Shivaji Maharaj: जयदीप आपटेने मुंबई Tak सांगितलेलं 'मालवणला निघालोय', कुठे आणि कसा झाला फरार?

रोहित गोळे

28 Aug 2024 (अपडेटेड: 28 Aug 2024, 10:33 PM)

Jaydeep Apte Abscond: मुंबई Tak ला फोनवरून दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये जयदीप आपटे याने हे सांगितलं होतं की, तो मालवणला निघाला आहे. मात्र, आता 48 तास उलटून गेल्यानंतरही आरोपी जयदीप आपटे हा पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

जयदीप आपटेने  मुंबई Tak सांगितलेलं 'मालवणला निघालोय'

जयदीप आपटेने मुंबई Tak सांगितलेलं 'मालवणला निघालोय'

follow google news

बातम्या हायलाइट

point

शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेविरोधात गुन्हा

point

जयदीप आपटे नेमका कसा झाला फरार?

point

जयदीप आपटे 48 तासानंतरही पोलिसांना सापडलेला नाही

Jaydeep Apte: मुंबई: सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर साधारण 8 महिन्यांपूर्वी नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आलं होतं. पण हाच पुतळा दोन दिवसांपूर्वी अचानक कोसळला. ज्यानंतर पुतळा तयार करणारा कल्याणचा शिल्पकार जयदीप आपटे याच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला. आता हाच जयदीप आपटे मागील 48 तासांपासून फरार झाला आहे. पण घटनेच्या दिवशी मुंबई Tak ला फोनवरून दिलेल्या प्रतिक्रियेत जयदीप आपटेने आपण मालवणाला जात असल्याची माहिती दिली होती. 

हे वाचलं का?

राजकोट येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचं वृत्त हे 26 ऑगस्ट 2024 रोजी सकाळच्या सुमारास समोर आलं होतं. त्यानंतर या घटनेचे अनेक पडसाद उमटू लागले.

हे ही वाचा>> Jaydeep Apte ने शिवाजी महाराजांच्या मूर्तीमध्ये का दाखवलेला 'तो' घाव?, ती पोस्ट अन्...

दरम्यान, हा पुतळा कोणी बनवला आणि त्याची निर्मिती कशा पद्धतीने झाली याबाबत शोध घेतला गेला तेव्हा शिल्पकार जयदीप आपटे हे नाव समोर आलं. ब्राँझची मोठी शिल्पं बनविण्याचा फारसा अनुभव नसताना देखील त्याला एवढ्या मोठ्या पुतळ्याचं कंत्राट कसं दिलं गेलं हा सवाल विचारण्यात आला. 

दुसरीकडे शिंदे सरकारने या सगळ्या प्रकाराची जबाबदारी झटकत नौदलाकडे बोट दाखविण्याचा प्रयत्न केला. पण असं असताना राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने घटनेच्या दिवशी शिल्पकार जयदीप आपटे याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. 

जयदीप आपटेने मुंबई Tak ला सांगितलेलं तो मालवणला निघालाय! 

दरम्यान, जेव्हा या सगळ्या प्रकरणात शिल्पकार जयदीप आपटे याचं नाव समोर आलं तेव्हा तात्काळ मुंबई Tak च्या प्रतिनिधीने जयदीप आपटे याचं कल्याण मधील घर गाठलं. पण त्याला तिथे कुणीही सापडलं नाही. या घटनेची माहिती मिळताच जयदीपने आपलं कल्याणमधील घर सोडलं होतं. तर त्याचं कुटुंब देखील घराला टाळं लावून तिथून निघून गेलेलं.

हे ही वाचा>> Devendra Fadnavis: "नारायण राणे कुणाला धमक्या..."; राजकोटच्या राड्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस कडाडले

याचवेळी आमच्या प्रतिनिधीने जयदीपशी फोनवरून त्याची प्रतिक्रिया घेण्यासाठी अनेकदा संपर्क केला. मात्र, त्याने फोन उचलला नाही. 

दरम्यान, घटनेच्याच दिवशी म्हणजे 26 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजून 46 मिनिटांनी मुंबई Tak ने पुन्हा एकदा जयदीप आपटेशी फोनवरून संपर्क केला. यावेळी मात्र जयदीपने फोन उचलला. 

जयदीप आपटेने मुंबई Tak ला दिलेली प्रतिक्रिया जशीच्या तशी..

प्रतिनिधी: शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलाय, त्या घटनेबाबत तुझं काय म्हणणं आहे?

जयदीप आपटे: जी घटना घडली त्याबाबत वाईटच वाटतंय, आता चाललोय तिकडे

प्रतिनिधी: तू आता मालवणला चाललाय का?

जयदीप आपटे: नेमकं कशामुळे हे झालं ते सांगू शकत नाही. हो.. मी मालवणला चाललोय. 

प्रतिनिधी: हा पुतळा तू कल्याणमध्येच बनवला होता का? 

जयदीप आपटे: हो... कल्याणमध्येच

प्रतिनिधी: तू पुतळा बनवला होता तर तुझ्याबाबत सवाल उपस्थितीत होत आहेत. 

जयदीप आपटे: मला कारण लक्षात येत नाहीए.. पण ज्याने पुतळा तयार केला आहे ज्याचं नाव असतं त्यालाच जबाबदार धरलं जातं. 

प्रतिनिधी: तुला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम दिलं कोणी होतं? नौदलाने दिलं होतं की शिंदे सरकारमधील कोणत्या अधिकाऱ्याने दिलं होतं? 

जयदीप आपटे: नाही.. नाही.. नौदलानेच दिलं होतं हे काम.. 

प्रतिनिधी: आता तुझ्यावर कारवाई केली जाईल, तर पुढे.. 

जयदीप आपटे: ते बघू ना आता.. तिथे गेल्यावर समजेल आता काय ते.. 

साधारण 1 मिनिटाच्या संभाषणातून हे स्पष्ट होतंय की, जयदीप आपटे हा पुतळा कोसळल्याची घटना समजताच मालवणच्या दिशेने निघालो असल्याचं सांगत होता.

48 तासानंतरही जयदीप आपटे फरार

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, जयदीप आपटे हा मालवणला पोहचलाच नाही. घटनास्थळी न पोहचता तो अचानक बेपत्ता झाला. 

मागील दोन दिवसांपासून मुंबई Tak ने जयदीप आपटेशी अनेकदा फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने त्याचा फोन स्विच ऑफ केला आहे. 

या घटनेप्रकरणी जयदीप आपटे विरोधात मालवण पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण अद्यापही पोलिसांना जयदीप आपटे किंवा या गुन्ह्यातील आरोपींचा शोध लावता आलेला नाही. 

पोलीस प्रशासनाची स्वत:ची प्रचंड मोठी यंत्रणा असताना देखील जयदीप आपटे हा अद्यापही पोलिसांच्या हाती का लागू शकलेला नाही? असा सवाल आता सातत्याने विचारण्यात येत आहे.

    follow whatsapp