Ajit Pawar Yogi Adityanath : शरद पवार आणि अजित पवार यांच्यात राजकीय दुरावा आला आहे. अजित पवार सातत्याने शरद पवारांवर टीका करताना दिसतात. मात्र, एका मुद्द्यावर अजित पवारांनी शरद पवारांनी मांडलेल्या भूमिकेप्रमाणेच मत मांडले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात केलेल्या विधानावर स्पष्ट मत मांडताना अजित पवारांनी त्यांची वैचारिक भूमिका वेगळी असल्याचेच पुन्हा एकदा अधोरेखित केले.
ADVERTISEMENT
रविवारी (११ फेब्रुवारी) आळंदी येथे गीता-भक्ती अमृतमोहत्सव सोहळ्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. यावेळी बोलताना आदित्यनाथ यांनी "समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडविण्याचे काम केले", असे विधान केले होते.
आदित्यनाथ यांच्या या विधानावरून विरोधकांनी पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केले होते. शरद पवार यांनी कानउघाडणी केली होती.
पुण्यात माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले होते की, "आमच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामध्ये राजमाता जिजाऊ यांचे योगदान आहे. जिजामातेनेच शिवाजी महाराजांच्या आयुष्याला दिशा दिली. जिजाऊंनी केलेले कर्तृत्व बाजूला सारून त्यांचे श्रेय आणखी कुणाला देण्याची भूमिका काही लोक घेत आहेत. शिवाजी महाराजांचे स्वतःचे कर्तृत्व आणि राजमाता जिजाऊंनी केलेले मार्गदर्शन यामुळे हा सगळा इतिहास घडला, हे सगळ्या जगाला माहिती आहे", अशा शब्दात शरद पवारांनी म्हटले होते.
अजित पवारांनी घेतला समाचार
योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या विधानाचा उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही समाचार घेतला. ते म्हणाले, "राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवले. त्याच शिवरायांच्या गुरु आणि मार्गदर्शक होत्या. त्यांनी महाराजांना प्रेरणा दिली. याच प्रेरणेतून स्वराज्य स्थापन करायचे, या ध्येयाने शिवरायांनी मावळ्यांचे सैन्य उभे केले आणि स्वराज्याची उभारणी केली, हा इतिहास आहे."
भाजपसोबत सत्तेत, पण भूमिका वेगळी
भाजपचे नेते कायम समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते, असा इतिहास सांगत असतात. या इतिहासाला कायम विरोध होत आला आहे. यावरून बऱ्याचदा राजकारणही तापले. अजित पवारही समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरू होते, या इतिहासाला विरोध करत आले आहेत. आता अजित पवार भाजपसोबत सत्तेत आहे. असं असलं तरी अजित पवारांनी आपली वैचारिक भूमिका कायम असल्याचेच स्पष्ट केले.
ADVERTISEMENT