Santosh Deshmukh Case : आरोपी फक्त 8 नाही, मुंडेंचा राजीनामा म्हणजे शेवट नाही? घडामोडींचा अर्थ काय?

सुधीर काकडे

Santosh Deshmukh News: संतोष देशमुख प्रकरणातील चार्जशीटमधील फोटो बाहेर काढण्याचा आणि राजीनामा देण्याचा हा सर्व घटनाक्रम ठरवून केला गेला का? यामागे नेमकं काय राजकारण आहे? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होतायत.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

धनंजय मुंडे लवकरंच पुन्हा मंत्री होणार?

point

अबू आझमींनी अचानक वादग्रस्त वक्तव्य का केलं?

Beed Sarpanch Case Updates: राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी काल राजीनामा दिला. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी (कामकाजाजा पहिला दिवस) दिला गेलेला हा राजीनामा संतोष देशमुख यांच्या यांची हत्या करतानाचे फोटो व्हायरल झाल्यानंतरचा तातडीचा निर्णय आहे. मात्र, चार्जशीटमधील फोटो बाहेर काढण्याचा आणि राजीनामा देण्याचा हा सर्व घटनाक्रम ठरवून केला गेला का? यामागे नेमकं काय राजकारण आहे? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होतायत. नेमका या सर्व गोष्टींचा घटनाक्रम आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न समजून घेऊ.

3 मार्च : संतोष देशमुख यांच्या हत्येचे चार्जशीटमधील फोटो समोर येतात. क्रूरता पाहून महाराष्ट्र हादरतो. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी व्हायला लागते आणि वातावरण पेटतं.

4 मार्च :  अधिवेशनाचा दुसरा दिवस आणि खऱ्या अर्थाने कामकाज सुरू होण्याचा पहिला दिवस. लोकांच्या मनात तयार झालेल्या भावनांप्रमाणेच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जातो.
 
मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला. तर धनंजय मुंडे, सोशल मीडियावर लिहितात “तपास पूर्ण झालाय. मी विवेकाला स्मरून आणि डॉक्टरांनी आराम करायला सांगितल्याने वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देतोय.”

धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानं सर्वसामान्यांना वाटलं न्याय होतोय.तसंच दुसरीकडे विरोधकांनाही सभागृहात सरकारला घेरण्यासाठी विशेष मुद्दा उरलेला दिसत नाही. कारण सरकारला जेव्हा बीड प्रकरणाबद्दल प्रश्न विचारले जातील, तेव्हा धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याचं सांगितल्या जाण्याची शक्यता आहे.

राज्यात एकीकडे हे सर्व सुरू असताना दुसरीकडे विधानसभा सभागृहात दुसरंच सुरू होतं. अबू आझमी यांनी 3 तारखेलाच काहीच संबंध नसताना, औरंगजेब वगैरे वक्तव्य केलेलं असतं. कारण छावा चित्रपट येऊन 2-3 आठवडे उलटून गेलेले असताना त्यांनी केलेलं वक्तव्य टीम बी म्हणून केल्याचं विरोधकांनी म्हटलं. 
 
अबू आझमी यांच्या या वक्तव्यावरून सत्ताधारी अबू आझमीचा विरोध करत सभागृहात गोंधळ घातला आणि सभागृह बंद पाडलं. त्यामुळे धनंजय मुंडे किंवा बीड प्रकरणावर बोलण्याची वेळच आली नाही. दुसरीकडे हे सगळं झाल्यानंतर अबू आझमी यांनी आपलं वक्तव्यही मागे घेतलं. त्यांच्यावर कारवाई होईल किंवा न होईल, मात्र घोंगावणारं ते तात्पुरतं वादळ शांत झालं.

3 आणि 4 मार्चला झालेला हा संपूर्ण घटनाक्रम पाहिल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


1. गृहमंत्री/मुख्यमंत्री यांनी संतोष देशमुखांचे फोटो आधी पाहिले नसतील का?
2. जर पाहिले असतील तर त्यांना तेव्हाच राजीनामा का घ्यावा वाटला नसेल? 
3. अधिवेशनात विरोधक हा मुद्दा उचलून धरतील हे साहजिक होतं. म्हणून तर पहिल्याच दिवशी राजीनामा घेऊन विषय संपवला का? 
4. धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर आवादा कंपनीला खंडणी मागण्यासाठी मिटिंग झाली होती असा आरोप केलाय, मग धनंजय मुंडे या प्रकरणात आरोपी होतील का? 
5. धनंजय मुंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये “तपास पूर्ण झाला” असं म्हटलंय, म्हणजे या प्रकरणात त्यांना सहआरोपी करणार नाही असा विश्वास आहे का? 
6. फोटो व्हायरल होणे, राजीनामा होणे आणि नंतर पुन्हा धनंजय मुंडे यांना निर्दोष सिद्ध करून मंत्री करणे यासाठीची राजकीय रणनीती ठरली आहे का?

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी किती?

संतोष देशमुख यांची हत्या करतानाची क्रूरतेची दृष्य समोर आल्यानंतर राज्यात संतापाची लाट निर्माण झाली. दृष्यांमध्ये दिसणाऱ्या आरोपींना फाशीची मागणी होऊ लागली. मात्र दुसरीकडे आरोपींना पोसणारे, त्यांच्याशी समन्वय साधणारे, त्यांना मदत करणारे दोषी आहेत की नाही? यावरुन काही सवाल उपस्थित होतात.

हे ही वाचा >> Thane Crime : डोक्यात वार करुन जागीच संपवलं, सोबत राहणाऱ्या मजुरांनीच केली कामगाराची हत्या

1. खून करणारे राक्षस सर्वांना दिसले. पण राक्षसांना पोसणाऱ्यांचं काय?
2. हे राक्षस कुणासाठी खंडणी गोळा करत होते? त्या वरच्या फळीतल्या लोकांचं काय?
3. राक्षस जेव्हा संतोष देशमुख यांचा खून करत असताना त्यांना को-ऑर्डिनेट करून गावकऱ्यांना त्यांच्यापर्यंत न पोहोचू देणारे पोलीस आरोपी कधी होणार?
4. राक्षसांना वाचवण्यासाठी खून झाल्यानंतर मृतदेह दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न करणारे पोलीस कटात सहभागी नव्हते का?
5. आरोपीने पळून जाण्यासाठी मार्गदर्शन करणारे, त्यांना पैसे देणारे, त्यांना लपवणारे, अशा अनेकांची नावं समोर आली. त्यांच्यावर कारवाई कधी? 
6. आरोपी पुन्हा हजार झाले तेव्हा त्यांना सरेंडर होताना सोडायला येणारे, ज्यांच्या घरात व्हिडिओ घेतला ते आरोपी कधी होणार?

असे अनेकजण संतोष देशमुख प्रकरणात आरोपी होऊ शकतात असं दिसतं. संतोष देशमुख यांचे कुटुंबीयही तशी मागणी करताना दिसतात. त्यामुळे हे लोक वाचणार की यांना शिक्षा होणार यावरुन, न्याय होतो की नाही हे ठरणार आहे. तसंच सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात या मुद्द्यावर चर्चा होणार का? हे पाहणं महत्वाचं असेल.

हे ही वाचा >> Jalna Crime : जाळावर सळई तापवून दिले चटके, जुन्या वादातून केला छळ, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

आपल्याच माणसाचा खून झालेला असताना पहिल्यादिवसापासून संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला तपासात प्रगती होण्यासाठी संघर्ष करावा लागला. "मनोज जरांगे आले म्हणून, प्रकरणाची दाखल घेतली गेली" असं धनंजय देशमुख वारंवार सांगत आहेत. पुढेही प्रत्येकवेळी त्यांना कधी टाकीवर चढून आंदोलन करावं लागलं, कधी आमरण उपोषण करावं लागलं. त्यानंतरच प्रशासनाने कारवाई केल्याचं कुटुंबाचं म्हणणं आहे. 

त्यामुळे हे सगळं समजून घेऊन, जर प्रत्येक आरोपीला प्रकरणात घेतलं आणि त्याला शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा झाला, तर आणि तरच या लढ्याला अर्थ असणार आहे. त्यामुळे आता पोलीस या संपूर्ण सिंडीकेटला उध्वस्त करणार की पुन्हा दहशत माजवण्यासाठी ते मोकळे सुटणार हे पाहणं महत्वाचं असेल.

हे वाचलं का?

    follow whatsapp