Sharad Ponkshe eknath shinde Shiv Sena : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात वेगाने हालचाली सुरू आहेत. काही लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चितबद्दल अजूनही चाचपण्या सुरू आहेत. मुंबईतील लोकसभा मतदारसंघांमध्ये पाचव्या टप्प्यात मतदान असून, आता त्याबद्दलही राजकीय पक्षांनी उमेदवार घोषित करणे सुरू केले आहे. अशात शिवसेनेच्या एका विद्यमान खासदाराने निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. त्यांच्या मतदारसंघातून एका मराठी अभिनेत्याला निवडणुकीचे तिकीट मिळणार असल्याचे खात्रीलायक सुत्रांनी सांगितले. (Shiv Sena led by eknath shinde may nominate sharad ponkshe for lok sabha election)
ADVERTISEMENT
देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत,राजकीय पक्षांनी आपल्याला मिळालेल्या जागांवर उमेदवारांची घोषणाही केलेली आहे. मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मुंबईतल्या काही जागांवर उमेदवारांची घोषणा झालीय, मुंबईतील उत्तर –पश्चिम मतदारसंघ हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे. मात्र या जागेवरून कोणाला रिंगणात उतरवायचं याबद्दल जे प्रश्नचिन्ह होतं, त्यावर तोडगा निघाला असल्याची खात्रीलायकरित्या माहिती मुंबई Tak कडे आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून अभिनेते शरद पोंक्षे यांना शिवसेना उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरवणार असल्याची माहिती आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पोंक्षे सध्या सिक्कीममध्ये शूटींग करत असून दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंच्या गोटातून पोंक्षेंना निवडणूक लढवणार? का अशी विचारणा झाली आहे.
अमोल कीर्तिकरांविरोधात शरद पोंक्षे?
त्यावर पोंक्षेंनी होकारही दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता ठाकरे गटाकडून रिंगणात उतरलेले अमोल किर्तीकर आणि शरद पोंक्षे अशी उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात लढत रंगू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
गजानन कीर्तिकरांची माघार
सध्याचे विद्यामन खासदार गजानन किर्तीकर यांनी आपल्या मुलासमोरच निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर शिंदे गटाकडून अनेक नावांची चाचपणी करण्यात आली.
दोनच दिवसांपूर्वी अभिनेता गोविंदा शिवसेनेत सामील झाला. त्यामुळे उत्तर पश्चिममधून गोविंदा रिंगणार उतरणार असे अडाखे बांधले जात होते. मात्र एकनाथ शिंदेंनी शरद पोंक्षेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याचे ठरवले आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अमोल किर्तीकर यांना ईडीने समन्स बजावले आहे. तसेच पोंक्षेंचा मोठा चाहतावर्ग आणि त्यांची लोकप्रियताही बरीच आहे.
शरद पोंक्षे शिंदेंच्या शिवसेनेत उपनेते पदावरही कार्यरत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील त्यांची व्याख्यानं, समाजकार्य याही बाजू त्यांच्या उमेदवारीसाठी उजव्या ठरतील असा कयास एकनाथ शिंदेंकडून लावण्यात आल्याने; येत्या लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिममधून शिवसेनेच्या तिकीटावर अभिनेते शरद पोंक्षेंना निवडणुकीत उमेदवार करण्याविषयी एकनाथ शिंदे प्रकर्षाने विचार करत आहेत.
ADVERTISEMENT