Uddhav Thackeray Exclusive statement : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी 19 एप्रिल रोजी पार पडलं. सध्या लोकसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरू असताना राजकारणात एकमेकांवर होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपाला प्रचंड वेग आला आहे. अशा परिस्थितीत अनेक मोठे खुलासेही यातून उघड होत आहेत. आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही एक मोठा दावा केला आहे. ज्याची राजकीय वर्तुळात तुफान चर्चा रंगली आहे.
ADVERTISEMENT
त्यांनी मला माझ्या लोकांसमोर लबाड पाडलं- उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी एक अतिशय मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'आदित्य ठाकरेंना मी मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो आणि मी स्वतः दिल्लीच्या राजकारणात जातो, असं देवेंद्र फडणवीस मला म्हणाले होते, त्यांनी मला माझ्या लोकांसमोर लबाड ठरवलं.' असा दावा उद्धव ठाकरेंनी केला आहे. इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचं आश्वासन मला स्वतः अमित शाहांनी दिलं होतं याचा पुनरुच्चार देखील उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्याचबरोबर 'मला भाजपचा एकही मित्रपक्ष दाखवा जो आनंदी आहे?' असा सवालही त्यांनी यावेळी केला.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, 'काँग्रेसही विरोधात उभा राहिला आहे. 2023 पर्यंत लोक बोलायला घाबरत होते, आता नाही. आता लोकशाही धोक्यात आल्याचे त्यांना वाटते. राहुल गांधी किंवा मी बाहेर पडलो तर लोकांना भाजपच्या विरोधात कोणीतरी आहे असे वाटते, त्यांनाही खोट्या आश्वासनांविरुद्ध बोलण्याची हिंमतही मिळते'
भाजप धर्म आणि श्रीरामाच्या नावाने मतं मागतं
उद्धव ठाकरे म्हणाले की, 'भाजपनं कोणतंही काम केलेलं नाही आणि फक्त प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन मतं मागितली आहेत. मी काल एक यूट्यूब व्हिडीओ पाहिला, ज्यामध्ये एका शेतकऱ्याला विचारले गेले की, त्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 6000 रुपये मिळाले आहेत का? तर शेतकरी म्हणाला की,मला सरकारकडून 6000 रुपये मिळाले आहेत, पण मी एका वर्षात खतासाठी 1 लाख रुपये आणि 18 टक्के, 18,000 रुपये जीएसटी देतो. त्यामुळे सरकारचे माझ्याकडे 12,000 रुपये येणे बाकी आहे. त्यामुळे या निवडणूकीत भाजपचा पराभव होणार.', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
शेवटी 2019 मध्ये त्यांनी माझ्यासोबत तेच केलं...
'आम्ही ‘हिंदुत्व’ आणि ‘देश राष्ट्रवादा’मुळे भाजपसोबत होतो. भाजपने आमच्यासोबत असे का केले आणि युती आणि सेना तोडली? माझे वडील म्हणाले होते, तुम्ही देश सांभाळा, आम्ही राज्य सांभाळू. छान चाललं होतं. 2012 मध्ये माझ्या वडिलांचे निधन झाले, मोदी माझ्या घरी आले. मोदींनी 2014 मध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेव्हा जणू काही स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटले. अमित शहा पक्षाध्यक्ष झाल्यानंतर त्यांचं वागणं बदललं. 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शाहांनी आम्हाला विचारले होते, तुम्ही सर्वेक्षण केले आहे का?
मी म्हणालो होतो, आम्ही लढणारे लोक आहोत, आम्ही लढाईत उतरतो, आम्ही सर्वेक्षण करत नाही. शिवाजी महाराजांनीही कोणतेही सर्वेक्षण केले नाही. सर्वेक्षणात जर तुम्ही हरत आहात, तर तुम्ही लढा सोडून द्याल का? यापूर्वी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी असे भाजपचे ज्येष्ठ नेते सेनेशी बोलायला यायचे, तेव्हा बाचाबाची व्हायची.
नंतर, त्यांनी अहंकार आणि आकडेवारीने सुरुवात केली आणि राजस्थानचे भाजप नेते ओम माथूर यांना आमच्याशी बोलण्यासाठी पाठवले. बाळासाहेब गेल्यानंतर आमचा वापर करून फेकून द्यायचं असे भाजपचे गणित होते आणि शेवटी 2019 मध्ये त्यांनी माझ्यासोबत तेच केलं.' असे उद्धव ठाकरे म्हणाले.
'भाजप एक व्हॅक्युम क्लिनर'
'भाजप आता एक व्हॅक्युम क्लिनर झाला आहे. तो भ्रष्ट लोकांना आपल्यात घेतो आणि क्लिन चिट देतो. प्रफुल्ल पटेल, अशोक चव्हाण, अजित पवार. पक्ष फोडा, घर तोडा कुटुंबांना संपवा, छापे टाका ही त्यांची रणनिती आहे. त्यांची गॅरंटी पोकळ आहे. नोटबंदीनंतर मोदींनी मला 100 दिवस द्या म्हटलेलं. एप्रिल 2024 मध्ये 2700 पेक्षा जास्त झाले, काय झालं? शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार असं त्यांनी म्हटलेलं. पण काय झालं, केवळ खर्च दुप्पट झाला,' असं म्हणत ठाकरेंनी टीकेचा बाण सोडला.
ADVERTISEMENT