Akola temple incident : अकोला जिल्ह्यात असलेल्या बाळापूर तालुक्यातील पारस येथे थरकाप उडवणारी दुर्घटना घडली. गावातील मंदिरालगत असलेल्या शेडवर वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळलं. या भीषण दुर्घटनेत सात भाविकांचा मृत्यू झाला. या घटनेत 29 भाविक जखमी झाले असून, जखमींच्या आक्रोशाने परिसर हादरून गेला होता.
ADVERTISEMENT
बाळापूर तालुक्यातील पारस गावावर रविवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास मृत्यने तांडवच घातलं. पारस येथील महात्मा फुले विद्यालयाजवळ समर्थ बाबुजी महाराज मंदिरात रविवारी अनेक ठिकाणचे भाविक दर्शनासाठी आले होते.
रविवारी सायंकाळी मंदिरात आरती पार पडली. त्यानंतर सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसाला सुरूवात झाली. अचानक पाऊस सुरू झाल्याने ग्रामस्थ आणि भाविकांनी मंदिराशेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडचा आसरा घेतला.
मात्र, ज्या शेडखाली भाविक आणि ग्रामस्थ थांबले होते. त्यावर वादळी वाऱ्यामुळे कडुलिंबाचे मोठं झाडं कोसळलं. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे एकच हाहाकार उडाला. गावातील ग्रामस्थांनी मदत कार्य सुरू केलं. दुर्घटना घडली त्यावेळी 50 पेक्षा अधिक लोक शेडखाली होते. यात 7 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 29 जण जखमी झाले आहेत.
पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी मदतीला धावले
पारसमध्ये झालेल्या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मदत व बचाव कार्य हाती घेतले. दुर्घटनेनंतर घटनास्थळावर मोठा आक्रोश पहायला मिळालाय. दुर्घटनेनंतर पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बचाव कार्यात मोठे अडथळे येत होते. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. 29 जखमींवर अकोला जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
पारस येथील दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे
1) अतुल आसरे (वय 32 वर्ष, बाभूळगाव जि. अकोला)
2) विश्वनाथ तायडे (वय 35 वर्ष, सोनखेड)
3) पार्वतीबाई महादेव सुशीर (वय 65 वर्ष आलेगाव बाजार)
4) भास्कर आंबिलकर (वय 60 वर्ष अकोला)
5) उमा महेंद्र खारोडे (वय 50 वर्ष, भुसावळ)
दोन मृतकांची नावे अद्याप कळू शकलेली नाही.
मुस्लीम समुदायातील व्यक्तींकडून मदत
या दुर्घटनेनंतर बचाव कार्यात स्थानिकांनी मोठी मदत केली. यात सर्व समाजांसोबतच मुस्लिम धर्मीयही जखमींना बाहेर काढण्यासाठी सरसावले होते. या दुर्घटनेनंतर घटनास्थळावर लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धाव घेतली. यासोबतच रात्री उशिरा अमरावतीच्या विभागीय आयुक्त निधि पांडे आणि जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी घटनास्थळ आणि जिल्हा रुग्णालयाला भेट दिली.
जखमींची प्रकृती स्थिर, प्रशासनाची माहिती
दुर्घटनेत जखमी झालेल्या भाविकांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती प्रशासनानं दिली. तर रात्री 1 वाजल्यानंतर विभागीय आयुक्त निधी पांडये यांनी जखमी रुग्णांची भेट घेऊन उपचारासाठी लागणारा खर्च शासन करेल, असं सांगत धीर दिला.
ADVERTISEMENT