Walmik Karad: 'माझ्या छातीत दुखतंय...', मकोका लागताच वाल्मिक कराडच्या छातीत आली कळ
Walmik Karad: संतोष देशमुख हत्या प्रकरणी मकोका अंतर्गत कारवाई सुरू करताच वाल्मिक कराड याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. त्यावेळी अचानक त्याने आपल्या छातीत दुखत असल्याचं पोलिसांना सांगितलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

वाल्मिक कराडची जिल्हा रुग्णालयात करण्यात आली वैद्यकीय तपासणी

तपासणीला नेण्याआधी वाल्मिकने छातीत दुखत असल्याची केली तक्रार

संपूर्ण वैद्यकीय तपासणी केल्यानंतर वाल्मिक कराडची हर्सूल तुरुंगात करण्यात आली रवानगी
बीड: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अखेर आज (14 जानेवारी) वाल्मिक कराड याला आरोपी करून त्याच्याविरोधात थेट मकोका लावण्यात आला. ज्यानंतर त्याचा ताबा कोर्टाने SIT कडे दिला आहे. आता वाल्मिकच्या कोठडीसाठी SIT उद्या मकोका कोर्टात त्याला हजर करणार आहे. दरम्यान, याआधी SIT ने आज वैद्यकीय तपासणीसाठी त्याला जिल्हा रुग्णालयात नेलं. त्यावेळी अचानक वाल्मिक कराडने छातीत दुखत असल्याचं सांगितलं. त्यामुळे रुग्णालयात त्याच्या तपासण्या करण्यात आल्या.
दरम्यान, तपासण्या केल्यानंतर वाल्मिक कराड याला रुग्णालयातून आता पुन्हा एसआयटीच्या ताब्यात देण्यात आलं आहे. ज्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून वाल्मिकला छ. संभाजीनगरमधील हर्सूल तुरुंगात नेण्यात येत आहे.
हे ही वाचा>> Walmik Karad MCOCA Case: वाल्मिक कराडवर आजच कसा लागला मकोका? महिनाभर खुनाचा गुन्हाही नव्हता!
संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला लावला मकोका...
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी आज अचानक SIT वाल्मिक कराडला आरोपी करून मकोका दरम्यान कारवाई सुरू केली. त्यामुळे खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळून देखील वाल्मिकला आजची रात्र पोलीस कोठडीतच घालवावी लागणार आहे. कारण आजपुरता मकोका कोर्टाने त्याचा ताबा हा एसआयटीकडे दिला आहे.
दरम्यान, उद्या (15 फेब्रुवारी) वाल्मिकला पुन्हा मकोका कोर्टात हजर करून हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी त्याच्या कोठडीची मागणी करेल.
हे ही वाचा>> Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, परळीत बंद; सुरेश धस, जरांगेंचे फोटो फाडत राडा
या हत्या प्रकरणात SIT ने आरोपी वाल्मिक कराड याला मकोका (MCOCA) लावला आहे. यामुळे आता वाल्मिक कराडच्या अडचणीत भर पडली आहे. आतापर्यंत वाल्मिकला केवळ खंडणी प्रकरणात आरोपी करण्यात आलं होतं. मात्र, आता थेट हत्या प्रकरणात त्याला आरोपी केल्याने त्याच्यावर मकोका देखील लागला आहे.
काही मिनिटात संपूर्ण परळी बंद
वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आल्याचं वृत्त समोर येताच संपूर्ण परळी शहर काही क्षणात बंद करण्यात आलं. वाल्मिक कराड याच्या समर्थनार्थ हा बंद करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ ही बंद करण्यात आली. यावेळी वाल्मिकचे काही समर्थक हे व्यापाऱ्यांना आपली दुकानं बंद करण्यास भाग पाडत असल्याचंही दिसून आलं.
खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
दुसरीकडे सर्वात आधी ज्या खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण आला होता त्या प्रकरणी आज सीआयडीने पुन्हा एकदा 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. पण कोर्टाने सीआयडीची ही मागणी फेटाळून लावत त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.