सलमानला पुन्हा धमकी! 'कार बॉम्बने उडवू', व्हॉट्सॲपला आलेल्या मॅसेजमध्ये काय म्हटलंय?
बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने छाप पाडणाऱ्या सलमान खानला पुन्हा एकदा धमकीचा मॅसेज आल्याची बातमी समोर आली आहे. हा मॅसेज पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात वरळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सलमान खानला पुन्हा धमकी

व्हॉट्सॲप द्वारे सलमानला धमकीचा मॅसेज

सलमानला धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल
Salman Khan threat: बॉलीवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी मिळाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील वरळी शहरातील परिवहन विभागाच्या व्हॉट्सअॅप नंबरवर सलमान खानसाठी धमकीचा मॅसेज आल्याचं समोर आलंय. या मॅसेजमध्ये सलमानच्या घरात घुसून त्याला मारण्याची आणि त्याच्या कारला बॉम्बने उडवणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. असा मॅसेज पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात वरळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सलमानला मिळाली पुन्हा धमकी
या धमकीविषयी कोणीच आपलं मत अद्याप व्यक्त केलं नाही. सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाकडून देखील अजून काहीच प्रतिक्रिया आली नाही. मात्र, ही बातमी समोर आल्यानंतर सलमानच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. यापूर्वीसुद्धा या सलमानला अशा बऱ्याच धमक्या मिळाल्या आहेत. गॅंगस्टर लॉरेंस बिश्नोई आणि गोल्डी बरार यांनीदेखील कित्येक वेळा सलमानला धमकावलं होतं. पनवेलमधील त्याच्या फार्म हाऊसचाही तपास करण्यात आला होता. सुदैवाने, कडक सुरक्षेमुळे हा हल्ला टळला. या सततच्या धमक्या मिळाल्या असूनही, सलमान खान त्याच्या कामात सक्रिय राहिला असल्याचं पाहायला मिळतंय. त्याने कधीच त्याच्या कामाशी तडजोड केली नाही.
सलमानच्या घरावर झाला होता गोळीबार
2024 मध्ये सलमान आणि त्याच्या कुटुंबाला सर्वात मोठा धक्का बसला होता. कारण यावेळी सलमानच्या घराच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार झाला होता. पहाटेच्या 5 वाजता ही घटना घडली होती. हल्लेखोरांनी एकूण 5 राउंड गोळीबार केला. यापैकी चार गोळ्या सलमानच्या घराकडे झाडण्यात आल्या आणि एक गोळी गोळी न झाडता जमिनीवर पडली. हा गोळीबार 7.65 एमएम बोरच्या पिस्तूलमधून करण्यात आला. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीच जीवित किंवा मालमत्तेची हानी झाली नाही. ज्यावेळी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळीबार झाला तेव्हा सलमान त्याच्या घरात होता.
हे ही वाचा: बेल्जियम, डोमिनिकन रिपब्लिक, अँटिग्वा, स्वित्झर्लंड... मेहूल चोकसी पळत राहिला, पोलिसांना कसा सापडला?
गोळीबाराच्या या घटनेनंतर, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ अनमोल बिश्नोई याची एक फेसबुक पोस्ट समोर आली होती. सलमानच्या घरावरील गोळीबाराची जबाबदारी त्याने घेतली होती. या हल्ल्यानंतर सलमानची आणि त्याच्या घराची सुरक्षा कडक करण्यात आली. या घटनेमुळे, त्याच्या घराच्या बाल्कनीत बुलेटप्रूफ काच बसवण्यात आली होती. सलमान खानला महाराष्ट्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा मिळाली आहे. 'हम साथ साथ हैं' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान काळवीट शिकार करण्याच्या प्रकरणात अडकला असल्याचं अनेकांना माहित आहे. तेव्हापासून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सलमान मागे लागून त्याला धमक्या देत आहे.
धमक्यांवर सलमानची प्रतिक्रिया
नुकतंच, 'सिकंदर' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सलमानने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून मिळालेल्या धमक्यांवर प्रतिक्रिया दिली होती. तो म्हणाला, "सर्व काही देवावर आहे. त्याने जितका काळ आपलं आयुष्य लिहिलं असले, तितकंच. परंतु, कधीकधी आपल्याला इतक्या लोकांसोबत प्रवास करावा लागतो की हीच समस्या असते."
हे ही वाचा: गुंड घायवळला नडणाऱ्या पैलवानाची क्राईम हिस्ट्री, समोर आलेल्या दुसऱ्या व्हिडीओत काय?
सलमानचा सिकंदर फ्लॉप
सलमान खानचा 'सिकंदर' हा चित्रपट नुकताच ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. ए.आर. मुर्गदास यांनी हा चित्रपट बनवला होता. या चित्रपटात सलमानसोबत रश्मिका मंदान्ना देखील झळकली होती. या चित्रपटाचे खूप प्रमोशन झाले, चित्रपटाची कथा तितकी रोमांचक नसल्यामुळे हा चित्रपट चाहत्यांना प्रभावित करू शकला नाही. सलमान खानचा हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकण्यात नापास ठरला असे म्टटले जाते. परिणामी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालण्यास यशस्वी ठरला नाही.