कुत्रा चावला म्हणूनही चर्चेत आले, हे संभाजी भिडे नेमके आहेत तरी कोण?

मुंबई तक

Stray Dog Attack on Sambhaji Bhide: सांगलीत संभाजी भिडेंवर एका भटक्या कुत्र्याने हल्ला केला. ज्यामध्ये ते जखमी झाले आहेत. पण याच कारणामुळे संभाजी भिडे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

ADVERTISEMENT

संभाजी भिडे नेमके आहेत तरी कोण?
संभाजी भिडे नेमके आहेत तरी कोण?
social share
google news

Stray Dog attack on Sambhaji Bhide: सांगली: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे संस्थापक आणि हिंदुत्ववादी नेते संभाजी भिडे, ज्यांना त्यांचे समर्थक ‘भिडे गुरुजी’ म्हणून संबोधतात, यांच्यावर 14 एप्रिलच्या रात्री सांगली शहरात एका भटक्या कुत्र्याने हल्ला केला. या हल्ल्यात भिडे यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली असून, त्यांना तातडीने सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

ही घटना सोमवारी, 14 एप्रिल 2025 रोजी रात्री घडली. संभाजी भिडे हे सांगलीतील एका धारकऱ्याच्या घरी कार्यक्रमाला उपस्थित होते. रात्री जेवण आटोपून ते आपल्या घराच्या दिशेने पायी परतत असताना हा हल्ला झाला. मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावर अचानक एका भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर झेप घेतली आणि डाव्या पायाचा चावा घेतला. या हल्ल्यात त्यांच्या पायाला जखम झाली आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या त्यांच्या समर्थकांनी तातडीने त्यांना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.

हे ही वाचा>> Sharad Pawar : ''संभाजी भिडे वगैरे प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची...'', पवार भडकले!

रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी भिडे यांच्या जखमेची तपासणी केली. त्यांना प्रथमोपचार म्हणून दोन इंजेक्शन्स देण्यात आली, ज्यात रेबीजविरोधी लस (एंटी-रेबीज इंजेक्शन) आणि टिटॅनसचे इंजेक्शन यांचा समावेश आहे. डॉक्टरांनी सांगितले की, भिडे यांची प्रकृती आता स्थिर आहे, परंतु त्यांना काही काळ विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. “जखम फार खोल नाही, पण कुत्र्याचा चावा असल्याने आम्ही सर्व खबरदारी घेत आहोत. रुग्णाला रेबीजचा धोका टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेतली जात आहे,” असे रुग्णालयातील एका डॉक्टरने सांगितले.

राजकीय प्रतिक्रिया

या घटनेनंतर राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावर उपरोधिक टीका करताना म्हटले, “संभाजी भिडे यांना चावणाऱ्या कुत्र्याची SIT चौकशी व्हायला हवी. काय त्या कुत्र्याला दुर्बुद्धी सुचली? कुणाला चावायचं हे त्याला कळलं नाही. या सरकारमध्ये कुत्राही मोठ्या माणसाला चावला तरच सापडतो.” राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही सरकारवर निशाणा साधला. “आता महत्त्वाच्या माणसाला चावावं, अशी आपण देवाकडे प्रार्थना करूया. म्हणजे सर्वसामान्यांना न्याय मिळेल,” असे ते म्हणाले.

संभाजी भिडे कोण आहेत?

दरम्यान, केवळ भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने देखील संभाजी भिडे हे चर्चेत आले आहेत. ते नेमके कोण आहेत आणि त्यांची पार्श्वभूमी काय हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

हे ही वाचा>> टिकली लाव मग बोलेन! संभाजी भिडे महिला पत्रकाराला असं का म्हणाले?

संभाजी भिडे यांचे मूळ नाव मनोहर भिडे किंवा मनोहर कुलकर्णी आहे असं म्हटलं जातं, परंतु याबाबत स्पष्ट माहिती नाही. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यात आहे. त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी पुणे विद्यापीठातून अॅटॉमिक फिजिक्समध्ये एमएस्सी केले  आहे असं सांगितलं जातं. एवढंच नव्हे तर ते सुवर्णपदक विजेते आहेत असाही काही जणांकडून दावा केला जातो. परंतु याबाबत ठोस माहिती अद्याप तरी मिळू शकलेली नाही.

1980 च्या दशकात संभाजी भिडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रचारक होते, परंतु नंतर त्यांनी स्वतःची संघटना स्थापन केली. भिडे यांचे महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा आणि मुंबईसह अनेक भागांत मोठ्या संख्येने अनुयायी आहेत. त्यांच्या अनेक वक्तव्यांमुळे आणि कृतींमुळे ते नेहमीच वादाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत.

"शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान" या संघटनेच्या माध्यमातून ते तरुणांना इतिहासाचे धडे देतात आणि सामाजिक कार्यात सहभागी होतात. पण आतापर्यंत ते आपल्या वादग्रस्त विधानांमुळेच अधिक चर्चेत राहिले आहेत.

संभाजी भिडेंना जवळून ओळखणारे लोक असं म्हणतात की, त्यांचा जन्म 1939-40 दरम्यान, एका सधन चित्पावन ब्राम्हण कुटुंबामध्ये धाराशिवमध्ये झाला. त्याचं पाळण्यातलं नाव मनोहर असून पुढे ते बदलून संभाजी केलं असं म्हटलं जातं. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्रातले महत्त्वाचे पदाधिकारी असलेले वसंतराव ऊर्फ बाबा भिडे यांच्या नात्यातले आहेत. असंही सांगितलं जातं की भिडे यांचे कुटुंब हे मूळचे साताऱ्यातील आहे. 

भिडे यांचं शिक्षण सातारा आणि पुणे येथे झाले असून पुण्यातल्या एका कॉलेजमध्ये त्यांनी काही काळ अध्यापन केल्यामुळे त्यांच्या समोर गुरुजी ही बिरुदावली लागली. असं म्हटलं जातं की, ते सायन्समध्ये पीएचडी आहेत. पण त्यांनी नेमकं कुठून शिक्षण  घेतला आणि याच्याबद्दल माहिती आज तर उपलब्ध नाही. 

पुढे भिडे गुरुजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक झाले. उस्मानाबादला प्रचारक म्हणून काम करताना बीड हे कायम खाकी हाफ पॅन्ट आणि काळी टोपी अशा पेहरावात असत. त्यामुळे ते गर्दीत सुद्धा उठून दिसत. असं त्यांना त्या काळात पाहिलेले लोक सांगतात. उस्मानाबाद वास्तव्यामध्ये अनेक ब्राह्मणेतर तरुणांना त्यांनी संघात आणलं. त्यासाठी त्यांनी शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा लोकांच्या मनावर असलेला विलक्षण गारुडाचा आणि अगदी मुस्लिम द्वेषाचा सुध्दा वापर केला असाही आरोप करण्यात येतो. 

त्यांना साधारणपणे 1980 च्या आसपास सांगलीला संघाचे काम करण्यासाठी पाठविण्यात आले. संभाजी भिडे यांना सांगली सोडून ठाण्याला संघाच्या कामासाठी जाण्यास सांगण्यात आलं आणि तिथेच त्यांच्या आणि संघाच्या नात्यांमध्ये ठिणगी पडली. त्यामुळे त्यांनी 1984 85 च्या दरम्यान प्रति राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेची स्थापना केली. 

भिडे व त्यांच्या कारवायांना जवळून पाहिलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी असं म्हणतात की, भिडे यांचा आणि तत्कालीन सरसंघचालक मधुकर उर्फ बाळासाहेब देवरस यांच्यात वाद झाला आणि आपण संघापेक्षा ही भावी आणि मोठी संघटना उभी करू असे भिडे आणि त्यांना सांगितले होते. 

सांगलीमधील काही जुने जाणते पत्रकार असं म्हणतात की, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि संघ यांचे संबंध चांगले आहेत आणि एकूणच वाढीमध्ये संघाचा मोठा हातभार आहे. त्याचबरोबर शिवप्रतिष्ठानचे प्रार्थना आणि प्रणाम सुद्धा संघासारखीच असल्याचे सांगण्यात येते. संघटनेत भिडे गुरुजी यांचा शब्द अंतिम असतो. शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना ते धारकरी असे म्हणतात.

शिवप्रतिष्ठानचे महाराष्ट्रात अन्यत्र सुद्धा साधारणपणे पंधरा हजार सक्रिय सदस्य असून महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक अशा राज्यांमध्ये त्यांच्याशी संबंधित असलेल्यांची संख्या इतर लाखाच्यावर आहे असं सांगण्यात येतं. नवरात्रीच्या काळात होणारी दुर्गामाता दौड, गडकोट मोहीम, बलिदान मास अशा माध्यमातून भिडे गुरुजी यांनी  विशेषत: बहुजन समाजातील तरुणांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. या सगळ्याला किनार आहे ती प्रखर मुस्लिम विरोधाची.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने असंही सांगितलं की, '1980 च्या दशकात पोलिसांच्या खाजगी रिपोर्टमध्ये भिडे गुरुजींचा उल्लेख तर धर्मवेडा आणि माथेफिरू करण्यात आलेला आहे. भिडे गुरुजी यांनी स्वतःची एक वेगळी प्रतिमा तयार केली आहे. ते पायात चप्पल घालत नाहीत, अनवाणी फिरतात तसेच मोबाइल फोन ठेवत नाहीत जुन्या सायकलीचा वापर करतात आणि या सगळ्या गोष्टींमुळे लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहे. 

पोलीस अधिकारी अशीही माहिती देतात की, 'भिडे गुरुजी यांचा सनातन संस्थेचे जवळचा संबंध आहे. शाकाहारी असलेल्या गुरुजी सांगलीतल्या गाव भागात असलेल्या त्यांच्या एका खोलीच्या घरात राहतात. ते घर त्यांना त्यांच्या एका समर्थकांनी राहिला दिलेले आहे. त्या घरात जमिनीवरच झोपतात असं म्हटलं जातं. ज्यामध्ये ते पंखा किंवा एसी वापरत नाहीत. याशिवाय ते फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न खात नाहीत ते फक्त कार्यकर्त्यांच्या घरी जेवतात. भिडे यांचे एकेकाळचे सहकारी म्हणतात की, ते चहा पीत नाही, चॉकलेट खात नाहीत एवढेच नाही तर बेकरी प्रॉडक्ट देखील खात नाही.  

भिडे यांनी त्यांच्या कुटुंबांसोबत फार कमी संबंध ठेवला आहे. त्यांचे भाऊ पुण्याला असतात आणि भिडे वर्षातून दोनदा एकटेच त्यांच्या घरी जातात. तसं ते लग्न किंवा इतर कार्यासाठी सुद्धा जातातय पण कुटुंबासोबत याचा संबंध तसा कमीच आहे. 

काही वर्षांपूर्वी बऱ्याच काळानंतर त्यांच्या बहिणीची गडकोट मोहिमेचा दरम्यान सज्जनगडावर भेट झाली होती.  

त्यांना जवळून ओळखणारे सांगतात की ते 105 सूर्यनमस्कार घालतात. पण 2022 मध्ये झालेल्या अपघातानंतर भिडे यांनी आपल्या व्यायामाचा कोटा कमी केला आहे. 

2017 मध्ये भिडे गुरुजी यांनी रायगडावर शिवाजी महाराजांसाठी 32 मण म्हणजे साधारणपणे 144 किलो सोन्याचं सिंहासन करण्याची घोषणा केली होती. जे अद्याप तरी अस्तित्वात आलेले नाही.  

सांगली आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या काही वर्षांत भाजपची झालेली वाढ याला काही प्रमाणात भिडे गुरूजींनी केलेला प्रचारही कारणीभूत आहे असं सांगितलं जातं. 

 

हे वाचलं का?

    follow whatsapp