाखून निघालेले ४ तगड़े विनोदवीर जर एकत्र आले तर काय धम्माल येईल याची प्रचिती म्हणजे कुर्रर्रर्र हे नाटक… पंढरीनाथ (पॅडी कांबळे), विशाखा सुभेदार,नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर हे नुसते विनोदवीर नाही तर एक परिपूर्ण कलाकार आहेत. आणि या चौघांचे हे नाटक म्हणजे रसिकांसाठी निखळ मनोरंजनाची अर्पूवाई आहे…

ADVERTISEMENT

विशाखा सुभेदार या गुणी अभिनेत्रीने निर्मितीमध्ये आपलं पहिलं पाऊल टाकलं आहे. आणि त्यासाठी तिने नाटकाने सुरवात केली यासाठी तिचं भरभरून अभिनंदन,महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे घरांघरांत पोहचलेला गुणी लेखक, कलाकार प्रसाद खांडेकरच्या आयडियाच्या कल्पनेतून कुर्रर्रर्रर्रचा कागदावर जन्म झालाय. आणि या नाटकाचं दिग्दर्शनही त्यानेच केलं आहे.

हे वाचलं का?

कहाणी सांगण्यापेक्षा ती पाहण्यात जास्त मजा असते. तरीही वरवर सांगायचं झालं तर अक्षर (प्रसाद खांडेकर) आणि पूजा(नम्रता संभेराव) या गोड कपलच्या लग्नाला ५ वर्ष झाली तरी त्यांच्या घरचा पाळणा काही हललेला नाही. बरं पूजाची आई वंदना(विशाखा सुभेदार) ला जावयाच्या घरचाच आसरा असतो. वंदनाचा नवरा २५ वर्षांपूर्वीच तिला सोडून परागंदा झालेला असतो. त्यात आपले पॅडी कांबळे यांची अनपेक्षित नाटकात एंट्री होते. आणि त्यानंतर सुरू होतात एकाहून एक गोंधळांना सुरवात.. मात्र हे सगळे गोंधळ आणि ट्वीस्ट नाट्यगृहात जाऊन पाहण्याची एक वेगळीच मजा आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

प्रसाद खांडेकर या हरहुन्नरी आणि अतिशय हुशार अभिनेत्याने ही कथा खूप उत्तम लिहीली आहे. दिग्दर्शनातही त्याने बाजी मारलीय. गुंतागुंतीच्या या गोंधळाला,ट्वीस्टला एका उत्तम माळेत मांडण्याची किमया प्रसादने चपखल केली आहे. भविष्यात हा गुणी नट,लेखक मराठी रंगभूमीवर हास्याचा धुमाकुळ घालणार याबद्दल शंका वाटत नाही. प्रसादचं लिखाण जितकं फ्रेश आहे.तितका त्याचा अभिनयही सफाईदार आहे. विनोदाचा दर्जाही क्लास असल्याने प्रसाद मराठी रंगभूमीचं भविष्य आहे.

विशाखा सुभेदार या नाटकात निर्माती आणि अभिनेत्री अश्या दुहेरी भूमिकात आहे. पण दोनही आघाड्यांवर विशाखाने बाजी मारली आहे. व्ही.आर.प्रोडक्श्न आणि प्रग्यास क्रिएशन्स या बॅनरखाली आलेलं हे नाटक उत्तम निर्मितीमूल्य असलेलं आहे. कोणत्याही पातळीवर खर्चात कसूर केलेली नाही हे नाटक पाहतानच जाणवतं. विशाखाच्या अभिनयाविषयी काय बोलावं,टायमिंगची राणी असेलेली ही अभिनेत्री नाटकाच्या भाषेत एक एक प्रसंग असे काय चोपते त्याला तोड नाही..

पंढरीनाथ कांबळे म्हणजेच आपल्या सगळ्यांचा लाडका पॅडी. या अभिनेत्याच्या रगारगात नाटक भरलेलं आहे. एनर्जी, भावमूद्रा, विनोदाचं टायमिंग किती अचूक असावं हे पॅडीकडून शिकण्यासारखं आहे. पॅडीने साकारलेली या नाटकातली भूमिका त्याला यावर्षीचे अभिनयाचे अनेक पुरस्कार मिळवून जाईल याबद्दल मला जराही शंका नाही.

नम्रता संभेराव ही तर अजून एक अभिनयाची खाण आहे. आणि या नाटकाने तीने पुन्हा एकदा सिध्द केलंय की विनोदी भूमिकाच नाही तर ती एक परिपूर्ण अभिनेत्री आहे. आपल्याला बाळ होत नाही या पूजाच्या मनातील भावना तिने एका प्रसगांत लीलया साकारल्या आहेत. आणि यासाठी नम्रताला फूल मार्क्स आहेत.

संदेश ब्रेंदेचं नेपथ्य, अमोघ फडकेची प्रकाशयोजना, आणि अमीर हडकरचं संगीत हा या नाटकाचा आत्मा आहे..संतोष भांगरेने केलेलं नृत्यदिग्दर्शन लाजवाब आहे. उल्हास खंदारेने केलेली रंगभूषा आणि अर्चना ठावरे शहाने केलेली वेशभूषा नाटकाला साजेशी आहे.

हे नाटक १०० नाही तर १००० टक्के मनोरंजन करणारं आहे तेव्हा उठा फार वाट पाहू नका जवळचं नाट्यगृह गाठा आणि कुर्रर्रर्रर्र करून या पाहू लवकर…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT