Akshay Bhalerao Murder Case : नांदेड (Nanded) शहरातील बोंढार हवेली संकुलात लग्नाच्या वराती दरम्यान दोन गटात तुफान वाद झाला होता. या वादातून अक्षय भालेराव (Akshay bhalerao) या तरूणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतरही वाद शमला नाही, याउलट मृत तरूणाच्या घरावर देखील दगडफेकीची घटना देखील घडली होती. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कलम 302 अन्वये 9 जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला असून सात जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. (nanded akshay bhalerao murder case atrocity registered against 9 people and seven accused arrested)
ADVERTISEMENT
घटनाक्रम काय?
पोलिसांना मृत तरूणाचा भाऊ आकाश भालेरावने दिलेल्या तक्रारीनुसार, बामणी गावात 1 जूनला नारायण तिडके या तरूणाचं लग्न झाले. या लग्नाची वरात बोंढारे हवेली गावात आली. या वरातीत डिजेच्या तालावर लोक हातात खंजीर, काठया आणि तलवारी घेऊन नाचत असल्याचा आऱोप आकाशने केला आहे. या वराती दरम्यान आकाश आणि त्याचा भाऊ अक्षय भालेराव कामाजी तिडके यांच्या दुकानात किराणा सामान घेण्यासाठी आला होता.
हे ही वाचा : ‘ते’ हसणं साक्षीसाठी ठरलं जीवघेणं; साहिलने का केला होता तिघांच्या हत्येचा प्लान?
या दरम्यान लग्नाची वरात जात असताना संतोष संजय तिडके याने आम्हा दोन्ही भावांना पाहून जोरजोरात आरडाओरडा करत जातीवाचक शिविगाळही सुरू केली. तसेच गावात जयंती साजरी करतात? यासाठी त्यांना मारले पाहिजे, असे सांगत कृष्णा गोविंद तिडके, नीळकांत रमेश तिडके, नारायण विश्वनाथ तिडके, शिवाजी दिगंबर तिडके या सर्वांनी मिळून आकाशला लाठ्या-काठ्या आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करायला सुरूवात केली. त्यानंतर सर्वांनी माझ्या भावाचे हातपाय पकडून संतोष आणि दत्ता यांनी हातात खंजीर घेऊन माझ्या भावाच्या पोटात वार करून त्याची हत्या केली. यावेळी आकाशचा बचाव करायला गेलेल्या अक्षयला देखील महादू गोविंद तिडके, बाबुराव सोनाजी तिडके, बालाजी मुंगळ यांनीही मारहाण केली. या मारहाणीत अक्षय गंभीर जखमी झाला होता. अक्षयच्या आईने माझ्या मुलांना सोडा अशी विनवणी केली, मात्र तिला देखील महादू गोविंद तिडके बापूराव सोनाजी तिडके याने मारहाण केली.यावेळी ग्रामस्थांच्या मदतीला आलेल्या नीलेश सुरेश भालेराव, संदेश भालेराव, धम्मानंद चांगोजी भालेराव यांनाही मारहाण करण्यात आली.
आकाश श्रावण भालेराव यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलिसांनी भारतीय दंडविधान संहितेनुसार गुन्हा दाखल केला. कलम 302, 307,143,147, 148,149,324,323, 294, 34 शस्त्रास्त्र कायद्याची कलमे आणि अत्याचाराची विविध कलमे जोडून क्रमांक 392/2023 नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कलम 302 अन्वये 9 जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला असून सात आरोपींना अटक केली आहे. या घटनेनंतर गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास नांदेड शहर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव करीत आहेत.
हे ही वाचा : बिहार ते महाराष्ट्र, 59 मुलांची तस्करी, पोलिसांना हाणून पाडला तस्करीचा डाव
दरम्यान बोंढार गावात हाणामारी झाल्यानंतर गावात तणावाचे वातावरण आहे. रात्री गावात झालेल्या दगडफेकीत काही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पंचनामा सुरू आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन देखील केले आहे.
ADVERTISEMENT