Nanded Hospital Death : ठाणे जिल्ह्यातील कळवा येथे महापालिका रुग्णालयात 27 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना विस्मृतीत जात नाही, तोच नांदेडमध्ये 31 रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले. तसेच औषधींचा तुटवड्या असल्याचाही आरोप केला. या घटनेवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भूमिका मांडली.
ADVERTISEMENT
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज झाली. या बैठकीत नांदेड येथील घटनेवरही चर्चा करण्यात आली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. सरकारने घटनेची गंभीर दखल घेतली असल्याचे त्यांनी सांगितलं.
एकनाथ शिंदे 31 रुग्णांच्या मृत्यूबद्दल काय बोलले?
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “मंत्रिमंडळ बैठकीत या घटनेवर चर्चा झाली. वैद्यकीय शिक्षण मंत्री, संबंधित सचिव आणि संबंधित अधिकारी घटनास्थळी गेले आहेत. या बाबतीत प्राथमिक माहिती घेतली.”
हेही वाचा >> Nanded Hospital : नांदेडमध्ये 24 रुग्णांचा मृत्यू का झाला? खरंच औषधी नव्हती का?
“रुग्णालयात १२७ प्रकारची औषधांचा साठा पूर्ण होता. औषधांची कमतरता नव्हती. उलट त्याठिकाणी औषध खरेदीसाठी १२ कोटी रुपयांना मान्यता दिली होती. औषधांचा जास्तीचा साठा तिथे होता. डॉक्टर आणि स्टाफ यांची माहिती घेतली. पूर्ण स्टाफ उपलब्ध होता”, अशी माहिती शिंदे यांनी दिली.
हेही वाचा >> मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतानाच भाजपने ‘ओबीसी जागर यात्रा’ का काढली?
“झालेली दुर्घटना, झालेले मृत्यू याची चौकशी होईल. चौकशीअंती त्यावर पुढची कारवाई होईल. कुणाचा दोष असेल, तर त्याच्यावर कारवाई होईल. सरकारने ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली आहे”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
रुग्णांचा मृत्यू का झाला? शिंदे म्हणाले…
“जे मृत्यू झालेले आहेत, त्यावर सविस्तर बोलू इच्छित नाही. पण, काही वयोवृद्ध लोक होते. त्यांना ह्रदयाचा त्रास होता. एक रस्ते अपघातातील रुग्ण होता. लहान बालक प्री टर्म होती आणि वजनाने कमी होती. चौकशी अंती अहवाल आल्यानंतर माहिती दिली जाईल. झालेली घटना सरकारने गांभीर्याने घेतली आहे. मंत्री, सचिव आणि अधिकाऱ्यांना रुग्णालयात पाठवले आहे”, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
ADVERTISEMENT