शरद पवार नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला कारण…; जितेंद्र आव्हाडांनी केला खुलासा
शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गौरव सोहळ्याला हजर राहिले. त्यावरून त्यांच्यावर विरोधकांनी टीका केली. यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई Tak चावडीवर खुलासा केला आहे.
ADVERTISEMENT

Jitendra Awhad Mumbai Tak chawadi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहिल्याने काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून नाराजीचा सूर उमटला. शरद पवार नरेंद्र मोदींच्या गौरव सोहळ्याला का गेले असतील, याबद्दल वेगवेगळे कयास लावले जात असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दल मोठा खुलासा केला. जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई Tak चावडीवर याबद्दल भूमिका मांडली.
शरद पवार नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला गेल्याबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मला वाटतं मी शरद पवारांना फार ओळखत नाही. पण, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही पैलू खास आहेत. ते असा वैचारिक विरोध कायम करत राहतील. वैयक्तिक द्वेष कधीच करणार नाहीत. म्हणजे ते जेव्हा कार्यक्रमाला गेले. तेव्हा माझ्या अंदाजाने ते ठरवून गेले होते की, आपल्याला काँग्रेस संस्कृतीत वाढलेल्या लोकमान्य टिळकांबद्दल बोलायचं आहे. आणि लोकमान्य टिळक यांचं काँग्रेससाठी योगदान आणि देशासाठी योगदान याच्यावर आपण बोलणार आहोत.”
वाचा >> सुप्रिया सुळे संसदेत कडाडल्या! भाजपला घेरलं; म्हणाल्या, ‘नॅचरली करप्ट पार्टी म्हणता, मग…’
‘शरद पवार भूमिका बदलतील, हे कदापि शक्य नाही’
याच मुद्द्यावर जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, “हा काँग्रेसी माणसाचा पुरस्कार मोदींना मिळतोय. त्यांच्या शब्दा शब्दात ते दिसत होतं. त्याच्यामुळे त्यांची एक भूमिका असते, त्यापासून ते कधी मागे फिरत नाही. त्यांना कित्येक जणांनी सांगितलं की, जाऊ नका. काय फरक पडतो. पण, ते जाऊन आले कार्यक्रमाला. त्यांच्याबरोबर काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदेंही होते. त्यांची चर्चाच झाली नाही. शरद पवारांबद्दल झाली. मला शरद पवारांचा स्वभाव माहितीये. ते अशा कुठल्या अग्रलेखाने किंवा वैयक्तिक टीकेतून भूमिका बदलतील, तर ते कदापि शक्य नाही.”
‘वाजपेयीचं सरकार पडलं कारण पवारांनी एक मत फिरवलं’
यावेळी जितेंद्र आव्हाडांनी वाजपेयींच्या सरकार कोसळण्याद्दलचा किस्साही यावेळी मुंबई Tak चावडीवर सांगितला. ते म्हणाले, “शरद पवारांचा दरवाजा कुणासाठीच बंद नसतो. कारण संवाद ही त्यांची मुख्य ताकद आहे. देशातील प्रत्येक पक्षाशी संवाद असणारा एकमेव नेते आहेत शरद पवार. जेव्हा अटलबिहारी वाजपेयींचं सरकार पडलं. तेव्हा एका मतांचं गणित होतं. ते एक मत कुणी फिरवलं? संवादाने. कारण त्यांचा मायावतींशी संवाद होता.”
गोपीनाथ मुंडेंबद्दलची कागदपत्रे मी पवारांना दिली होती, पण…
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “शरद पवार अजित पवारांना फोनवरून बोलले तरी त्यांच्या भूमिकेपासून ते तसूभरही हालणार नाही. गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्यावर इतका मोठा हल्ला केला. मी तेव्हा छोटा कार्यकर्ता होता. पण, त्यांचे आणि गोपीनाथ मुंडेंचे तणावग्रस्त संबंध आहेत, असं कधीच दिसलं नाही. मी गोपीनाथ मुंडेंसंदर्भात मोठी कागदपत्रे त्यांच्या हातात दिली होती. त्यांनी ते बघितलं. ड्रॉवर उघडलं आणि फेकून दिलं.”
वाचा >> आमदार हसून हसून बेजार! जयंत पाटलांनी सांगितला नारायण राणे आणि सूट शिवण्याचा किस्सा
“त्यांनी मला विचारलं की, हे कुणी दिलंय. मी त्यांना सांगितलं की, एका पोराने दिलंय. त्यावर त्यांनी सांगितलं की, जितेंद्र कुणी कमरेखालचे वार केले म्हणून कुणी आपण त्यांच्या कमरेखाली वार केलाच पाहिजे, असे काहीच नाही. राजकारण हे राजकारणासारखंच पाहायचं. सूड, द्वेष, बदला हे त्यात ठेवायचं नाही असं त्यांनी मला सांगितलं”, अशी आठवण आव्हाडांनी यावेळी सांगितली.