Pune Crime News: पुणे: MPSC परीक्षेत (MPSC Exam) राज्यात तिसऱ्या आलेल्या दर्शना पवार (Darshana Pawar) या 26 वर्षीय तरुणीच्या हत्येने अवघा महाराष्ट्र हादरून गेला आहे. स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळविल्यानंतर अवघ्या काही दिवसातच तिची राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी निर्घृण हत्या करण्यात आली. ज्या प्रकरणी तिच्या लहानपणीचा मित्र राहुल हांडोरे (Rahul Handore) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या अटकेनंतर आता नवनवी आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. ज्यानुसार राहुलने दिलेला लग्नाचा प्रस्ताव धुडकावल्याने तिची हत्या (Murder) करण्यात आल्याचं पोलिसांनी यावेळी सांगितलं. मात्र, दोन दिवसांपूर्वी अशी माहिती समोर आली होती की, दर्शनाच्या कुटुंबीयांनी राहुलसोबत लग्न लावून देण्यास नकार दिला होता. पण आता याबाबत एक नवी माहिती समोर आली आहे. (pune mpsc darshana pawar rahul handore rejection of marriage proposal murder crime)
ADVERTISEMENT
राहुलला लग्नासाठी कोणी नकार दिला होता?
पुणे ग्रामीणचे एसपी अंकित गोयल यांनी काल (22 जून) या हत्येप्रकरणी पत्रकार परिषद घेतली होती. ज्यामध्ये त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला. आरोपी राहुल हांडोरे आणि दर्शना पवार हे एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते. त्यामुळेच दर्शना त्याच्यासोबत बाइकने राजगडावर ट्रेकसाठी गेली होती. पण इथेच त्याने तिची निर्घृणपणे हत्या केली.
मात्र, या हत्येमागचं खरं कारण म्हणजे लग्नासाठी दिलेला नकार होता. खरं तर राहुल हांडोरे आणि दर्शना हे लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. त्यामुळेच राहुलचा जीव दर्शनावर जडला होता. खरं तर दोघेही आपल्या करिअरबाबत खूपच सजग होते. त्यामुळे दोघेही MPSC सारख्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. असं असताना दर्शना हिने नुकतंच या परीक्षेत यश मिळावलं. पण राहुलला अपयश आलं.
असं असतानाच राहुलला असं वाटू लागलं की, त्याचं दर्शनासोबत लग्न व्हावं. याच गोष्टीची विचारणा करण्यासाठी राहुल दर्शनाला राजगडाच्या पायथ्याशी घेऊन गेला होता.
हे ही वाचा >> Pune : MPSC पास दर्शना पवारला राहुल हंडोरेनेच संपवलं! हत्येचं कारण…
खरं तर इथे ते दोघं ट्रेकिंगसाठी गेले होते. पण जेव्हा ते सतीचा माळ या ठिकाणी पोहचले त्यानंतर त्यांनी एका ठिकाणी विसावा घेतला. जिथे राहुलने दर्शनाकडे लग्नाचा विषय काढला. पण त्याचवेळी दर्शनाने राहुलला लग्नासाठी स्पष्ट शब्दात नकार दिला.
दर्शना दिलेला हाच नकार तिच्या जीवावर बेतला. कारण या नकारामुळेच राहुल चवताळला आणि त्याने थेट दर्शनाची निर्घृणपणे हत्या केली.
दर्शना पवार हत्या प्रकरणी पोलिसांची पत्रकार परिषद जशीच्या तशी..
पुणे ग्रामीणचे एसपी अंकित गोयल पत्रकार परिषदेत म्हणाले की, ’18 जून 2023 रोजी पोलीस स्टेशन वेल्हेच्या हद्दीत आपल्याला एक मृतदेह सापडला होता. त्या मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला होता. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात 19 तारखेला शरीरावर जखमा असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे आम्ही हत्येचा गुन्हा दाखल केला होता. कलम 302, 201 आयपीसीचा समावेश करण्यात आला होता. त्या मृतदेहाची ओळख पटविण्यात आली होती. तो मृतदेह एका तरुणीचा होता. जिचे नाव दर्शना पवार (वय 26 वर्ष) असल्याचे समजले.’
‘परिस्थितीजन्य पुरावे आणि काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या सांगण्यावरुन या गुन्ह्याचा मुख्य संशयित आरोपी राहुल हांडोरे (वय 28 वर्ष) हा आहे. हा आरोपी सापडत नव्हता. कोणाशीही संपर्कात नव्हता. घटना झाल्यापासून तो फरार होता. नाव निष्पन्न झाल्यापासून त्याच्या शोधासाठी वेगवेगळे पथक बनवले होते. शेवटी त्याला बुधवार रात्री उशिरा मुंबईतील अंधेरी स्टेशनवरून ताब्यात घेण्यात आलं.’
‘त्यानंतर त्याला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे. त्याने हा गुन्हा कसा केला.. या हत्येमागचा हेतू काय होता या सगळ्या गोष्टी आता चौकशीतून समोर येतील. आरोपीला कोर्टासमोर हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येईल.’
‘प्राथमिक माहितीनुसार, राहुल हांडोरेला तरुणीने लग्नास नकार दिला होता.. दर्शना पवार आणि राहुल हांडोरे यांची खूप जुनी ओळख आहे. लहानपणापासून त्यांची ओळख आहे. आरोपीला मुलीसोबत लग्न करायचं होतं. पण तिने नकार दिल्यामुळे त्याने तिची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. पण अधिक चौकशीतून आणखीही काही माहिती समोर येऊ शकते.’
हे ही वाचा >> Pune : दर्शना पवारचा खून करुन बंगालला गेला.. राहुल हांडोरेला मुंबईत कसं पकडलं?
‘आरोपी हा देखील MPSC ची तयारी करत होता. काही वर्षांपासून पार्ट टाइम काम करुन त्याने MPSC परीक्षा देखील दिली होती. सध्या तो वेगवेगळ्या फूड डिलिव्हरी सर्व्हिसेसचा पार्ट टाइम जॉब करून एका रुममध्ये राहत होता आणि MPSC ची तयारी करत होता.’
‘दोघांचीही लहानपणापासून ओळख होती. मुलीच्या मामाचं घर आणि आरोपीचं घर हे समोरासमोर असल्याने लहानपणापासून त्यांची ओळख होती. पण नेमकं त्यांच्यात प्रेम-प्रकरण होतं की नाही याबाबत अद्याप माहिती नाही. सखोल चौकशीनंतर याबाबत माहिती समोर येईल.’
‘आरोपी राहुल हांडोरे याच्यासोबत लग्न करण्यास दर्शनाच्या घरच्यांनी नव्हे तर तिने स्वत: नकार दिला होता.’
‘हत्येनंतर आरोपी ट्रेनने वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता. त्याचे लोकेशनही मिळत होता. आमच्या माहितीप्रमाणे तो पश्चिम बंगालमध्ये गेला होता. त्यानंतर महाराष्ट्रातही तो वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता. पण अखेर अंधेरीतून त्याला अटक करण्यात आली.’
‘आरोपी अंधेरी रेल्वे स्टेशनवर होता. कदाचित दुसऱ्या ट्रेनने पळून जाण्याचा त्याचा उद्देश असावा. पण तो रेल्वे स्टेशनवरच असताना आम्ही त्याला अटक केली.’
‘आरोपीने नेमकी कशाने हत्या केली हे सखोल चौकशीतूनच समोर येईल. पण घटनास्थळावरून आपल्याला काही दगड सापडले आहेत ज्यावर दर्शनाचं रक्त आहे. तसेच शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्याही खुणा आहेत. पण आतापर्यंत कोणतंही धारदार शस्त्र घटनास्थळ किंवा आरोपीकडून मिळालेलं नाही.’
‘दशर्नाच्या मृतदेहाच्या शवविच्छेदनाचा संपूर्ण अहवाल देखील येणं बाकी आहे. त्यानंतरच या हत्येबाबत नेमकी माहिती आपल्याला मिळू शकणार आहे.’
‘आमच्याकडे जे परिस्थितीजन्य पुरावे आहेत त्यावरुन असं दिसतं आहे की, हे सकाळी साडे आठच्या दरम्यान गेले होते वर.. सुरु केलं होतं ट्रेक त्याने. पण परत येताना तो एकटाच आला होता. साधारण पावणे अकरा वाजता तो खाली आला होता. या मधल्या काळात त्याने नेमकं काय-काय केलं हे चौकशीतून समोर येईल. किल्ल्यावरचा साक्षीदार नाही आमच्याकडे.. पण आजूबाजूचे साक्षीदार आहेत आमच्याकडे.’ अशी माहिती पोलीस अधिकारी अंकित गोयल यांनी यावेळी दिली.
ADVERTISEMENT