Maharashtra News Update: कोल्हापूर: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात मागील दोन दिवस धरण क्षेत्र तसेच पंचगंगेच्या (Panchganga) खोऱ्यात संततधार सुरु होती. मागील 24 तास पंचगंगा नदीची पाणीपातळी काहीशी स्थिर राहिली. मात्र, धरणक्षेत्रात रात्री पुन्हा पावसाचा जोर वाढल्यामुळे राधानगरी धरणाचे (Radhanagari Dam) पाच दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे कुंभी, कासारी व राधानगरी या धरणांचा मिळून अंदाजे 8 हजार क्युसेस विसर्ग पंचगंगेत येण्याचा अंदाज आहे. सद्यस्थितीत राजाराम बंधारा येथे 40-41 फुटावर असलेली पाणीपातळी पुढील 15 तासात 45 फुटावर जावू शकते. पंचगंगा धोका पातळीवर वाहण्यास सुरुवात झाल्यावर कोल्हापूर शहर तसेच ग्रामीण भागातील गावांमध्ये पुराचे पाणी शिरते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरुन न जाता वेळेत पाणी येण्याआधीच स्थलांतर करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नागरिकांना केले आहे. (heavy to very heavy rainfall five gates of radhanagari dam opened flood water will enter kolhapur city news kolhapur)
ADVERTISEMENT
सध्या राजाराम बंधारा येथून 6 हजार 106 क्युसेस विसर्ग सुरु आहे. राधानगरीतून येणारा नवीन विसर्ग 7 हजार क्युसेस आहे. कुंभी व कासारी मधून अनुक्रमे 700 व 1 हजार क्युसेक विसर्ग सुरु आहे. असा मिळून 8 हजार क्युसेसपेक्षा जास्त विसर्ग पंचगंगा नदीत वाढणार आहे. या काळामध्ये अजून पाऊस पडल्यास पुढे पाणीपातळीही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून वेळेत आवश्यक त्या ठिकाणी स्थलांतरण प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिली आहे.
संभाव्य पूरपरिस्थिती पाहता पूरबाधित क्षेत्रात नागरिकांनी शेतात जावू नये किंवा बाधित क्षेत्रातील कामे करु नयेत. स्थलांतरासाठी आवश्यक तयारी करुन प्रशासनाच्या सुचनेनुसार घर सुरक्षित बंद करुन नागरिकांनी बाहेर पडावे. प्रशासनाकडून पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांसाठी जिल्ह्यात शहरी तसेच ग्रामीण भागात मिळून संभाव्य 478 निवारागृह तयार करण्यात आली आहेत.
हे ही वाचा >> मोठी बातमी: मुंबईकरांना रेड अलर्ट, शाळा-कॉलेजच्या सुट्टीबाबत मोठा निर्णय
नागरिकांना निवारा, अन्न, पाणी, स्वच्छतागृह इत्यादी आवश्यक सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच पशुधनासाठी निवारा, चारा याचीही सोय करण्यात आली आहे. आतापर्यंत 65 कुंटुंबातील 319 जणांचे स्थलांतरण झाले आहे. 127 जनावरे स्थलांतरीत करण्यात आली आहेत. महापालिकेने 15 कुंटुंबातील 51 जणांना स्थलांतरीत केले आहे. आज दुपारी 3 वाजेपर्यंत महानगरपालिकेद्वारे शहरातील इतर सर्व पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतरण करण्यात येणार आहे. निवारागृहात नागरिकांसाठी इतर सुविधा यात औषधे व अनुषंगिक साहित्यांचा पुरवठा केला जात आहे.
प्रशासनाकडून पब्लिक ॲड्रेस सिस्टीम कार्यान्वित
आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये, जीवित हानी होवू नये यासाठी तातडीने सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आवश्यक संदेश पोहचवण्यासाठी प्रशासनाच्यावतीने बसविण्यात आलेल्या पब्लिक ॲड्रेस सिस्टीमचा वापर करण्यात येत आहे. तसेच गावातील पारंपरिक माध्यमे याद्वारे तातडीने संदेश देण्यात येत आहेत. यामुळे प्रशासनासह सर्व नागरिक येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. संभाव्य पूरपरिस्थिती व नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी याबाबतची माहिती माध्यमांव्दारे नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचवली जात असल्याबद्ददल जिल्हाधिकारी रेखावार यांनी सर्व माध्यमांना धन्यवाद दिले.
हे ही वाचा >> IMD: ‘गरज असेल तरच घराबाहेर पडा’, हवामान खात्याने पावसाबाबत दिला मोठा इशारा
पूरस्थितीमूळे बाधित होणाऱ्यांची संख्या कमी करणे, जीवित हानी टाळणे हा पब्लिक ॲड्रेस सिस्टीम राबविण्याचा प्रमुख हेतू असल्याचे स्पष्ट केले. कोल्हापूर येथे राष्ट्रीय आपत्ती निवारणाची (NDRF) ची एक तुकडी दाखल झाली आहे. आवश्यकता भासल्यास दुसरी तुकडी पाचारण करण्यात येणार आहे. सद्या पोलीस प्रशासनही पूरबाधित क्षेत्रात सर्व स्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले. सन 2019 व 2021 च्या पूरस्थितीसारखी परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. पूरबाधित क्षेत्रातील शाळा पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार असून याबाबत शिक्षण विभागाला आदेश देण्यात आले आहेत.
अलमट्टी धरणाबाबत समन्वय
अलमट्टी धरण व हिप्परगे बंधाऱ्याच्या पाणीसाठ्यावर कृष्णा व पंचगंगेची पाणीपातळी मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. याबाबत महाराष्ट्र शासन व कर्नाटक राज्याच्या सिंचन विभागामध्ये समन्वय साधला जात आहे. 517.5 मीटर पर्यंत पाणीपातळी राहण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पुढे तसा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे सध्या तरी कृष्णा नदीची पाणीपातळी कमी असल्याने व पुढील विसर्ग सुरु असल्याने आपल्याला धोका नसल्याचेही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले.
ADVERTISEMENT