“शरद पवारांना जे साधायचे ते त्यांनी साधलेच”, शिवसेनेचे (UBT) थेट भाष्य
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 24व्या वर्धापनदिनी शरद पवारांनी एक मोठी घोषणा केली. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या निर्णयावर भाष्य केले आहे. अजित पवार, सुनील तटकरे यांचा उल्लेख करत काही निरीक्षण ठाकरे गटाने नोंदवली आहेत.
ADVERTISEMENT
Maharashtra Politics, Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या 24व्या वर्धापनदिनी शरद पवारांनी एक मोठी घोषणा केली. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. शरद पवारांच्या या निर्णयाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहे. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या निर्णयावर भाष्य केले आहे. अजित पवार, सुनील तटकरे यांचा उल्लेख करत काही निरीक्षण ठाकरे गटाने नोंदवली आहेत. (Maharashtra political news in Marathi)
ADVERTISEMENT
“आता कोठे भाकरी थापलीय!” या सामना अग्रलेखात राष्ट्रवादी काँग्रेसमधील नव्या नियुक्त्यांबद्दल भाष्य करण्यात आले आहे. “राष्ट्रवादी काँगेसच्या वर्धापनदिनी शरद पवार यांनी पक्षात काही बदल केले. त्यात धक्कादायक वगैरे काहीच दिसत नाही. शरद पवारांनी राष्ट्रीय पातळीवर दोन प्रमुख नियुक्त्या केल्या. राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती केली. यास काही जण शरद पवारांनी ‘भाकरी फिरवली’ असे म्हणत असतील तर त्यात दम नाही.”
शिवसेनेने राष्ट्रवादीमधील नियुक्त्यांवर काय म्हटलंय?
– शिवसेनेने पुढे म्हटलं आहे की, “मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय दर्जा गमावला आहे. नागालॅण्डमध्ये त्यांचे चार-पाच आमदार निवडून आलेत. राज्याबाहेर लक्षद्वीप येथे त्यांचा एक खासदार आहे. केरळ विधानसभेत त्यांचे एक-दोन सदस्य आहेत. बाकी सर्व कारभार महाराष्ट्रात आहे. त्यामुळे सर्व काही आटोपशीर आहे. मग एकाच वेळी दोन कार्यकारी अध्यक्ष नेमण्याची गरज का पडली? हाच काय तो प्रश्न आहे. राष्ट्रवादी हा पक्ष तसा आटोपशीर असला तरी त्या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे देशातले बलदंड राजकीय पुरुष आहेत व देशाच्या राजकारणात त्यांच्या शब्दाला मान आहे.”
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
पटेलांना कार्यकारी अध्यक्ष नेमून कोणता संदेश दिला?
– “गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूगर्भात असंतोषाचा लाव्हा उसळत होता व त्याचा केंद्रबिंदू अजित पवार असल्याचे माध्यमांचे म्हणणे आहे. शरद पवार यांनी साधारण महिनाभरापूर्वी त्यांच्या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्यात पक्षाच्या अध्यक्षपदातून मुक्त होण्याची घोषणा केली व तेव्हा सगळ्यांना एकच झटका बसला. तसा झटका सुप्रिया, पटेलांच्या नव्या नियुक्तीने बसला नाही. सुप्रिया सुळे यांच्याकडेच पक्ष संघटनेची सूत्रे जातील हे नक्की होते, पण दुसरे कार्यकारी अध्यक्ष पटेल यांना नेमून पवार कोणता संदेश देत आहेत?”
हेही वाचा >> NCP: सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष करा ‘या’ व्यक्तीने सांगितलं, शरद पवारांचा प्रचंड मोठा दावा
– सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्षपदी नेमल्याने घराणेशाहीचा आरोप होऊ नये यासाठी त्यांनी आणखी एक कार्यकारी अध्यक्ष नेमला असावा, पण प्रफुल्ल पटेल हे पवारांचे जुने सहकारी आहेत व त्यांचा वावर महाराष्ट्रापेक्षा दिल्लीतच जास्त असतो. शरद पवार म्हणतात, ‘देशाचा आकार पाहता एकाच नेत्याला सर्व भागांत पोहोचणे अवघड असते. त्यामुळे कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दोघांत वाटून दिली आहे. गेले दोन महिने पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये याबाबत चर्चा सुरू होती. त्यातून हा निर्णय घेण्यात आला.’ हे खरे असेलही, पण राष्ट्रवादी काँगेस पक्षापेक्षा अनेक मोठे पक्ष देशाच्या राजकारणात आहेत. त्यांनाही देश मोठा असल्याने दोन कार्यकारी अध्यक्ष नेमण्याची गरज पडली नाही. मात्र शरद पवार यांनी ते केले. कारण त्यांना पक्षातील जुन्या-नव्यांत समतोल राखावा लागत आहे.”
ADVERTISEMENT
अजित पवार महाराष्ट्रातील खिलाडी
– “अजित पवार यांना नव्या फेररचनेतून वगळले. त्यामुळे ते दिल्लीतील कार्यक्रमातून निघून गेले वगैरे नेहमीच्या कंड्या पिकविण्यात आल्या. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातले ‘खिलाडी’ आहेत व राज्याच्या बाहेर पडून काम करण्याचा त्यांचा पिंड नाही. सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष करावे ही आपलीच सूचना होती असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. अजित पवार हे विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत व त्यांच्या नेतृत्वाखालचा गट हा भाजपच्या दगडावर पाय ठेवून आहे असे नेहमीच सांगितले जाते.”
ADVERTISEMENT
हेही वाचा >> WTC फायनलमधील टीम इंडियाच्या पराभवाची पाच प्रमुख कारणे
– “अडीचेक वर्षांपूर्वी त्यांनी फडणवीस यांच्याबरोबर पहाटेचा शपथविधी केल्याचा हा परिणाम. अजित पवार हे भाजपच्या तंबूत जाऊन परत आले हा त्यांच्यावर ठपका आहे व हा ठपका कायमचा दूर करण्यासाठी अजित पवारांनाच शर्थ करावी लागेल. राजकारणातल्या विश्वासार्हतेला सध्या कमालीची घरघर लागली आहे. सकाळी या पक्षात असलेला नेता संध्याकाळी कोठे विलीन झालेला असेल ते सांगता येत नाही.”
पवारांनी काही प्यादी हलवली
– “काही लोक यास राजकीय बुद्धिबळाचा पट समजतात. उंट तिरका चालतो, पण या पटावर त्यास घोड्याप्रमाणे अडीच घरेही जबरदस्तीने चालवले जाते. अशा प्रकारच्या राजकारणाचा लोकांना कंटाळा आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमके तेच घडत आहे. याच राजकारणात शरद पवार व त्यांचा पक्ष हे एक महत्त्वाचे घटक आहेत हे नक्कीच मान्य करावे लागेल व त्यामुळेच भविष्यातील राजकारणाचा विचार करून शरद पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काही प्यादी हलवली आहेत. नव्या रचनेत कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी आली आहे.”
हेही वाचा >> अटलजींचा फोन, शिवसेनेचे 40-50 खासदार; संजय राऊतांनी सांगितला 1992 चा किस्सा
– “दुसरे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल मध्य प्रदेश, गुजरात, गोवा, राजस्थान वगैरे प्रदेश पाहतील. सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, योगानंद शास्त्री, मोहम्मद फैजल अशांना सरचिटणीस नेमून त्यांच्यावर इतर काही राज्यांची जबाबदारी दिली. हे सर्व कागदावरच राहील. तटकरे यांच्यावर सरचिटणीस म्हणून प. बंगाल, ओडिशाची जबाबदारी आहे. शिवाय अल्पसंख्याक व शेतकरी विभागाचे ते प्रभारी बनवले आहेत. हे सर्व राष्ट्रीय पातळीवर करण्याची मानसिकता तटकरे यांची आहे काय? अर्थात हे असे सर्व असले तरी महाराष्ट्राची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्यावर सोपवली गेली आहे व त्यांच्याच प्रभाराखाली पुढच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांची तयारी होईल. मुख्य म्हणजे तिकीट वाटपात त्यांचा अधिकार राहील.”
पवारांनी आता कुठे भाकरी तव्यावर टाकलीये
– “महाराष्ट्रात जयंत पाटील हे प्रांताध्यक्ष आहेत व ते शरद पवारांचे अत्यंत विश्वासू आहेत. त्यामुळे जयंत पाटील, सुप्रिया सुळे व अजित पवार या त्रिकुटावर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचा भार राहील. पक्षाच्या 25 व्या वर्धापनदिनी शरद पवार यांना जे साधायचे ते त्यांनी साधलेच आहे. सुप्रिया सुळे यांना आता कसोटीस उतरावे लागेल. शरद पवारांनी भाकरी फिरवली नसून आता कोठे चुलीवर टाकली आहे. भाकरी कच्ची राहू नये म्हणून ती फिरवावीच लागते. आधीची भाकरी करपल्याने नवी भाकरी थापली असेल तर वाट पाहावी लागेल”, असं भाष्य शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) केले आहे.
ADVERTISEMENT