रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी कुस्तीपटू आक्रमक झालेले आहेत. महिन्यापेक्षा अधिक काळापासून कुस्तीपटू मागणीसाठी रस्त्यावर उतरलेले असून आज दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरहून नवीन संसद भवनाकडे निघालेल्या कुस्तीपटूंना ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवरून कुस्तीपटूंचे तंबूही हटवले.
ADVERTISEMENT
23 एप्रिलपासून जंतर-मंतरवर ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात निदर्शने करणाऱ्या कुस्तीपटूंनी नवीन संसद भवनाकडे शांततापूर्ण मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार सकाळी 11.30 वाजता कुस्तीपटू नवीन संसद भवनाकडे रवाना झाले. कुस्तीपटूंना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी बॅरिकेड्स लावले होते.
हेही वाचा >> ‘घराणेशाहीत अडकलेल्यांना सावरकरांचं…’, मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर टीका
नवीन संसद भवन बाहेर जाण्यासाठी निघालेल्या पैलवानांनी बॅरिकेड्स तोडले. त्यावेळी पोलिसांनी साक्षी मलिकसह काही कुस्तीपटूंना ताब्यात घेतले. नवीन संसद भवनापर्यंत शांततापूर्ण मोर्चा काढण्याच्या भूमिकेवर पैलवान ठाम राहिले. शांततापूर्ण मोर्चा काढणे हा आपला हक्क असल्याची भूमिका कुस्तीपटूंनी घेतली आणि दिल्ली पोलीस देशविरोधी असल्याचा आरोप केला.
जंतरमंतर ते नवीन संसद भवनाकडे कुस्तीपटू निघाले अन्…
पोलिसांनी बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी रस्त्यावरच धरणे आंदोलन सुरू केलं. त्याआधी विनेश फोगट यांनी महिला महापंचायतीसाठी येणाऱ्या सर्व नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप करत एका व्हिडिओतून केला.
फोगट बहिणींचा फोटो ट्विट करत DCW अध्यक्षांची टीका
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी फोगट बहिणींचा फोटो ट्विट केला आहे. या छायाचित्रात संगीता फोगट आणि विनेश फोगट या दोघी बहिणी एकमेकांना मिठी मारताना रस्त्यावर पडलेल्या दिसत आहेत. जेव्हा पोलिसांनी कुस्तीपटूंना नवीन संसद भवनाकडे जाण्यापासून रोखले आणि त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा दोन्ही बहिणी एकमेकींना घट्ट पकडून रस्त्यावरच पडल्या.
साक्षी मलिक पोलिसांच्या ताब्यात
हे छायाचित्र ट्विट करताना स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलिसांना टोला लगावला. या मुलींनी परदेशात जाऊन तिरंगा फडकावला आहे, असं दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुखाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. आज या मुलींना अशा प्रकारे ओढले जात आहे आणि रस्त्यावर तिरंग्याचा अशा प्रकारे अपमान केला जात आहे, असंही त्या म्हणाल्या.
हेही वाचा >> ‘भांग घेतल्यावर माणूस डुलायला लागतो..’, सदाभाऊ खोतांनी मंत्री शंभूराज देसाईंना डिवचलं!
कुस्तीपटू बजरंग पुनियानेही प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्ही सकाळी साडेअकरा वाजता नव्या संसदेकडे निघू करू. पोलीस प्रशासनाला मी आवाहन करणार आहे की, आम्ही शांततेने जाऊ, आम्हाला त्रास देऊ नका. सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिस अधिकारी गैरवर्तन करत असल्याचा आरोप पुनिया यांनी केला होता. कुटुंबांनाही आत प्रवेश दिला जात नाही. आज महापंचायत होणार आहे. आम्ही कालच परवानगीसाठी अर्ज केला होता. पोलिस आमच्या लोकांची दिशाभूल करत आहेत. आमची कोणतीही चर्चा झाली नाही, असंही पुनिया म्हणाला.
सरकार तडजोड घडवून आणण्यासाठी दबाव टाकत आहे : विनेश फोगट
तत्पूर्वी, प्रसारमाध्यमांशी बोलताना विनेश फोगट यांनी सरकार आपल्यावर तडजोडीसाठी दबाव टाकत असल्याचा आरोप केला होता, मात्र जी अट ठेवण्यात आली आहे ती ब्रिजभूषणच्या अटकेची अजिबात नाही म्हणून आम्ही तडजोडीसाठी तयार नाही. नव्या संसदेसमोर महिला सन्मान महापंचायत होणार आहे.
दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था
कुस्तीपटूंच्या नव्या संसद मोर्चाच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. पूर्व दिल्लीचे डीसीपी अमृता गुगुलोथ यांनी सांगितले की, अशा प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी दिल्ली पोलीस पूर्णपणे तयार आहेत. आमच्याकडे अतिरिक्त सुरक्षा दल आहेत आणि सर्व तैनात करण्यात आले आहेत. त्याचवेळी, खाप पंचायतीच्या नेत्यांनी आणि शेतकऱ्यांनी नवीन संसद भवनाच्या दिशेने निघालेल्या आंदोलक पैलवानांच्या मोर्चात सामील होण्याची घोषणा केल्याने पोलिसांनी टिकरी सीमेवर कडक बंदोबस्त ठेवला होता.
ADVERTISEMENT