भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून पाठपुरावा करण्यात आलेल्या कोर्लईतील 19 बंगले प्रकरणात उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढताना दिसत आहे. मुरुड तालुक्यातील कोर्लई गावातील कथित 19 बंगले घोटाळा प्रकरणात रेवदंडा पोलिसांनी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक केली आहे. सोमवारी म्हणजेच 10 एप्रिल रोजी रात्री साडे आठ वाजता पोलिसांनी मिसाळांवर अटकेची कारवाई केली.
ADVERTISEMENT
कोर्लई येथील कथित 19 बंगले प्रकरणात रेवदंडा पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्यात कोर्लई ग्रामपंचायतीचे तत्कालिन ग्रामसेवक, सरपंच आणि सदस्यांचा समावेश आहे.
हेही वाचा >> ‘जो बायकोचा नाही होऊ शकला तो महाराष्ट्राचा काय होणार?’, सोमय्यांची बोचरी टीका
कथित 19 बंगले प्रकरणात बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. भारतीय दंड विधान कलम 420, 465, 466, 468 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे. मुरुडच्या ग्राम विकास अधिकारी संगिता भांगरे यांनी यासंदर्भात रेवदंडा पोलिसांत तक्रार दिली होती.
कोर्लई कथित 19 बंगले घोटाळा; गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये कोण?
तक्रारीनंतर रेवदंडा पोलिसांनी कोर्लई गावचे तत्कालिन ग्रामसेवक विनोद मिंडे यांच्यासह देवंगणा वेटकोळी, देविका म्हात्रे, गोविंद चंदर वाघमारे, रेश्मा रमेश मिसाळ, रेमा रमेश पिटकर आणि प्रशांत जानू मिसाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू असून, पहिली अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
किरीट सोमय्यांचे आरोप : ठाकरे-वायकर 19 बंगले घोटाळा प्रकरण काय?
किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात आरोप केले होते. त्यांच्या आरोपानुसार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा रवींद्र वायकर यांच्या नावावर मुरूड तालुक्यातील कोर्लई गावात जमीन खरेदी केली होती. या जागेवर 19 बंगले होते, पण त्याची नोंद रद्द केल्याचा आरोप आहे.
रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी 2014 मध्ये स्व. अन्वय नाईक यांच्याकडून कोर्लई गावातील जागा तिथे झालेल्या बांधकामासह विकत घेतली. या जागेवर 19 बंगले असल्याची नोंद ग्रामपंचायत कार्यालयात होती. त्याची घरपट्टी अन्वय नाईक भरायचे, असा आरोप आहे.
हेही वाचा >>> रश्मी ठाकरेंची ‘ती’ दोन पत्रं, सोमय्यांचा खळबळजनक दावा; पत्रात नेमकं काय?
19 बंगले रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकरांच्या नावे करण्यात आले. त्यांची घरपट्टीही भरली गेली, मात्र नंतर हे प्रकरण अगलट येण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर 2022 मध्ये कागदपत्रांमध्ये फेरफार बंगल्यांची नोंदणी रद्द केली आणि ते पाडले, असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी केलेला आहे.
ADVERTISEMENT