“मोदी आणि त्यांच्या बगलबच्च्यांना देश…”, उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Shiv Sena UBT Attacks On Narendr Modi And BJP : राहुल गांधींनी लंडनमध्ये केलेल्या विधानावरून भाजपने थेट त्यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली. भाजपने केलेल्या मागणीवर शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपलाच खडेबोल सुनावले आहेत. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विधानांवर बोट ठेवत ठाकरेंच्या शिवसेनेनं काही सवाल मोदी आणि भाजपला सामना अग्रलेखातून केले आहेत.

ADVERTISEMENT

शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सामना अग्रलेखात म्हटलं आहे…

“राहुल गांधी लंडन येथे गेले व हिंदुस्थानी लोकशाहीवर त्यांनी शंका उपस्थित केल्या. ‘हिंदुस्थानातील लोकशाही धोक्यात आहे. विरोधी पक्षनेते बोलत असताना संसदेतील माईक बंद केले जातात,’ अशी टीका गांधी यांनी केली. त्यामुळे भाजप नेत्यांचे लोकशाहीवरील पुतनामावशीचे प्रेम उतूमातू जाताना दिसत आहे. संसदेच्या पहिल्याच दिवशी भाजप खासदारांनी गदारोळ केला व कामकाज बंद पाडले. पंतप्रधान मोदींना तर लोकशाहीच्या नावाने जणू हुंदकेच फुटत आहेत.”

मोदी पक्षाने आत्मचिंतन करायला हवं, ठाकरेंचा टोला

“मोदी यांचे कर्नाटकात त्यामुळे जाणे-येणे वाढले आहे व कर्नाटकातील प्रत्येक सभेत ते गांधी यांनी लोकशाहीचा अपमान केल्याचा आक्रोश करीत आहेत. जगातील कोणतीही शक्ती हिंदुस्थानच्या लोकशाही परंपरेचे नुकसान करू शकत नाही हे मोदी यांचे म्हणणे खरे आहे, पण हिंदुस्थानातील लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम प्रत्यक्ष सत्ताधारी भाजप करीत आहे व त्याच भाजपचे नेतृत्व मोदी करीत आहेत. मुळात राहुल गांधी यांनी लोकशाहीबाबत लंडन येथे केलेली विधाने चूक आहेत काय याचे आत्मचिंतन मोदी पक्षाने करायला हवे”

हे वाचलं का?

CM शिंदेंकडून ठाकरेंना आणखी एक धक्का, मोठा नेता लागला गळाला!

“देशात धर्मांधता, कट्टरतेची आग लावून राजकीय भाकऱ्या भाजल्या जात आहेत. ईशान्येकडील राज्यांत भाजपचे पुढारी ‘गोमांस भक्षणा’चे समर्थन करतात, पण देशात इतरत्र गोमांसावरून भाजपसमर्थक मुसलमानांच्या हत्या करतात. कोणी काय खायचे, प्यायचे हे लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला दिलेले स्वातंत्र्य आहे. मोदी राजवटीत हे स्वातंत्र्य उरले आहे काय? खाण्या-पिण्यावरून लोकांना रस्त्यावर जिवंत जाळले जाते हे काही लोकशाही ठिकठाक असल्याचे लक्षण नाही. लग्न, प्रेमप्रकरणे यावरून दंगली घडवायच्या व त्यास हिंदुत्वाचा मुलामा देऊन राजकीय फायदा घ्यायचा हे लोकशाहीला शोभणारे नाही.”

Uddhav Thackeray On Modi Government : “सरकारवर तरी कसा विश्वास ठेवणार?”

“विरोधी पक्षाचे अस्तित्व मान्य करायचे नाही. सरकारला प्रश्न विचारणाऱ्या राजकीय विरोधकांना खतम करायचे, तुरुंगात डांबायचे हे लोकशाहीच्या कोणत्या व्याख्येत बसते? लोकशाहीत भाजप वॉशिंग मशीनचे नक्की कर्तव्य काय यावरही चिंतन होणे गरजेचे आहे. मुळात निष्पक्ष निवडणुका हा लोकशाहीचा आत्मा आहे. आज निवडणूक आयोग व निवडणूक प्रक्रियेवरच लोकांचा विश्वास नाही. ‘ईव्हीएम’ पद्धतीत भाजप घोटाळा करत असल्याची शंका लोकांच्या मनात आहे. ईव्हीएममध्ये अदानी व्हायरस घुसवून लोकांची मते फिरवली जातात. त्यामुळे मतपत्रिकेद्वारे निवडणुका घ्या ही लोकभावना आहे. आपण केलेल्या मतदानाविषयीच जेथे लोकांच्या मनात शंका आहे तेथे आलेल्या निकालावर व त्यानंतर निर्माण झालेल्या सरकारवर तरी कसा विश्वास ठेवणार?”

ADVERTISEMENT

“शिवसेनेच्या स्वामित्वाचा निकाल देताना निवडणूक आयोगाने घटना तसेच लोकशाहीची सर्व नीतिमूल्ये पायदळी तुडवली. हा तमाशा जगाने पाहिला. देशाच्या लोकशाहीची जगभरात लाज गेली. तेव्हा राहुल गांधी लंडनमध्ये काय बोलले त्याचे काय एवढे मनावर घेता? हिंदुस्थानातील लोकशाहीच्या किंकाळ्या जगभरात पोहोचल्याच आहेत.”

Maharashtra Political Crisis: राज्यपालांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रात उलथापालथ होणार? 10 मुद्दे

ADVERTISEMENT

इतके भडकून उठण्याचे कारण काय? ठाकरेंचा मोदींना सवाल

“मोदी यांचे मित्र इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांच्या हुकूमशाही, भ्रष्ट कारभाराविरोधात तेथील जनता रस्त्यावर उतरली आहे. नेत्यानाहू हे त्यांच्याच देशात बिळात लपल्यासारखे आहेत. आपल्या देशातही अशीच खदखद आहे व स्फोट कधीही होईल असे वातावरण आहे. त्यामुळे हिंदुस्थानातील लोकशाहीवर शंका घेतली यावर इतके भडकून उठण्याचे कारण काय? देशातील संसदीय लोकशाही टिकविण्यात पंडित नेहरू यांचा वाटा मोठा आहे व राहुल गांधी त्याच नेहरूंचे पणतू आहेत. त्यामुळे लोकशाहीची हत्या चौकीदारच करत असतील तर त्यांना वाईट वाटणे साहजिक आहे.”

तेव्हा लोकशाही व देशाची इज्जत धोक्यात आली नव्हती काय? भाजपला खडेबोल

“राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन लोकशाहीवर शंका घेतली. मोदींचे सरकार लोकनियुक्त आहे. त्यामुळे त्यांच्यावर शंका घेणे राष्ट्रविरोधी आहे असे भाजपास वाटणे हे गैर नाही, पण या कारणासाठी गांधी यांचे संसद सदस्यत्वच रद्द करावे असे जे मानतात तेच येथील लोकशाहीचे हत्यारे आहेत. लंडनच्या मंचावर जाऊन राहुल गांधी जे बोलले त्यामुळे ज्यांना अतीव दुःख वगैरे झाले त्यांनी गेल्या सहा-सात वर्षांत परदेशात जाऊन मोदी यांनी काय विधाने केली तेसुद्धा पाहायला हवे. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी हे लोकशाही मार्गानेच सत्तेवर आले होते व देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व टिकविण्यासाठी इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी बलिदान दिले. पण या कुटुंबाविषयी परदेशात जाऊन अपशब्द वापरण्यात आले. तेव्हा लोकशाही व देशाची इज्जत धोक्यात आली नव्हती काय?”

Maharashtra Political Crisis : “ठाकरेंनी राजीनामा देऊन राज्यपालांचा निर्णय योग्य ठरवला”

“देशात गेल्या 70 वर्षांत काहीच झाले नाही, अशी थापेबाजी करणे हाच देशाचा सगळ्यात मोठा अपमान आहे. हिंदुस्थानात जन्म घेणे हे दुर्भाग्य असल्याचे लोक मानत होते, असे विधान पंतप्रधान मोदी यांनी परदेशात जाऊन केले. तेव्हा देशासाठी रक्त सांडलेल्या सैनिकांच्या आत्म्यास किती वेदना झाल्या असतील? पण मोदी यांना व त्यांच्या बगलबच्च्यांना देश मालकी तत्त्वाने चालवायचा आहे. त्यासाठी मर्जीतल्या एकाच उद्योगपतीला एअर इंडियापासून एलआयसी, बँका, सर्वच सार्वजनिक उपक्रम विकून लोकशाहीच्या पाठीवर शेवटची काडी ठेवण्यात आली आहे.”

“उद्योगपती अदानी यांच्या गैरकारभाराबाबत देशाने शंका उपस्थित केल्या, पण पंतप्रधान त्यावर बोलायला तयार नाहीत. संसदेत अदानीवर प्रश्न विचारणाऱ्यांचे माईक आपोआप बंद होतात. लोकशाहीतली ही भुताटकी आहे. त्याच भुताटकीवर गांधी यांनी लंडन येथे सवाल निर्माण केले. लंडन ही लोकशाहीची जननी आहे असे मानले जाते. आपण दीडशे वर्ष इंग्रजांचे गुलाम होतो. त्या गुलामीच्या बेड्या तोडताना मोदी व भाजप कोठेच नव्हता. इंग्रज शेवटी आपण घालवलेच, पण जाता जाता ते ‘लोकशाही’ची भेट देऊन गेले हे विसरता येणार नाही. राहुल गांधी यांनी लोकशाहीवरील खदखद व्यक्त करण्यासाठी लंडनचे व्यासपीठ निवडले ते त्यासाठीच”, असे खडेबोल शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नरेंद्र मोदी आणि भाजपला सुनावले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT