ढासळलेला बालेकिल्ला NCP पुन्हा बांधणार? रोहित पवारांच्या खांद्यावर पक्षाने दिली नवी जबाबदारी
सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. एक काळ असा होता की सोलापूर जिल्ह्यात ११ पैकी ८ आमदार हे राष्ट्रवादीचे निवडून यायचे. याव्यतिरीक्त जिल्हा परिषद, जिल्हा बँक यादेखील राष्ट्रवादीच्याच ताब्यात होता. परंतू भाजपने या बालेकिल्ल्याला सुरुंग लावल्यापासून राष्ट्रवादीची गेल्या काही वर्षांमध्ये सोलापूर जिल्ह्यातली अवस्था काहीशी बिकट झाली आहे. सध्याच्या घडीला दोन अधिकृत आणि […]
ADVERTISEMENT

सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. एक काळ असा होता की सोलापूर जिल्ह्यात ११ पैकी ८ आमदार हे राष्ट्रवादीचे निवडून यायचे. याव्यतिरीक्त जिल्हा परिषद, जिल्हा बँक यादेखील राष्ट्रवादीच्याच ताब्यात होता. परंतू भाजपने या बालेकिल्ल्याला सुरुंग लावल्यापासून राष्ट्रवादीची गेल्या काही वर्षांमध्ये सोलापूर जिल्ह्यातली अवस्था काहीशी बिकट झाली आहे. सध्याच्या घडीला दोन अधिकृत आणि एक अपक्ष अशा तीन आमदारांवर राष्ट्रवादीला समाधान मानावं लागलं आहे.
परंतू हाच बालेकिल्ला पुन्हा एकदा उभा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. पक्ष बांधणीच्या दृष्टीकोनातून राष्ट्रवादीने युवा आमदार रोहित पवार यांच्याकडे पाच मतदारसंघांची जबाबदारी सोपवली आहे. ज्यात सोलापूर जिल्ह्यातील दोन मतदारसंघांचा समावेश आहे. करमाळा आणि पंढरपूर या मतदारसंघात रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष बांधणीकडे लक्ष देणार आहेत. याव्यतिरीक्त रोहित पवार उस्मानाबाद, भूम-परांडा आणि श्रीगोंदा या मतदारसंघाची जबाबदारी खांद्यावर घेणार आहेत.
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात रोहित पवारांची एंट्री ही महत्वाची घडामोड मानली जात आहे. भारतीय जनता पक्षाने मोहीते पाटील आणि परिचारक गटाला हाताशी धरत जिल्ह्यात आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. त्यातच सत्ता असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अंतर्गत बंडाळीमुळे पक्षात दोन गट पडलेले आहेत. पालकमंत्री दत्ता भरणेही सोलापूरमधली राष्ट्रवादीतली बंडाळी शांत करण्यात अपयशी ठरले आहे. अशा परिस्थितीत सोलापूरमधल्या दोन मतदारसंघांची जबाबदारी रोहित पवार यांच्याकडे सोपवत पक्षाने नवीन चेहरा समोर आणायचं ठरवलं आहे.
सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर, माळशिरस, माढा, मोहोळ या मतदारसंघात राष्ट्रवादीची चांगली पकड होती. परंतू अंतर्गत गटबाजीचा फटका राष्ट्रवादीला या ठिकाणी बसला. काही महिन्यांपूर्वी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंचा पराभव करत भाजपने समाधान अवताडे यांना निवडून आणलं. अशा परिस्थितीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी राष्ट्रवादीने रोहित पवारांना मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे रोहित पवार आता सोलापुरात राष्ट्रवादीला पुन्हा एकदा अच्छे दिन आणू शकतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
आघाडीत बिघाडी ! राष्ट्रवादीच्या नेत्याची तक्रार आणि शिवसेना आमदाराचं सदस्यत्व धोक्यात