Lok Sabha Election 2024 Congress candidate : देशात जिकडे तिकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडताना दिसतोय. सलग तिसऱ्यांदा सत्ता राखण्यासाठी भाजपने प्रचारात झोकून दिलंय, तर काँग्रेसकडूनही जोरात प्रचार सुरू आहे. त्यामुळे निकालात कोण बाजी मारणार आणि सत्ता कुणाची येणार याबद्दल खमंग चर्चा रंगू लागल्या आहेत. पण, निकाल लागण्याआधीच काँग्रेस दोन जागांवर धक्के बसलेत, म्हणजेच काय तर निकालाच्या आधीच काँग्रेसने दोन गमावल्या आहे. आता काँग्रेसने दोन जागा कशा गमावल्या आणि महाराष्ट्रातील जागा कशी थोडक्यात वाचली, हेच समजून घेऊयात...
ADVERTISEMENT
लोकसभेचे निवडणूक निकाल लागण्याआधीच भाजपने एक जागा जिंकली आहे, तर काँग्रेसला दोन जागांवर धक्का बसला आहे. काँग्रेसने पहिलीच जागा गमावली ती सूरतमध्ये. तर दुसरा मतदारसंघ आहे इंदूरचा. इथे मतदान होणार आहे, पण काँग्रेसचा उमेदवारच नसणार आहे. एकास एक उमेदवार द्यायचे म्हणून इंडिया आघाडी मैदानात उतरली खरी पण आता त्यांच्या दोन जागा हातच्या गेल्या आहेत. अशीच गत काँग्रेसची महाराष्ट्रात होणार होती, पण ते संकट थोडक्यात टळलं.
काँग्रेसने दोन जागा कशा गमावल्या?
काँग्रेसच्या हातून पहिली जागा गेली, ती सूरतची. सूरतमध्ये भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांनी निकाल लागण्याआधीच विजयाचा गुलाल उधळला आहे. सूरत लोकसभा मतदारसंघात 15 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यात काँग्रेसच्या निलेश कुंभानी यांचाही अर्ज होता.
हेही वाचा >> शिंदेंचे लोकसभेचे 15 उमेदवार ठरले! पहा संपूर्ण यादी
निलेश कुंभानी यांच्या उमेदवारी अर्जावरील समर्थकांच्या सह्या खोट्या आहेत, अशी तक्रार भाजपने निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली. निवडणूक अधिकाऱ्यांनी पडताळणीत कुंभानी यांचा अर्ज बाद केला. तर इतर 5 जणांचे अर्जही रद्द झाले. त्यामुळे मुकेश दलाल यांच्यासह 9 निवडणुकीच्या रिंगणात होते. पण, अपक्ष 8 उमेदवारांनीही अर्ज माघारी घेतले आणि मुकेश दलाल बिनविरोध जिकंले.
इंदूर लोकसभा मतदारसंघात काय झाले?
इंदूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने अक्षय कांती बम यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसने डमी उमेदवारही दिला होता. पण, दोघेही निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर गेले. झालं असं की, अक्षय कांती बम यांनी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी मागे घेतली. इतकंच नाही, तर त्यांनी थेट भाजपमध्ये दाखल झाले.
हेही वाचा >> महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब! नाशिक, पालघर कुणाला?
या जागेवर काँग्रेसचे मोती पटेल हे डमी उमेदवार होते. पण, त्यांची उमेदवारी ग्राह्य धरली गेली नाही. उच्च न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळली. "तिकीट वेटिंग लिस्टमध्ये असेल आणि ते कन्फर्म झालेलं नसेल, तर आपोआप रद्द होते", असे कोर्टाने सांगितले. त्यामुळे आता या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवारच नसणार आहे. काँग्रेसने कुणाला पाठिंबाही दिलेला नाही. दोन्ही जागांवर घडलेल्या घटनांवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप होताहेत, पण दोन्ही जागा काँग्रेसच्या हातून गेल्या आहेत.
हेही वाचा >> पूनम महाजनांचे तिकीट कापून भाजपने ज्यांना उमेदवारी दिली, ते निकम कोण?
तुम्हाला आठवत असेल की, रामटेक लोकसभा मतदारसंघातही रश्मी बर्वे या काँग्रेसच्या उमेदवार होत्या. त्यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला गेला. त्यानंतर सुनावणी झाली आणि निवडणूक आयोगाने त्यांची उमेदवारी बाद केली. पण, काँग्रेसने दुसरा उमदेवार म्हणून त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांचे नाव दिलेले होते. त्यामुळे काँग्रेस थोडक्यात वाचली.
ADVERTISEMENT