लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वर गोळी का झाडली? रात्री 11 वाजता शासकीय निवासस्थानी काय घडलं?

Latur News : लातूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, मनोहरे यांनी वापरलेली बंदूक ताब्यात घेतली आहे. ही बंदूक त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी असलेली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

06 Apr 2025 (अपडेटेड: 06 Apr 2025, 10:11 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मनपा आयुक्तांचा आत्महत्येच्या प्रयत्न

point

लातूर जिल्हा हादरला

point

शासकीय निवासस्थानी रात्री उशिरा काय घडलं?

लातूर : लातूर जिल्हा रविवारी सकाळीच एका घटनेनं हादरला. लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी रात्री उशिरा स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेनं संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, मनोहरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय. त्यांच्यावर सध्या लातूर येथील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे वाचलं का?

रात्री आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानी काय घडलं? 

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 11 ते 11:30 च्या दरम्यान ही घटना घडली. बाबासाहेब मनोहरे हे आपल्या सरकारी निवासस्थानावरच होते. त्यांनी आपल्या कुटुंबासह जेवण केलं आणि खोलीत गेले. त्यानंतर काही वेळाने गोळीबाराचा जोरदार आवाज झाला. त्यामुळे घरातील सदस्यांनी खोलीत धाव घेतली. तिथे त्यांना मनोहरे रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत आढळले. त्यांनी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडल्याचे स्पष्ट झाले. गोळीमुळे त्यांची कवटी फुटली असून, गोळी आरपार गेल्याने मेंदूतही गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे.

हे ही वाचा >> ढसाढसा रडल्या, कागद-सह्या दाखवल्या, करूणा शर्मांनी धनंजय मुंडेंच्या कोणत्या 3 निकटवर्तीयांची नावं घेतली?


मनोहरे यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. गोळीमुळे मेंदूत तुकडे पसरले असून, त्यांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांचे पथक अथक प्रयत्न करत आहे. रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, पुढील 48 तास त्यांच्या प्रकृतीसाठी निर्णायक ठरणार आहेत.

आत्महत्येचा प्रयत्न का?

मनोहरे यांनी असा टोकाचा निर्णय का घेतला, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. एक सरळ आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या सहकाऱ्यांना आणि कुटुंबीयांना हा निर्णय अनपेक्षित आणि धक्कादायक वाटला आहे. काही सूत्रांनुसार, गेल्या काही दिवसांपासून ते तणावात असल्याचे बोललं जात आहे. मात्र, या तणावामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, त्यांच्या कुटुंबीयांची आणि सहकाऱ्यांची चौकशी सुरू आहे.

हे ही वाचा >> स्कॉर्पिओमधून आले, महिलेला उचलून नेलं... पिंपरीतल्या अपहरणाचा काही तासात उलगडा, मोठा ट्वीस्ट

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच लातूर शहराचे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी तातडीने जिल्हाधिकारी डॉ. वर्षा ठाकूर-घुगे आणि पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. अत्यंत धक्कादायक अशी ही घटना असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच, प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि मनोहरे यांना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, याची खबरदारी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा

लातूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, मनोहरे यांनी वापरलेली बंदूक ताब्यात घेतली आहे. ही बंदूक त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी असलेली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. पोलिस आता या प्रकरणातील सर्व पैलूंची तपासणी करत आहेत. मनोहरे यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नामागील कारण शोधण्यासाठी त्यांच्या फोन रेकॉर्ड्ससह इतर पुरावेही तपासले जाणार आहेत.

    follow whatsapp