Bihar Buxar Train Accident : बिहारमधील (Bihar) बक्सरमध्ये (Buxar) रघुनाथपूर स्टेशनजवळ नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेस (North East Express) रुळावरून घसरली. येथे रेल्वेच्या सर्व बोगी रुळावरून घसरल्या. दोन बोगी पूर्णपणे उलटल्या. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती मिळाली असून त्यात आई आणि आठ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे, तर इतर दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. (In Bihar Buxar North East Express derailed 4 People Died)
ADVERTISEMENT
23 डब्यांसह 12506 नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसने बुधवारी (11 ऑक्टोबर) सकाळी 7:40 वाजता दिल्लीच्या आनंद विहार टर्मिनलवरून गुवाहाटीपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कामाख्याला जाण्यासाठी सुमारे 33 तासांचा प्रवास केला. या दरम्यान, त्याच दिवशी रात्री बिहारमधील बक्सरच्या रघुनाथपूर स्टेशनजवळ अपघात झाला.
वाचा : गरब्यात मुस्लिमांना बंदी : ‘…तर PM मोदींची जास्त पंचाईत होईल’, ठाकरेंचा हल्ला
उषा भंडारी आणि तिची आठ वर्षांची मुलगी अमृता कुमारी अशी मृतांची नावे आहेत, त्या आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातील सादियान गावातील रहिवासी होत्या. उषा तिची मुलगी आणि पतीसोबत अन्य एका मुलीसोबत दिल्लीहून आसामला जात होती.
तिसऱ्या मृताचे नाव (27 वर्षीय) जैद असून तो बिहारमधील किशनगंज जिल्ह्यातील सप्तेय विष्णुपूरचा रहिवासी आहे. तो दिल्लीहून किशनगंजला जात होता. चौथ्या मृताची ओळख पटलेली नाही. मृतांव्यतिरिक्त 100 लोक जखमी झाले आहेत. या सर्वांवर बक्सर, भोजपूर आणि पाटणा एम्समध्ये उपचार सुरू आहेत.
झटका बसला तेव्हा एसी कोचमधील बहुतांश लोक होते गाढ झोपत
मृतांच्या नातेवाईकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी हा अपघात अत्यंत भीषण असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, एसी बोगीतील सर्व प्रवासी जवळपास झोपले होते किंवा झोपण्याच्या तयारीत होते, तेव्हा अचानक ट्रेनला धक्का लागला. प्रत्येकजण आपापल्या बर्थवरून पडू लागला. सुमारे 10 ते 15 मिनिटे ट्रेनमध्ये जोरदार हादरे बसले. कोणाला काही समजेपर्यंत ट्रेनच्या सर्व 23 बोगी रुळावरून घसरल्या होत्या. दोन बोगी उलटल्या होत्या.
ट्रॅक उखडला होता. काही प्रवासी बर्थखाली, काही खिडकीखाली तर काही टॉयलेटमधअये अडकले होते. हा अपघात इतका भीषण होता की त्याचा आवाज एक किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. असा भयावह आवाज ऐकून शेकडो ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आणि लोकांना मदत करू लागले.
वाचा : IND vs AFG : रोहित शर्माची तुफान आतशबाजी! भारताने पाडला रेकॉर्डसचा पाऊस
‘आम्ही बर्थखाली दबलो होतो, कसेबसे बाहेर आलो…’
रेल्वे अपघातात जखमी झालेल्या आसामच्या अब्दुल मलिकने सांगितले की, आम्ही आमच्या बर्थखाली दबलो होतो. बाहेर येताच रेल्वेचा अपघात झाल्याचे दिसले. सर्व बोगी इकडे तिकडे पडून होत्या. आजूबाजूचे अनेक लोक घटनास्थळी येऊन लोकांना मदत करत असल्याचे आम्ही पाहिले. बोगीत घुसून, बाहेरून काचा फोडून ते प्रवाशांना बाहेर काढत होते.
रेल्वे गार्डने अपघाताबद्दल काय सांगितले?
नॉर्थ ईस्ट 12505 ट्रेनचे गार्ड विजय कुमार यांनी सांगितले की रात्रीचे 9.00 वाजले होते, आम्ही आमच्या सीटवर बसून पेपरवर्क करत होतो, तेव्हा अचानक झटका बसला आणि आम्ही आमच्या सीटवरून पडलो. काय झालं ते समजलंच नाही. रेल्वेचा वेग 100 किमी असावा. आम्ही तिथे उभे राहिलो तोपर्यंत रेल्वेचा अपघात झाला होता.
‘धुराचे लोंढ… एसी डब्यांना सर्वाधिक फटका’
हरी पाठक नावाच्या स्थानिक रहिवाशाने सांगितले की रेल्वे सामान्य वेगाने येत होती, पण अचानक आम्हाला मोठा आवाज आला आणि रेल्वेमधून धुराचे लोंढे उठू लागले. काय झाले ते पाहण्यासाठी आम्ही धावलो. रेल्वे रुळावरून घसरल्याचे आणि एसी डब्यांचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे आम्ही पाहिले.
वाचा : ललित पाटील ड्रग्ज प्रकरण! अवघ्या पोलिसांना गुंगारा देणारे आरोपी पाटील बंधू कोण?
अपघातानंतर रुग्णवाहिका आणि डॉक्टर घटनास्थळी पोहोचले
पूर्व मध्य रेल्वे झोनचे मुख्य जनसंपर्क अधिकारी बीरेंद्र कुमार यांनी सांगितले की, ‘ट्रेनने बक्सर स्थानक सोडल्यानंतर हा अपघात झाला. रघुनाथपूर स्टेशनजवळ हा अपघात झाला. घटनेनंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. अपघातानंतर रुग्णवाहिका आणि डॉक्टर घटनास्थळी पोहोचले.’
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी एक निवेदन जारी केले की, ‘आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य विभागांनी शक्य तितक्या लोकांना मदत सुनिश्चित करण्यासाठी त्वरित पावले उचलावीत. मी बक्सर आणि भोजपूरच्या जिल्हा दंडाधिकार्यांशी बोललो आहे. त्यांना लवकरात लवकर घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.’
प्रवाशांच्या वाहतुकीसाठी रेल्वेची पर्यायी व्यवस्था
रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, रुळावरून घसरलेल्या रेल्वे प्रवाशांना त्यांना जायचं होतं त्या ठिकाणी नेण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांची ने-आण करण्यासाठी पाटणा येथून स्क्रॅच रेक पाठवण्यात आला. स्क्रॅच रेक हा तात्पुरता रेक आहे ज्यामध्ये मूळ रेल्वे प्रमाणेच कॉन्फिगरेशन असते. प्रवाशांसाठी सहा बसेसही पाठवण्यात आल्या होत्या. राजधानी एक्स्प्रेससह दिल्ली आणि दिब्रुगड दरम्यानच्या मार्गावर धावणाऱ्या किमान 18 गाड्या वळवण्यात आल्या आहेत.
अपघातामागील मुख्य कारण काय? शोध सुरू- रेल्वेमंत्री
या अपघाताबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करून अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. यासोबतच ते म्हणाले, ‘आम्ही तपास करू आणि रुळावरून घसरण्याचे मुख्य कारण काय होते ते शोधू. बचाव कार्य पूर्ण झाले असून सर्व डब्यांची तपासणी करण्यात आल्याचे मंत्री म्हणाले.’
ADVERTISEMENT